पदातुराणाम्
By Admin | Updated: March 18, 2015 23:10 IST2015-03-18T23:10:32+5:302015-03-18T23:10:32+5:30
काँग्रेसचे शिवाजीराव देशमुख यांच्याविरुद्ध अविश्वासाचा ठराव मंजूर करून त्यांना घालवायला राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाशी केलेली युती हे एक अपेक्षित राजकारण आहे.
पदातुराणाम्
राज्य विधान परिषदेच्या सभापतिपदावर असलेले काँग्रेसचे शिवाजीराव देशमुख यांच्याविरुद्ध अविश्वासाचा ठराव मंजूर करून त्यांना घालवायला राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाशी केलेली युती हे एक अपेक्षित राजकारण आहे. ‘या प्रश्नावर आम्ही एकत्र आलो असलो तरी आमचे राजकारण स्वतंत्र आहे’ ही त्या प्रश्नावर राष्ट्रवादीच्या सुनील तटकऱ्यांनी केलेली मल्लिनाथी केवळ करमणूक करणारी आहे आणि ती विश्वसनीयही नाही. अशा घटना एकाएकी वा अकल्पितपणे घडत नाहीत. त्यामागे दीर्घकाळची योजना व भविष्यकाळचे नियोजन असते. नरेंद्र मोदी बारामतीला जाऊन शरद पवारांना भेटले त्याआधीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे भाजपाबाबतचे तळ्यात आणि मळ्यात सुरू होते. पवार आणि मोदी यांच्या भेटी होतच होत्या आणि महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकार यांच्यावर टीका करताना राष्ट्रवादीचे इतर पुढारीही हातचे राखून बोलतानाच दिसत होते. ‘आम्ही जात्यात आहोत (म्हणजे भरडले जात आहोत)’ ही तटकऱ्यांची भाषा यासंदर्भात बरेच काही सांगून जाणारी आहे. अजित पवार आणि तटकरे यांच्याविरुद्ध सिंचन घोटाळ्यात अडकलेल्या हजारो कोटींच्या अपहाराची चौकशी सुरू आहे. त्यांच्याच पक्षाच्या छगन भुजबळांना त्यांच्या दोन बछड्यांसह अनेक चौकशांना सामोरे जावे लागत आहे. राष्ट्रवादीचे ठिकठिकाणचे पुढारी असे चौकशांच्या घेऱ्यात अडकले असताना पवारांनी मोदींशी मैत्र साधणे याचा अर्थ शाळकरी पोरांनादेखील समजणारा आहे. तिकडे भाजपालाही दरदिवशीची शिवसेनेची कुरकूर सहन होईनाशी झाली आहे. प्रत्यक्ष संसदेत सरकारने आणलेल्या भूमी अधिग्रहणाच्या विधेयकावर तटस्थ राहण्याची भूमिका घेऊन सेनेने भाजपाला राष्ट्रीय पातळीवरच डिवचले आहे. शिवाय राज्यातल्या सरकारला धारेवर धरण्याची एकही संधी सोडायची नाही असा तिचा खाक्या आहे. हलक्या दर्जाची व कमी मंत्रिपदे दिल्यामुळे आणि शिवसेनेच्या राज्यमंत्र्यांना भाजपाचे कॅबिनेट मंत्री कामच करू देत नसल्यामुळे सेना संतप्त आहे. सेनेचा हा संताप उद्या आणखी वाढला आणि तिने सरळसरळ विरोधी भूमिका घ्यायचे ठरविले तर भाजपाला राज्यातली सत्ता राखायला एका मित्रपक्षाची गरज आहेच. राष्ट्रवादी काँग्रेस हा सत्तेतली कोणतीही रिकामी जागा भरून काढण्यासाठी हपापला असलेला पक्ष आहे. आपण कोणाशी युती करावी व कोणापासून दूर रहावे याचा जराही वैचारिक विधिनिषेध नसलेला तो पक्ष आहे. त्यामुळे त्याला सोबत घेऊन शिवसेनेला एक वचक घालून देणे हे भाजपाच्या राजकारणातही बसणारे आहे. शिवाजीराव देशमुख यांच्यावरील अविश्वासाच्या ठरावाच्या निमित्ताने भाजपा व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी आपापला डाव असा साधला आहे. राष्ट्रवादी पक्षाला काँग्रेस पक्ष हा त्याचा सर्वात मोठा शत्रू वाटतो तर भाजपाला सेनेची रोजची कटकट असह्य होऊ लागली आहे. या राजकारणात शिवाजीराव देशमुख या गंभीर प्रकृतीच्या नेत्याला अकारण निमित्त व्हावे लागले हाच केवळ यातला दु:खद वाटावा असा भाग आहे. मात्र यातून महाराष्ट्राच्या राजकारणाची भावी दिशाही उघड झाली आहे. आता विधान परिषदेच्या सभापतिपदी राष्ट्रवादीची आणि उपसभापतिपदावर भाजपाची वर्णी लागणार. त्यातून विणले जाणारे मैत्रीचे धागे एकीकडे शिवसेनेच्या मानेभोवती आवळत जाणार आणि दुसरीकडे काँग्रेस पक्षाला नगण्य ठरविण्यावर त्यांच्या राजकारणाचा भर असणार. शरद पवार हे तसेही देशाच्या राजकारणात त्यांच्या विश्वसनीयतेविषयी व राजकीय निष्ठेविषयी कधी ख्यातनाम नव्हतेच. गेली ४० वर्षे या बोटावरची थुंकी त्या बोटावर झेलतच त्यांनी त्यांचे राजकारण केले व महाराष्ट्राला मागे राखत त्याला ताब्यातही ठेवले. राष्ट्रवादीची अशी आपसूक मिळणारी मदत ही भाजपाचीही गरज आहे. या साऱ्या प्रकारावर भाजपाच्या एकनाथ खडशांचे म्हणणे काय? तर ‘भारत काँग्रेसमुक्त करण्याच्या आमच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून आम्ही या अविश्वासाच्या ठरावाकडे पाहतो’. मराठी माणूस आणि मतदार या वक्तव्यातील लबाडी न ओळखण्याएवढा भाबडा आहे असे खडशांना वाटत असेल तर त्यांच्या तशा समजातच त्यांना राज्याचे मुख्यमंत्रिपद का नाकारले गेले या प्रश्नाचे उत्तरही सापडण्याजोगे आहे. एवढ्या महत्त्वाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री गप्प राहतात आणि खडसे असे काहीबाही बोलून तोंडघशी पडतात यातून त्यांच्यातले पक्व कोण आणि अपक्व कोण हेही साऱ्यांच्या लक्षात येते. काही का असेना या घटनेने महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळी दिशा दिली आहे हे महत्त्वाचे. यापुढचा काळ भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या मैत्रीचा आणि शिवसेनेच्या घरातल्या घरात होणाऱ्या कोंडीचा आहे. तशी स्थिती हे पक्ष गेल्या काही महिन्यांपासून अनुभवतही आहेत. यापुढल्या काळात तिची तीव्रताच तेवढी वाढणार आहे. काँग्रेस पक्षाला व शिवाजीराव देशमुखांना या साऱ्या प्रकारात एक पदच तेवढे गमावावे लागले आहे. इतरांना मात्र त्यांची सारी राजकीय प्रतिष्ठाच त्यासाठी मातीत घालावी लागली आहे. सत्तेची ओढ व पदांची लालसा राजकारणी माणसांना कोणत्याही खालच्या पातळीवर कशी नेते याचे याहून दुसरे वाईट उदाहरण कोणते असणार नाही.