शहरं
Join us  
Trending Stories
1
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
4
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
5
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
6
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
7
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
8
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
9
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
10
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
11
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
12
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
13
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
14
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
16
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
17
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
18
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
19
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
20
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला

विकासवाटेवरील वाचाळवीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 05:20 IST

पुढील लोकसभा निवडणुकीला एक वर्षाहून अधिक काळ बाकी आहे. तरीही देशभरातील राजकीय आसमंत मात्र २०१९च्या निवडणुकीत काय होणार, याच प्रश्नाने व्यापून गेले आहे

पुढील लोकसभा निवडणुकीला एक वर्षाहून अधिक काळ बाकी आहे. तरीही देशभरातील राजकीय आसमंत मात्र २०१९च्या निवडणुकीत काय होणार, याच प्रश्नाने व्यापून गेले आहे. मुळात मोदी सत्तारूढ झाले तेंव्हापासूनच या चर्चेला सुरुवात झाली होती. लोकसभेतील दिग्विजयानंतरही मोदी-शहा जोडगोळीच्या विजयरथाचे वारू चौफेर उधळत होते; त्यामुळे २०१९लासुद्धा मोदीच अशी बतावणी खुद्द विरोधी बाकांवरील नेते करीत. गुजरातमधील निवडणुकीत भाजपाची दमछाक उडाली आणि देशातील राजकीय चित्रच बदलून गेले. एकीकडे एकवटणारे विरोधक आणि दुसरीकडे सरकारविरोधी असंतोषाचे सूर यामुळे मोदी-शहा जोडगोळीही सावध झाली आहे. बदलत्या राजकीय समीकरणांचा अंदाज घेत नव्याने डावपेच आखण्याची पंतप्रधानांची मनीषा भाजपा आणि संघ परिवारातील नेत्यांच्या निर्बुद्ध मुक्ताफळांनी उधळली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळेच तोंडाला आवर घाला, माध्यमांना मसाला पुरवू नका, अशी तंबीच मोदींनी दिली. परंतु, चार वर्षे ज्यांनी बेलगामपणे आपल्या जिभेचा दांडपट्टा फिरविला त्यांना अचानक स्वत:ला सावरणे अवघड झाले आहे. या तोंडपाटीलकीला तसेच खास कारण आहे. डायना हेडनपेक्षा ऐश्वर्याचे सौंदर्य जास्त भारतीय आहे, नारदमुनी म्हणजे त्या काळचे गुगल, पुराणातली विमाने, गणपतीची सर्जरी वगैरे भाषा पहिल्यांदाच बोलली गेली असे नाही. इतकी वर्षे उजव्या चळवळीतील मंडळी हीच भाषा बोलत आले आहेत. सत्तेच्या परिघाबाहेर होते तोपर्यंत या गोष्टी लपून राहिल्या. भारतीयत्व, आहार, विहार, भाषा, पेहराव, स्वातंत्र्यलढा अशा अनेक बाबतींत उजव्यांची समज बाळबोध ठरते. वर्षानुवर्षे जो अर्धवट विचार पकडून ठेवला, ज्या भ्रामक समजांवरच विचारविश्व उभारले ते असे लगेच कसे नाकारणार? नारदाला गुगल व महाभारतातील संजयरूपी टीव्हीचा संस्कार कसा पुसायचा? वर्तमानात देशी बनावटीचे एकही विमान बनविणे शक्य नसताना पुराणकाळातील हवाई प्रवासाचा अभिनिवेश कसा टाळायचा? मोदींनी भाजपा नेत्यांना जीभ आवरण्याचा सल्ला दिला तरी तो मानवणार कसा? गायीच्या शेणामुळे किरणोत्सर्ग रोखला जातो म्हणून मोबाइलला कायम शेण लावणारे अखिल भारतीय नेते आजही संघ परिवारात आहेत. नियमित बौद्धिक व चिंतन शिबिरात रमणाऱ्यांची ही अवस्था कशाने झाली, याचा प्रामाणिक खल भाजपा, संघ आणि एकूणच उजव्या चळवळीला करावा लागणार आहे. तोपर्यंत मोदींच्या विकासवाटेवरील वाचाळवीरांचे अडथळे सनातन मानावे लागतील.