पुणेकर वर्षाला १५२, तर मुंबईकर १२६ तास रस्त्यावर! वाहतुकीच्या कासवगतीमुळे महानगरे संथ

By श्रीनिवास नागे | Updated: April 7, 2026 10:54 IST2026-04-07T10:53:30+5:302026-04-07T10:54:36+5:30

रस्त्यावर तुंबलेले कित्येक तास इंधन जाळण्यात आणि वाहनचालकांच्या मानसिक ताणात जातात.

Pune residents spend 152 hours on the road per year, while Mumbai residents spend 126 hours! Traffic slows down the metropolis | पुणेकर वर्षाला १५२, तर मुंबईकर १२६ तास रस्त्यावर! वाहतुकीच्या कासवगतीमुळे महानगरे संथ

पुणेकर वर्षाला १५२, तर मुंबईकर १२६ तास रस्त्यावर! वाहतुकीच्या कासवगतीमुळे महानगरे संथ

श्रीनिवास नागे, वरिष्ठ वृत्तसंपादक, लोकमत, पिंपरी-चिंचवड

पंधरा मिनिटांत केवळ साडेचार किलोमीटर, हा आहे महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या शहरांमधल्या वाहतुकीचा सरासरी वेग. मुंबई-ठाण्यात ताशी १८ ते २० किलोमीटर, पुणे आणि पिंपरी-चिंचवड २० ते २२ किलोमीटरच्या आसपास, नागपूर २०-२५, तर नाशिक तासाला २५-३० किलोमीटर अशी ही वाहतुकीची संथ गती. शहरांतल्या ‘पीक अवर्स’मध्ये १० किलोमीटरचं अंतर कापण्यासाठी लागणारा सरासरी वेळ हा वाहतुकीच्या वेगाचा मुख्य मापदंड. यावरून सरासरी वेग काढता येतो. पुण्यात हा वेग तासाला १८ किलोमीटर होता, पण मुख्य रस्त्यांवरचा वेग सुधारून तो ताशी २२ किलोमीटरवर पोहोचल्याचा दावा वाहतूक पोलिसांनी केलाय. असं असलं तरी ‘टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्स २०२५’ या जागतिक अहवालानुसार पुणे जगातल्या सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेल्या शहरांच्या यादीत पाचव्या स्थानावर पोहोचलंय, तर मुंबई अठराव्या स्थानावर आहे.

भारतात सर्वाधिक वाहतूक कोंडी बंगळुरूत असून जागतिक स्तरावर ते दुसऱ्या क्रमांकावर आहे. ‘टॉमटॉम’ या संस्थेनं जगभरातल्या ४९२ शहरांमधील वाहतुकीची माहिती गोळा केली. शहरांतर्गत प्रवाससाठी लागणारा वेळ, इंधनाचा वापर आणि कार्बन उत्सर्जन अशा विविध निकषांवर आधारित हे रँकिंग जाहीर करण्यात येतं. 

वाहतुकीच्या कासवगतीमुळं प्रत्येक पुणेकर वर्षाला १५२ तास म्हणजे सहा दिवस आठ तास केवळ रस्त्यावर घालवतो, तर मुंबईकर १२६ तास ! हे तास इंधन जाळण्यात, क्लच-ब्रेक दाबण्यात, ब्रेक लाइनर गरम होण्यात आणि वाहनचालकांच्या मानसिक ताणात जातात. रस्त्यावरच्या कोंडीत ‘अर्धा तास-तासभर थांबायचंच आहे’, अशी त्यांची मानसिकता बनते, पण त्यातून हळूहळू निराशा वाढते.

वेग मंदावण्याची कारणं शोधताना पहिल्यांदा समोर येते वाहनांची प्रचंड वाढ. मुंबईत रस्त्यांच्या प्रति किलोमीटर अंतरात पाचशेवर मोटारी पुढं-पुढं सरकत राहतात. पुण्यात सरलेल्या वर्षात साडेतीन लाख नवीन वाहनं रस्त्यावर आल्याची नोंद झाली. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण वाहनांची संख्या पंचवीस लाखांवर गेलीय. दहा वर्षांत तिप्पट ! प्रचंड वेगानं वाढणाऱ्या शहरीकरणाच्या तुलनेत रस्ते अपुरे आणि अरुंद आहेत. त्यातच त्यांची रचनाही जुनी. हिंजवडी आयटी पार्क परिसरातल्या कोंडीनं या मर्यादा अधोरेखित केल्या आहेत. रस्त्यांच्या बाजूलाच, नव्हे रस्त्यावरच आलेलं पार्किंग आणि फिरते विक्रेते, रस्त्याकडेच्या व्यावसायिकांची अतिक्रमणं यामुळंही रस्त्यांची रुंदी निम्मी झाली. पुण्या-मुंबईत पार्किंगच्या अपुऱ्या जागेमुळं वाहनं रस्तेच गिळून टाकतात.

सतत चालणारे बांधकाम प्रकल्प, मेट्रो, अवाढव्य उड्डाणपूल, काही ठिकाणी रस्त्यांचं रुंदीकरण, तर काही ठिकाणी अर्बन स्ट्रीटच्या नावाखाली सुरू असलेला रस्त्यांचा संकोच ही विकासकामंही कोंडीचं आणखी एक कारण. वर्षानुवर्षं सुरू असलेलं मुंबईत कोस्टल रोडचं काम, पुण्यात मेट्रो मिसिंग लिंक्स, नाशिकमध्ये खोदकाम यामुळं वाहतूक मंदावली. सरकारी यंत्रणांत समन्वय नसल्यानं नवे रस्तेही पुन्हा खोदले जातात. कधी केबल पुरण्यासाठी, तर कधी ड्रेनेजच्या पाईप्ससाठी. अपुरं सिग्नल सिंक्रोनायझेशन, फ्री राइट टर्न्सचा बोजवारा, शाळा-बाजाराची गर्दी आणि अनधिकृत बस-पार्किंग अशा छोट्या-छोट्या अडथळ्यांमुळं सारं शहर ठप्प होतं. लोकल, बस, मेट्रोचा विस्तार तसा कमीच. त्यातच बस रॅपिड ट्रान्झिट प्रणालीतलं अपयश. परिणामी रस्त्यावर खासगी वाहनांच्या रांगा दिसतात. अर्थात नागपूरसारख्या शहरात हे कमी असल्यानं तिथं वाहतुकीचा वेग बरा दिसतो.

या दुखण्यावरचे तातडीचे उपायही समोर येताहेत. मुख्य रस्त्यांवर सिग्नल सिंक्रोनायझेशन आणि स्मार्ट ट्रॅफिक सिस्टिम हवी. मेट्रो, बीआरटी, इलेक्ट्रिक बस आणि सायकल लेन वाढवता येतील. पुण्यात मेट्रो पूर्ण झाल्यावर अपेक्षित सुधारणा दिसतील. बंगळुरूमध्ये खासगी वाहनांवर गर्दी कर (कंजेशन चार्ज) लावण्याची कल्पना पुढं आली. सार्वजनिक वाहतूक क्षमता वाढवल्यानंतरच ही ‘आयडिया’ लागू केली पाहिजे, असं तज्ज्ञ सांगतात. 

अतिक्रमण निर्मूलनातील सातत्य, बहुस्तरीय पार्किंग, पुरेसे रिंग रोड आणि वाहनवाढीवरचं नियंत्रण हे महत्त्वाचे उपाय. नागरिकांना ‘कार पूलिंग’, ‘वॉक टू वर्क’ मोहिमा राबवता येतील. शाळा-महाविद्यालयांना बस सुविधा अनिवार्यच हव्यात. शहर नियोजनात वाहतूक तज्ज्ञांचा समावेश केला पाहिजे. प्रशासन, वाहतूक पोलिस आणि नागरिक  एकत्र आल्याशिवाय वेगवान शहरं घडणं अशक्य. आताच कृती हवी, नाहीतर उद्या ही कोंडी आणखी घट्ट होईल !

shrinivas.nage@lokmat.com

Web Title : पुणे, मुंबई के निवासी यातायात में प्रतिवर्ष सैकड़ों घंटे बर्बाद करते हैं

Web Summary : पुणे और मुंबई के निवासी सालाना यातायात में अत्यधिक घंटे बिताते हैं। वाहनों की वृद्धि, बुनियादी ढांचा परियोजनाओं और समन्वय की कमी के कारण भीड़भाड़ से समय और ईंधन की बर्बादी होती है। समाधान में बेहतर यातायात प्रबंधन, सार्वजनिक परिवहन सुधार और नागरिक भागीदारी शामिल है।

Web Title : Pune, Mumbai Residents Waste Hundreds of Hours Annually in Traffic

Web Summary : Pune and Mumbai residents spend excessive hours in traffic annually. Congestion, caused by vehicle growth, infrastructure projects, and lack of coordination, leads to wasted time and fuel. Solutions involve better traffic management, public transport improvements, and citizen participation.