प्रश्नचिन्ह आणि जीवन

By Admin | Updated: November 2, 2016 05:49 IST2016-11-02T05:49:58+5:302016-11-02T05:49:58+5:30

माझ्या लहानपणीची एक दृष्टांतकथा मला आठवते. चित्रकलेचा तास असतो.

Question mark and life | प्रश्नचिन्ह आणि जीवन

प्रश्नचिन्ह आणि जीवन


माझ्या लहानपणीची एक दृष्टांतकथा मला आठवते. चित्रकलेचा तास असतो. चित्रकलेचे शिक्षक वर्गात मुलांना सुंदर सुंदर चित्रे काढायला शिकवतात. त्यात सूर्योदयाचे चित्र असते, डोंगराचे चित्र असते, झाडांचे चित्र असते आणि शेवटी माणसाचेही चित्र काढायला शिकवतात. इतर चित्रांपेक्षा माणसाचे चित्र काढणे तसे खूप अवघड. शिक्षक आज वर्गात सांगतात की, ‘सर्वांनी मी दिलेल्या कागदावर माणसाचे चित्र काढायचे. मी तुम्हाला माणसाचे चित्र काढायला शिकविले आहे. ज्याचे चित्र सर्वात लवकर काढून होईल त्याला मी बक्षीस देणार आहे. वर्गातील एका मुलाने सर्वात अगोदर दिलेल्या कागदावर चित्र काढून, घडी करून तो कागद शिक्षकांकडे दिला.
शिक्षकाने ते चित्र पाहिले आणि त्याची पाठ थोपटली. त्या चित्राकडे पहात त्यांनी त्या मुलाला बोलावले. कारण त्या कागदावर माणसाचे चित्र काढलेले नव्हते. त्याऐवजी एक मोठे प्रश्नचिन्ह काढले होते. त्या विद्यार्थ्याला त्या चित्राविषयी विचारले त्यावर तो म्हणाला, ‘सर तुम्हीच एकदा म्हणाला होता माणूस म्हणजे एक मोठे प्रश्नचिन्ह. शिक्षक त्याच्या कल्पकतेला दाद देत हसले, त्यांनी तो कागद घेतला आणि त्या प्रश्नचिन्हापुढे एक स्वल्पविराम दिला. ते हसत हसत म्हणाले, ‘‘प्रश्नचिन्ह ही माणसाची एक खूण आहे. पण ती अपूर्ण आहे. परंतु जो या प्रश्नचिन्हाला स्वल्पविराम देऊन पुढे जातो तो खरा माणूस. आणि तीच माणसाखी खरी ओळख.’’
प्रश्न म्हणजे जिज्ञासा आणि कुतुहल. प्रश्न म्हणजे समस्या, अडचण आणि त्या सोडविण्यासाठी लागणारी माणसाची कसोटी. मानवी जीवन जगत व्यवहार, विश्वरचना, त्या विश्वरचनेतील माणसाचे स्थान आणि अनुबंध या विश्व व्यवहारामागील अज्ञात शक्ती आणि मानवासह विश्व व्यवहाराला कारणीभूत असणारे चैतन्य आणि उर्जा या साऱ्या गोष्टींविषयी मानवी मनात प्रथम कुतुहल जागे होते. त्याचा शोध घेण्याची जिज्ञासा उत्पन्न होते. आणि ही जिज्ञासा काही प्रश्न निर्माण करते.
कुतुहल, जिज्ञासा, ज्ञान मिळविण्याची कृती आणि मिळाल्यानंतरची तृप्ती हे एक चक्र प्रथमत: एका प्रश्नाभोवती उभे राहते आणि मानवी व्यवहाराच्या एका भल्या मोठ्या परिघातून प्रश्न ही संकल्पना हळूच डोकावते. ज्याला प्रश्न पडत नाहीत किंवा ज्याच्यासमोर प्रश्न उभे रहात नाहीत. अशा माणसाला आपण माणूस म्हणणार का? असाही प्रश्न उभा राहतो. प्रश्न पडणे आणि तो सोडविणे हा जागृत मानवी मनाचा उद्गार आहे. आणि प्रश्न उभा राहणे हे त्याच्या कर्तृत्वाला आवाहन आहे. ज्याला कधी प्रश्न पडत नाहीत तो एकतर सर्वज्ञ आणि महान बुद्धिवान असतो. नाहीतर अतिशय निर्बुद्ध. मानवी बुद्धिलाही जेव्हा प्रश्न पडतो तेव्हा हीच बुद्धिज्ञानाच्या सांगाती मानवी जीवनाचा शोध घेऊ लागते.

-डॉ. रामचंद्र देखणे

Web Title: Question mark and life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.