पुस्तकाच्या जन्माची गोष्ट: मानवी अस्तित्व ते मृत्यूचा प्रबळ भावानुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2025 10:22 IST2025-03-09T10:21:35+5:302025-03-09T10:22:11+5:30

सदानंद रेगे यांनी अनेक प्रकारच्या कथा लिहिल्या होत्या. त्यातील वैविध्य आश्चर्यकारक होते. 'अखेर' या छोट्या कथेसारखी मानवी अस्तित्वाचे वैयर्थ दाखवणाऱ्या कथेपासून ते ख्रिस्त जन्माच्या 'पाळणा' कथेपर्यंत; मृत्यू हा त्यांच्या कथांमागील एक प्रबळ भावानुभव होता...

Pustkachya Janmachi Goshta Article on Kalokhachi Pise Book | पुस्तकाच्या जन्माची गोष्ट: मानवी अस्तित्व ते मृत्यूचा प्रबळ भावानुभव

पुस्तकाच्या जन्माची गोष्ट: मानवी अस्तित्व ते मृत्यूचा प्रबळ भावानुभव

रामदास भटकळ

सदू हा पहिला लेखक जो वयाने गाडगीळ, गोखल्यांप्रमाणे माझ्याहून बराच मोठा असूनही सुरुवातीपासून आमचे संबंध अरेतुरेवर राहिले. सदानंद रेगे यांचा स्वभाव एका बाजूने लाघवी, तर मधूनच भांडखोर असा होता. तो घरातला कुटुंबप्रमुख होता, त्याच्यावर पाच-सहा जणांची जबाबदारी होती. त्यामुळे शिक्षण अर्ध्यावर सोडून द्यावे लागलेले आणि माटुंग्याला राजेंद्र निवास चाळीतले गरिबीचे जिणे स्वीकारावे लागलेले. रेगे सुरुवातीला कविता लिहीत नसत; प्रामुख्याने ते कथाच लिहीत. कदाचित पाडगावकरांशी माझे प्रकाशक म्हणून संबंध जुळले. त्यातून रेगेंची ओळख झाली असेल. सुरुवातीपासून आमची दोस्ती वेगळी. त्याच्या कथा या फक्त नावाजलेल्या मासिकांतून नव्हे, तर फारशा माहीत नसलेल्या नियतकालिकांतून यायच्या. त्यांचा माग घेणे कठीण होते. नवकथाकारांच्या मांदियाळीत गंगाधर गाडगीळ, अरविंद गोखले, व्यंकटेश माडगूळकर आणि पु. भा. भावे या चतुष्टयीनंतर शांताराम (प्रा. के.ज. पुरोहित) आणि सदानंद रेगे हीच नावे पुढे येत. रेगे यांचा एक कथासंग्रह त्यांच्या मित्राने छापून घेतला होता. 'जीवनाची वस्त्रे', परंतु काही आर्थिक कारणासाठी तो प्रकाशित आणि वितरित झाला नव्हता. रेगे यांच्या कथांतील गुणवत्तेच्या दृष्टीने चढ-उतार पाहता त्यांना संग्रहरूप शक्य तो लवकर येणे आवश्यक होते. मी त्यांना त्यांची सगळी कथांची कात्रणे गोळा करायला सांगितली. ती संख्या दीडशेच्या वर निघाली. मी ती सगळी अभ्यासपूर्ण रीतीने वाचली. त्यासंबंधीची टिपणे केली; पण त्यातून निवड कशी करावी, याचा संभ्रम सुरू झाला. स्वतः रेगेंना तटस्थपणे विचार करणे कठीण होते. 

अशा वेळी प्राध्यापक वा. ल. कुळकर्णी हे तत्परतेने मदत करत. त्यांनीही आमच्यासाठी या दीडशे कथा परत वाचल्या. आमच्या दोन-तीन भेटी झाल्या. रेगे यांनी अनेक प्रकारच्या कथा लिहिल्या होत्या. त्यातील वैविध्य आश्चर्यकारक होते. 'अखेर' या छोट्या कथेसारखी मानवी अस्तित्वाचे वैयर्थ दाखवणाऱ्या कथेपासून ते ख्रिस्त जन्माच्या 'पाळणा' कथेपर्यंत; मृत्यू हा त्यांच्या कथांमागील एक प्रबळ भावानुभव होता. तरीही काही विनोदी छटा असलेल्या कथा असा त्यांचा पसारा होता. 

कुळकर्णीसरांनी त्यातील वैविध्य दाखवण्यास उतमोत्तम कथा निवडून दिल्या. इतकेच नव्हे तर त्या कथासंग्रहासाठी प्रस्तावनाही लिहिली. रेगेंचा दुसरा कथासंग्रह लगेच प्रसिद्ध व्हायला हवा हे त्या प्रस्तावनेत सांगितले. गाडगीळ ज्याला उत्सवकाळ म्हणायचे त्या दिवसातील बहर टिपण्यात कुळकर्णी सर अग्रेसर होते. पुस्तक छापताना मी मुद्रिते एकदा तरी वाचत असे. त्यातील 'खूण' या कथेतला एक परिच्छेद मला कथन पुढे न नेणारा फालतू वाटला. मी तो गाळण्याविषयी वालंकडे सल्ला मागितला. त्यांनी माझे कान धरून सांगितले की, हे सदानंद रेगेंचे खरे बळ आहे. त्याच्यात एक कवी दडलेला आहे. तो या परिच्छेदात दिसतो आणि त्यामुळे त्याच्या कथेला विलक्षण खोली येते. या कथांचे वाचन, आम्हा तिघांच्या चर्चा यातून मी बरेच काही शिकत गेलो. रेगेंचा अनेक नियतकालिकांशी संबंध होता. सायनला राहणारा प्रभाकर गोरे हा चित्रकार त्यांचा मित्र होता, पुढे तो माझाही मित्र झाला. रेगेंचे शब्दप्रभुत्व आणि गोरे यांचे रेषाप्रभुत्व असामान्य होते. 'काळोखाची पिसे' या कथासंग्रहाला गोरे यांनी, तसेच अद्भुत मुखपृष्ठ तयार करून दिले. त्यानंतर काही काळ रेगे प्रामुख्याने कथाच लिहीत राहिले. कदाचित या तिघांच्या चर्चेतून अचानक त्यांच्यातील कवी जागृत झाला असेल; काही वेळा ते एका दिवसात पाच-दहा कविता लिहीत. त्यातून 'अक्षरवेल' हा त्यांचा पहिला कवितासंग्रह प्रसिद्ध झाला. आज प्रामुख्याने सदानंद रेगे हे कवी म्हणून ओळखले जातात, त्यांची 'समग्र कविता' वसंत आबाजी डहाके यांच्या प्रस्तावनेसह पॉप्युलर प्रकाशन प्रसिद्ध करत आहे.

Web Title: Pustkachya Janmachi Goshta Article on Kalokhachi Pise Book

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.