ओवेसींच्या कडेवर प्रकाश आंबेडकर

By यदू जोशी | Published: September 17, 2018 06:26 AM2018-09-17T06:26:03+5:302018-09-17T17:14:41+5:30

एकीकडे धार्मिक उन्मादाचा आरोप करीत हिंदुत्ववादी पक्ष, संघटनांचा कडवा विरोध करणारे आंबेडकर हे कडव्या मुस्लीमवादी ओवेसींच्या कडेवर जाऊन बसत आहेत.

prakash ambedkars bharip bahujan mahasangh makes alliance with asaduddin owaisis aimim | ओवेसींच्या कडेवर प्रकाश आंबेडकर

ओवेसींच्या कडेवर प्रकाश आंबेडकर

googlenewsNext

भारिप-बहुजन महासंघाचे सर्वेसर्वा अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी असदुद्दीन ओवेसी यांच्या नेतृत्वातील एमआयएमशी युती करण्याचा घेतलेला निर्णय हा त्यांनी नक्षलवादाचे समर्थन करण्यासारखाच अनाकलनीय आहे. एकीकडे धार्मिक उन्मादाचा आरोप करीत हिंदुत्ववादी पक्ष, संघटनांचा कडवा विरोध करणारे आंबेडकर हे कडव्या मुस्लीमवादी ओवेसींच्या कडेवर जाऊन बसत आहेत. धार्मिक उन्माद वा उच्छाद एखाद्या विशिष्ट धर्माच्या आड केला जातो म्हणून त्याला विरोध करायचा आणि त्याचवेळी इतर धर्माच्या आधारे तो पसरविण्यासाठी कारवाया करणाऱ्यांच्या पंक्तीत जाऊन बसायचे असा विरोधाभास आंबेडकरांच्या नव्या राजकीय निर्णयातून प्रतीत होत आहे.
आंबेडकर यांनी राजकीय सोयीसाठी मित्रपक्ष बदलले आणि मित्रही. तीन दशकांच्या राजकारणात त्यांचे एकेकाळचे अत्यंत विश्वासू त्यांना एकेक करून सोडून गेले. त्यांना ज्यांनी अकोल्याच्या राजकारणात आणले ते लंकेश्वर गुरुजी तसेच प्रा. सुभाष पटनाईक, मखराम पवार, सूर्यभान ढोमणे, बी.आर. शिरसाट अशा मंडळींचा पुढे आंबेडकर यांच्या राजकारणाबाबत भ्रमनिरास झाला. सर्व जातींना सोबत घेऊन राजकारण करण्याचा त्यांचा अकोला पॅटर्न काही प्रमाणात यशस्वी झाला पण ते स्वबळावर कधीही लोकसभेची निवडणूक जिंकू शकले नाहीत. काँग्रेससोबत आघाडीत होते तेव्हाच त्यांना लोकसभेत बसता आले. गेल्या वेळी त्यांनी पाचपंचवीस पक्षांना एकत्र आणून राज्यात काँग्रेसेतर आघाडी उभारली, पण ती अपयशाच्या गाळात रुतली.
काँग्रेसच्या पुढाकाराने भाजपाविरोधी पक्षांची मोट बांधण्याचे काम सुरू असताना आंबेडकर यांनी आता वेगळी चूल मांडली आहे. एमआयएम किंवा मनसे असे दोन पक्ष आहेत ज्यांना सोबत घेणे काँग्रेसला राज्य व राष्ट्रीय पातळीवर शक्य नाही. कारण, एमआयएमशी दोस्ती केली तर काँग्रेसची हिंदू मते हातून जाण्याची भीती आहे आणि मनसेचे बोट धरले तर काँग्रेसचा हात हिंदी भाषिक राज्यांमध्ये पोळेल. तथापि, मर्यादित का असेना पण काही जिल्ह्यांमध्ये प्रभाव असलेल्या प्रकाश आंबेडकरांची ताकद काँग्रेसला बळ देणारी ठरू शकली असती. काँग्रेसने त्या दृष्टीने त्यांच्याशी चर्चा करण्यापूर्वीच त्यांनी एमआयएमशी हातमिळवणी केली. आंबेडकर हे एकीकडे संघ, भाजपा, हिंदुत्ववादी संघटनांवर वैचारिक हल्ला चढवतात, पण दुसरीकडे त्यांच्यामुळे धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होऊन ते भाजपा-शिवसेनेच्या पथ्यावर पडते हा आरोप जुनाच आहे. निवडणूक निकालाची आकडेवारीही या आरोपाला पुष्टी देत आली आहे. एमआयएमशी दोस्ती करून आंबेडकर यांनी सदर आरोपास बळच दिले आहे. २०१४ सारखी मोदी लाट आज उरलेली नाही. अशा वेळी आपल्या विरोधातील मतांचे विभाजन भाजपाला हवेच आहे. आंबेडकरांच्या नव्या घरठावाने राज्यातील भाजपा नेत्यांना आनंदाच्या उकळ्याच फुटत असतील.
रामदास आठवले, लाँगमार्चचे प्रणेते या बिरुदावर जगणारे आणि जाता जाता मुलाला राजकारणात कुठेतरी चिकटवून जायच्या प्रयत्नात असलेले प्रा. जोगेंद्र कवाडे, वडील दिवंगत रा.सू. गवई यांचे दहा टक्केही गुण अंगी नसलेले डॉ. राजेंद्र गवई आणि आता एमआयएमच्या नादी लागलेले आंबेडकर यांच्यापैकी कोणालाही रिपब्लिकन ऐक्याशी काहीही देणेघेणे उरलेले नाही. प्रत्येकाने आपल्या सोयीचे दुकान गाठले आहे.

(लेखक मुंबई लोकमतचे वरिष्ठ साहाय्यक संपादक आहेत)

Web Title: prakash ambedkars bharip bahujan mahasangh makes alliance with asaduddin owaisis aimim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.