प्रपंच आणि परमार्थ
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2018 00:17 IST2018-09-29T00:17:34+5:302018-09-29T00:17:37+5:30
प्रपंच आणि परमार्थ या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, त्याप्रमाणे प्रपंच नेटका करूनच परमार्थ साधता येतो. किंबहुना परमार्थ साधणे म्हणजेच प्रपंचाचा तोलबिंदू आर्थिक, सामाजिक आणि व्यावहारिक पातळीवर उत्तमरीत्या सांभाळणे होय. आर्थिक स्थिती चांगली असो की बेताची असो, त्याचा परमार्थ साधण्याशी काही संबंध नसतो.

प्रपंच आणि परमार्थ
- प्रज्ञा कुलकर्णी
प्रपंच आणि परमार्थ या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, त्याप्रमाणे प्रपंच नेटका करूनच परमार्थ साधता येतो. किंबहुना परमार्थ साधणे म्हणजेच प्रपंचाचा तोलबिंदू आर्थिक, सामाजिक आणि व्यावहारिक पातळीवर उत्तमरीत्या सांभाळणे होय. आर्थिक स्थिती चांगली असो की बेताची असो, त्याचा परमार्थ साधण्याशी काही संबंध नसतो. प्रापंचिक स्थिती कशीही असली, तरी आपली मानसिकता जर पारमार्थिक असेल; तर तिथे प्रपंच आणि परमार्थ यांचा सुरेख संगम साधला जातो. प्रपंचाला कंटाळून परमार्थ साधता येणार नाही आणि केवळ परमार्थच करण्याने प्रपंचही नेटका होणार नाही. एखाद्याने प्रपंच सोडून जर परमार्थातच झोकून देण्याचे ठरवले तर त्यांचे उद्दिष्ट कधीच साध्य होणार नाही. त्याला हवी असलेली मन:शांती कधी लाभणार नाही. प्रपंच सोडणे, प्रपंचातील कर्तव्यांकडे पाठ फिरवणे, प्रापंचिक जबाबदाऱ्या नाकारणे म्हणजे केवळ पळपुटेपणा आणि भेकडपणाच होय. या सर्व जबाबदाºया पेलण्यास आणि पार पाडण्यास आपण असमर्थ आहोत, हे एक प्रकारे सिद्ध करणेच होय. समतोल राखण्याचे कौशल्य अंगी बाणवावे लागते. हे साध्य करणे अवघड आहे, पण ते अशक्य अजिबात नाही. प्रपंचाकडे पाठ फिरवून परमार्थसन्मुख कधीच होता येणार नाही. परमार्थ साधण्यासाठी मन स्थिर, शांत, तृप्त असावयास पाहिजे. आपल्या मनात अपराधीपणाची बोच, असमाधान, अतृप्तता असेल, मन अस्थिर, चंचल असेल तर ते मन परमार्थी कधीच रमणार नाही. काही केल्या ते स्थिर, समाधानी होणार नाही. काहीच साध्य न होता अशांत सागरात मन सतत गटांगळ्या मात्र खात राहील. त्यातून हाती काहीच लागणार नाही आणि नैराश्य, वैफल्य मात्र पदरी पडेल. या सगळ््या चक्रातून अनेक प्रश्न निर्माण होतील तसेच समस्या उभ्या ठाकतील. संपूर्ण प्रपंचाकडे, संसारी व्यापाकडे पाठ फिरवून, प्रापंचिक प्रश्नांना कंटाळून परमार्थ साधता येणार नाही आणि केवळ परमार्थ साधून प्रपंचही नीटनेटका होणार नाही, हे ज्याला कळेल आणि जो या दोन्हींचा समतोल उत्तमरीत्या सांभाळेल, त्यालाच प्रपंच आणि परमार्थातला गर्भितार्थ
कळेल. त्यामुळे या सगळ््या प्रक्रियेतील फरक लक्षात घेऊन याकडे पाहावयास हवे. तेव्हा त्याचे जगणे अर्थपूर्ण होईल.