अरविंद केजरीवाल यांच्या राजकीय पुनरुज्जीवनाची शक्यता?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 06:34 AM2020-01-21T06:34:23+5:302020-01-21T06:36:10+5:30

लोकसभा निवडणुकीत भाजपला अपूर्व यश मिळाल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांची आम आदमी पार्टी आता संपुष्टात येणार, अशी चिन्हे दिसत होती. मात्र...

The possibility of Arvind Kejriwal's political revival? | अरविंद केजरीवाल यांच्या राजकीय पुनरुज्जीवनाची शक्यता?

अरविंद केजरीवाल यांच्या राजकीय पुनरुज्जीवनाची शक्यता?

Next

- संतोष देसाई
(माजी सीईओ फ्यूचर ब्रॅन्डस्)

लोकसभा निवडणुकीत भाजपला अपूर्व यश मिळाल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांची आम आदमी पार्टी आता संपुष्टात येणार, अशी चिन्हे दिसत होती. मध्य प्रदेश आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीत तो पक्ष नावालाही उरला नाही. त्यामुळे ज्या एकमेव क्षेत्रात त्याचे अस्तित्व आहे त्या क्षेत्रातूनही त्याचे उच्चाटन होईल की काय, असे वाटू लागले होते. आपने दिल्लीत जे काम केले ते विधानसभेतील सत्तारूढ पक्षाने करण्यापेक्षा महापालिकेतील सत्तारूढ पक्षाने केल्याप्रमाणे वाटत होते आणि त्या सर्वाचे श्रेय मनीष सिसोदिया यांना न मिळता फक्त आणि फक्त केजरीवाल यांनाच मिळत होते. केजरीवाल हे नेहमी केंद्रीय सत्तेविरुद्ध संघर्ष करताना दिसत होते. त्यामुळे स्वत:च्या अपयशाचे खापर ते केंद्रावर फोडू इच्छित आहेत, असेच वाटत होते. ‘आप’ची सदैव कुरकुर सुरू असल्यामुळे भाजपला मतदान करणे हाच चांगला पर्याय राहील, ही भावना लोकमानसात बळावत होती.

पण काही काळातच ही परिस्थिती पालटली. नुकत्याच घेण्यात आलेल्या जनमत चाचणीतून आम आदमी पार्टी पुन्हा सत्तेत येण्याचे संकेत मिळाले आहेत आणि मुख्यमंत्रीपदासाठी केजरीवाल वगळता अन्य कुणी दावेदार दिसत नाही. निवडणुकीला अद्याप वेळ असताना घेण्यात आलेल्या या ओपिनियन पोलविषयी निश्चितच विश्वासार्हता वाटत होती. कारण गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीनंतर परिस्थितीत खूपच बदल झाल्याचे दिसून येत आहे. मीडियादेखील केजरीवाल यांची उपेक्षा न करता त्यांची दखल घेत त्यांना जास्त वेळ देऊ लागला आहे आणि केजरीवालदेखील आत्मविश्वासाने मीडियाला सामोरे जाताना दिसत आहेत. त्यांनी आपल्या धोरणात बदल केल्याचे दिसत आहे. मुख्य म्हणजे नरेंद्र मोदींशी पंगा न घेण्याचे धोरण त्यांनी स्वीकारल्याचे दिसते. तसेच कोणत्याही राष्ट्रीय विवादात अडकून न पडण्याचेही त्यांनी ठरवलेले दिसते. त्यामुळे जेएनयूच्या वादापासून स्वत:ला दूर ठेवणे त्यांनी पसंत केले आहे. इतकेच नव्हे तर सीएए, एनआरसी वादापासूनही ते दूर राहताना दिसतात. अर्थात, ही गोष्ट अनेकांना रुचलेली नाही. पण त्यांनी मात्र याबाबत जाणीवपूर्वक निर्णय घेतल्याचे दिसते. याबाबतीत केंद्राशी संघर्ष घेताना ते कुठेही आढळले नाहीत. त्यांनी स्वत:समोर एकच उद्दिष्ट ठेवले आहे आणि ते आहे गेल्या पाच वर्षांत त्यांच्या पक्षाने दिल्लीत केलेले काम लोकांसमोर ठळकपणे मांडण्याचे!

दुसरी लक्षात येण्यासारखी बाब म्हणजे त्यांची ओळख असलेल्या मफलरचा त्यांनी त्याग केला आहे! तसा हा बदल क्षुल्लक वाटणारा असला तरी तो उपेक्षणीय नक्कीच नाही. राजकारणात बदल घडवण्याचा प्रयत्न एक सामान्य माणूस करीत आहे, ही स्वत:ची प्रतिमा बदलून टाकण्याचा त्यांचा हेतू स्पष्टच दिसतो. देशात घडणाऱ्या अन्य घडामोडीही त्यांना साह्यभूत ठरत आहेत. महाराष्ट्र आणि झारखंडमधील सत्तापरिवर्तनाने त्यांचे नीतीधैर्य नक्कीच उंचावले असेल. राज्यात भाजपचा पराभव होऊ शकतो, तो पक्ष अजेय नाही, हेही त्यांना जाणवले असेल. याशिवाय प्रशांत किशोर हे त्यांच्या मदतीला असल्यामुळे त्यांचा अनुभव त्यांना धोरण ठरविताना उपयोगी पडेल. दिल्लीत काँग्रेसला या वेळी उतरती कळा हा त्यांच्यासाठी उत्साहवर्धक संकेत आहे. त्यामुळे भाजपविरोधी मते आपच्या दिशेने वळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजपचे मनोज तिवारी हे दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून त्यांना आव्हान देण्यात कमी पडणारे आहेत.



या सर्व पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल यांचे पुनरुज्जीवन केंद्र सरकारसाठी धोक्याचा संदेश देणारे ठरत आहे. लोकांच्या दैनंदिन गरजांपासून दूर असलेल्या विषयावर केंद्र सरकार भर देत असताना, केजरीवाल मात्र सामान्य माणसाच्या जिव्हाळ्याच्या विषयांकडे लक्ष देत आहेत आणि ते मतदारांना आकर्षित करीत आहेत. याउलट देशाच्या आर्थिक दुरवस्थेकडे भाजप दुर्लक्ष करीत असून, लोकांसमोर असलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याकडे तो पक्ष दुर्लक्ष करताना दिसत आहे. त्यामुळे मतदार भाजपवर नाराज होण्याची अधिक शक्यता आहे. उलट भाजपने मतदारांसाठी जे विषय निवडले आहेत, ते केजरीवाल यांच्यासाठी लाभदायक ठरताना दिसत आहेत.

एक पक्ष स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी भूतकाळात घडलेल्या घटकांना प्राधान्य देत आहे, तर त्याच वेळी दुसरा पक्ष मात्र लोकांचे शिक्षण, आरोग्य, पाणी, वीज यांसारख्या दैनंदिन जिव्हाळ्याच्या प्रश्नांना हात घालीत आहे. केंद्रातील सत्तारूढ पक्षाला लोकांच्या दैनंदिन जिव्हाळ्याच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यात रस उरलेला नाही, असेच एकूण चित्र दिसत आहे. अर्थात, हा सर्व अंदाज आहे. केजरीवाल हे अधिक तणावमुक्त दिसत आहेत, याचा अर्थ त्यांनी निवडणूक जिंकलीच आहे, असा मात्र नाही. कारण भाजपजवळ फार मोठी निवडणूक यंत्रणा आहे. त्याने नुकतीच दोन राज्यांतील सत्ता गमावली असली तरी, महाराष्ट्रात त्याने आघाडी केलेल्या पक्षासोबत निवडणुकीत यश मिळवले होते. तसेच झारखंडमध्ये त्या पक्षाला मिळालेल्या मतदानात वाढ झाली आहे. आता दिल्लीच्या निवडणुका अंतिम टप्प्यात आल्या असताना, अखेरच्या क्षणी तो पक्ष एकूण चित्रात बदल घडवून आणू शकतो. अर्थात, याचा अर्थ अरविंद केजरीवाल आणि त्यांची आम आदमी पार्टी संपून जाईल, असा कुणी काढू नये!

Web Title: The possibility of Arvind Kejriwal's political revival?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.