पॉपस्टार ब्रिटनी अजूनही वडिलांच्या ‘कैदे’त!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2021 07:14 AM2021-07-06T07:14:44+5:302021-07-06T07:15:39+5:30

ब्रिटनीने अमेरिकेच्या न्यायालयात आपल्या वडिलांविरुद्ध तक्रार करताना त्यांच्या ‘कैदे’तून आपली मुक्तता करावी, अशी विनंती केली होती.

Popstar Britney is still in her father's 'prison'! | पॉपस्टार ब्रिटनी अजूनही वडिलांच्या ‘कैदे’त!

पॉपस्टार ब्रिटनी अजूनही वडिलांच्या ‘कैदे’त!

Next

‘प्रिन्सेस ऑफ पॉप’ ब्रिटनी स्पीयर्स! ज्यांना पॉप संगीताची आवड आहे त्यांना अमेरिकेची ही गायिका, अभिनेत्री, नर्तिका आणि गीतकार असलेली अष्टपैलू कलावंत माहीत नाही, असे होणे जवळपास अशक्य. संपूर्ण जगात तिचे चाहते आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या ग्रॅमी पुरस्कारानेही तिला सन्मानित करण्यात आले आहे. तिच्या पॉप गाण्यांच्या कोट्यवधी प्रति आजवर जगभरात विकल्या गेल्या आहेत. २०१२ साली स्पीयर्स ही जगातील सर्वाधिक मानधन मिळवणारी महिला गायक होती. तिने प्रचंड पैसा  कमावला, पण आजही ती स्वत:च्या मर्जीने पैसा खर्च करू शकत नाही किंवा स्वत:बाबतचे निर्णय घेऊ शकत नाही. याचे कारण आहे, तिचे स्वत:चे वडील जेमी स्पीयर्स! 

ब्रिटनीने अमेरिकेच्या न्यायालयात आपल्या वडिलांविरुद्ध तक्रार करताना त्यांच्या ‘कैदे’तून आपली मुक्तता करावी, अशी विनंती केली होती. सध्या ३९ वर्षांची असलेली ब्रिटनी म्हणते, “मी माझ्या मनानं काहीच करू शकत नाही. गेली तेरा वर्षं माझ्या जीवनावर माझे वडीलच हक्क गाजवताहेत. माझ्या इच्छेविरुद्ध मला काम करण्यासाठी मजबूर केलं जातंय. मला बळजबरी ड्रग्ज (औषधं) दिली जाताहेत. माझं आयुष्य मला परत हवंय. मी माझ्या प्रियकराबरोबर लग्न करू इच्छिते. मला स्वत:चा संसार थाटायचाय. मला मुलं हवीत, पण मी ना लग्न करू शकत, ना मुलं जन्माला घालू शकत. माझ्या प्रत्येक कृतीवर बंधनं आहेत. एवढंच काय, मी गर्भवती राहू नये यासाठी माझ्या शरीरात एक ‘बर्थ कंट्रोल डिव्हाइस’ बसवण्यात आलं आहे. तेही मी माझ्या मर्जीनं काढू शकत नाही. १३ वर्षे हा छोटा काळ नाही. मला आता तरी माझ्या मनानं आयुष्य जगता आलं पाहिजे. माझे निर्णय मला स्वत:ला घेता आले पाहिजेत. माझ्याच शरीराचा आणि संपत्तीचा वापर मला स्वत:ला करता येत नाही, हे खूप अन्यायकारक आहे!”

जगभरात अनेकांनी तिच्या मागणीला पाठिंबा दर्शवताना समाजमाध्यमांवर #FreeBritney या हॅशटॅगखाली माेहीमही सुरू केली. सुशांतसिंग राजपूत मृत्यूप्रकरणी चर्चेत असणारी बॉलीवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिनेदेखील इंस्टाग्रामवर ब्रिटनीला पाठिंबा दर्शविला आहे. पण, नजीकच्या काळात तरी ब्रिटनीला आपले स्वातंत्र्य परत मिळणार नाही, असे दिसतेय. कारण गेल्याच आठवड्यात कोर्टाने ब्रिटनीच्या विरोधात निकाल देत तिच्या संरक्षणाचा अधिकार (कॉन्झरवेटिव्हशिप) तिच्या वडिलांकडेच ठेवला आहे.

अर्थात त्यालाही कारण आणि दीर्घ इतिहास आहे. २००८ मध्ये ब्रिटनीने तिचा तत्कालीन पती फेडरलाइनपासून घटस्फोट घेतला. त्यानंतर ती नैराश्यात गेली होती. हे पाहून तिचे वडील जेमी स्वत: कोर्टात गेले  आणि ब्रिटनीच्या कॉन्झरवेटिव्हशिपचा अधिकार आपल्याकडे मागितला होता. तेव्हापासून कोर्टाने ब्रिटनीच्या सर्व वैयक्तिक आणि व्यावसायिक बाबींचे अधिकार जेमी यांच्याकडे सुपूर्त केले. वडिलांचा तो अधिकार आता तरी संपावा यासाठी ब्रिटनीने कायदेशीर मार्गांचा आधार घेतला; पण त्यात तिला सपशेल अपयश आले आहे. “मला त्रास देण्यासाठी, माझा मानसिक छळ करण्यासाठीच माझे वडील असं करताहेत, मुलगी म्हणून त्यांचं माझ्यावर काडीचंही प्रेम नाही. त्यांना सगळा रस आहे तो माझ्या संपत्तीत. माझ्यावर ‘कंट्रोल’ ठेवणं आणि मला ‘हर्ट’ करणं यातच त्यांना जास्त मजा वाटते,” असं ब्रिटनीचं म्हणणं आहे. पण, तिचे वडील जेमी यांच्या वकिलांनीही एक निवेदन जाहीर केलं आहे. त्यात म्हटलं आहे, ‘माझ्या मुलीला; ब्रिटनीला त्रास होतोय, वेदना होताहेत हे पाहून मलाही अतीव दु:ख होतंय. माझं माझ्या मुलीवर प्रेम आहे आणि तिच्या भल्यासाठीच मी सगळं काही करतोय. मला तिची खूप आठवण येते..’ 

गेल्या वर्षीही ब्रिटनीने कोर्टाकडे आपल्या वडिलांना हटवण्याची आणि आपल्या संपत्तीबाबत निर्णयाचा सर्वाधिकार ‘बेसेमर ट्रस्ट’कडे द्यावा अशी विनंती केली होती; पण तेव्हाही तिची ही मागणी फेटाळ्यात आली. ‘को-कॉन्झरवेटर’ म्हणून कोर्टानं जेमी स्पीयर्स यांना कायम ठेवले. ब्रिटनीची मागणी कोर्टाने फेटाळली असली, तरी ब्रिटनी त्याविरुद्ध पुन्हा अपील करणार आहे. वडिलांना हटवून ट्रस्टकडे आपल्या संपत्तीचा अधिकार द्यावा, अशी तिची मागणी कायम आहे. त्यासाठीची कागदपत्रांची पूर्तता मात्र ब्रिटनीने केली नव्हती. त्यामुळे याबाबतची कागदपत्रे पुन्हा कोर्टात जमा करून ती ‘न्याय’ मागणार आहे. तिच्या ‘स्वातंत्र्या’च्या मागणीला कधी मूर्त स्वरूप येईल हे सध्या तरी कोर्टाच्या निर्णयावर अवलंबून आहे.

ब्रिटनीला का नाहीत अधिकार?
जे लोक आपला स्वत:चा निर्णय स्वत: घेऊ शकत नाहीत, त्याबाबत ते अक्षम असतात, त्यांच्या हिताचे निर्णय घेण्याचा अधिकार अशा एखाद्या व्यक्तीला दिला जातो, जो त्या व्यक्तीच्या जवळचा आहे. त्याला ‘कॉन्झरव्हेटर’ असं म्हटलं होतं. कोर्ट हे अधिकार या संरक्षकाला बहाल करतं. ब्रिटनीच्या घटस्फोटानंतर ब्रिटनीची संपत्ती, तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक निर्णयांचा अधिकार कोर्टानं जेमी यांना दिला होता. तो अजूनही कायम असल्यानं ब्रिटनी अजूनही ‘पारतंत्र्या’त आहे. आपले अधिकार आपल्याला परत मिळावेत यासाठी ती प्रयत्नशील आहे.

Web Title: Popstar Britney is still in her father's 'prison'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.