मुद्दे मांडा; गुद्यावर येऊ नका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 08:31 PM2019-11-23T20:31:25+5:302019-11-23T20:32:29+5:30

महाराष्टÑातील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून महिना होत आला असताना राजकीय भूकंप होऊन नवे सरकार स्थापन झाले आहे.

Raise issues; Don't get on the anus! | मुद्दे मांडा; गुद्यावर येऊ नका !

मुद्दे मांडा; गुद्यावर येऊ नका !

Next

मिलिंद कुलकर्णी
महाराष्टÑातील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून महिना होत आला असताना राजकीय भूकंप होऊन नवे सरकार स्थापन झाले आहे. भाजप आणि राष्टÑवादी काँग्रेस पक्षातील अजित पवार गटाने एकत्र येऊन हे सरकार स्थापन केले. शिवसेना, राष्टÑवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशा तीन पक्षांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या महाविकास आघाडीचे सरकार लवकरच स्थापन होईल, अशी आशा असताना ही नाट्यमय घडामोड घडली. संपूर्ण महिनाभर राजकीय वातावरण तप्त आहे. समाजमाध्यमांमध्ये त्याची धग अधिक जाणवत आहे. नेते संयमाने बोलत असले तरी कार्यकर्ते भडकपणा, आततायीपणा, उतावीळपणाचे दर्शन घडवित आहे. मुद्यांवरील विषय गुद्यावर येणार नाही, अशी काळजी सर्वच राजकीय कार्यकर्त्यांनी घेण्याची नितांत आवश्यकता आहे.
शिवसेनेचे नेते, खासदार आणि ज्येष्ठ पत्रकार संजय राऊत यांनी खऱ्या अर्थाने हा संपूर्ण महिना गाजवला. निकालानंतर पहिल्या दिवसापासून त्यांनी भाजपला अंगावर घेतले. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी दिवाळीनिमित्त पत्रकारांशी साधलेल्या अनौपचारिक संवादाचे अचूक टायमिंग साधत राऊत यांनी भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरुध्द आघाडी उघडली. सकाळी टिष्ट्वट करीत ते मोहिमेची सुरुवात करीत असत. कधी अटलजींचे शब्द तर कधी शायरीचा खुबीने वापर करीत त्यांनी शिवसेनेची भूमिका परखड आणि स्पष्टपणे मांडली. दूरचित्रवाणीवर त्यांच्या इतके फुटेज बहुदा शरद पवार आणि उध्दव ठाकरे यांनाही मिळाले नसेल. हृदयशस्त्रक्रिया होऊनही त्यांनी लेखणी, वाणी आणि दूरचित्रवाणी यांना विराम दिला नाही. त्यांच्या आक्रमक भूमिका आणि शैलीमुळे राजकीय वातावरण जसे तप्त झाले तसे समाजमाध्यमांमध्येही आरोपांच्या फैरी सुरु झाल्या. फडणवीस ‘पुन्हा आलोय’ असे म्हणत मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर राऊत तेवढेच ट्रोल देखील झाल्याचे पहायला मिळाले.
भाजप, शिवसेना, राष्टÑवादी काँग्रेस व काँग्रेस या चार ही प्रमुख पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये समाजमाध्यमांमध्ये जणू युध्द छेडले गेले आहे. शिवसेनेच्या पुढाकाराने महाराष्टÑात नवीन प्रयोग साकारला जात होता. भाजप व शिवसेनेची विधानसभा निवडणुकीत युती होती, परंतु दोघांमधील मतभेदामुळे सेना काँग्रेस-राष्टÑवादीसोबत तर भाजप हा राष्टÑवादीतील अजित पवार गटासोबत गेला. अमित शहा यांच्या उपस्थितीत ‘मातोश्री’वर जे ठरले, त्यानुसार व्हावे, असा सेनेचा आग्रह तर मुख्यमंत्रीपदाचे काही ठरलेच नव्हते, असे फडणवीस यांचे म्हणणे आहे. खरे कोण आणि खोटे कोण यावरुन सुरु झालेला वाद भाजप आणि सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच रंगला. पक्ष आणि नेत्यांच्या इतिहासाची उजळणी झाली. अगदी सेनेने आणीबाणीचे केलेले समर्थन पासून तर प्रतिभाताई पाटील, प्रणव मुखर्जी यांना राष्टÑपतीपदासाठी दिलेला पाठिंबा इथपर्यंत चर्चा रंगली. बाबरी मशिदीच्या विध्वंसाची जबाबदारी भाजपने टाळली मात्र शिवसेनाप्रमुखांनी हे कृत्य सैनिकांचे असेल तर मला त्यांचा अभिमान आहे, असे जाहीर कौतुक केल्याचे शिवसैनिकांनी पुन्हा लक्षात आणून दिले.
हिंदुत्व हा युतीमधील समान धागा असल्याचे भाजपचे म्हणणे असताना सैनिकांनी मेहबुबा मुफ्ती यांच्यासोबत काश्मिरात केलेली युती ही कोणत्या हिंदुत्वात बसते, असा सवाल केला.
युती तोडून शिवसेना काँग्रेस, राष्टÑवादीबरोबर जात असल्याचा आणि पाच वर्षांची सत्ता मोठा पक्ष म्हणून उदयाला येऊनही जात असल्याचा राग आणि खेद भाजप आणि त्याच्या समर्थकांमध्ये असणे नैसर्गिक आणि स्वाभाविक आहे. परंतु, एकट्या सेनेला त्यासाठी दोषी ठरणे कितपत संयुक्तीक आहे, असा प्रश्न राजकारणात रस असणाºया सामान्य नागरिक विचारताना दिसत आहे.
अजित पवार यांच्या बंडानंतर राष्टÑवादीचे समर्थक संतापले, तर भाजप समर्थक आनंदले. शरद पवार यांच्या १९७८ च्या बंडाची आठवण भाजप समर्थकांना झाली, तर हे दबावतंत्र असल्याची भावना राष्टÑवादीच्या समर्थकांना वाटली. कुटुंब आणि पक्षात फूट पडल्याची सुप्रिया सुळे यांची भावना कार्यकर्त्यांना हळवे करुन गेली.
कार्यकर्ते भाबडे असतात. त्यांचा पक्ष आणि नेत्यांवर प्रचंड विश्वास असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे शेवटच्या क्षणी काहीतरी घडवून आणतील, आणि भाजपचे सरकार अस्तित्वात येईल. असा भाजप समर्थकांचा आशावाद खरा ठरला आहे. परंतु, अजित पवार यांचे बंड फसते काय, ३० नोव्हेंबरला विश्वासमताच्यावेळी काय घडते, यासंदर्भात तर्कवितर्कांना पूर आला आहे. महाविकास आघाडी व भाजप-राष्टÑवादीचा अजित पवार गट ही अभद्र युती असल्याचे व्यंगचित्र, नेत्यांविषयी विनोद असे प्रकार घडू लागले आहेत. वैचारिक चर्चा समजू शकते, परंतु, अशी वैयक्तीक टीका, आरोप टाळायला हवे. समाजमाध्यमांमध्ये तर असे वाद विकोपाला जात आहेत. आमच्या नेत्याची बदनामी सहन करणार नाही, आम्ही काही शांत बसलेलो नाही, असे इशारे सुरु झालेले आहेत. २८८ आमदारांच्या विधानसभेत १४५ हा जादुई आकडा गाठणाºया आघाडीकडे सत्ता जाईल, हे साधेसरळ गणित आहे. विधानसभेत जो हे गणित सोडवेल तो सरकार चालवेल, हे स्पष्ट आहे. त्यामुळे संयम ठेवायला हवा. एकमेकांचा आदर व सन्मान करायला हवा, ही महाराष्टÑाची संस्कृती नाही, हे सगळ्यांनीच लक्षात घ्यायला हवे.

Web Title: Raise issues; Don't get on the anus!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.