राजकारण हा सत्तासुंदरीचा विदुषकी खेळ नव्हे!
By Admin | Updated: February 15, 2017 00:29 IST2017-02-15T00:29:24+5:302017-02-15T00:29:24+5:30
एका टी.व्ही. चॅनलवर कपिल शर्मा यांचा रिअॅलिटी शो होत असतो. त्यात कपिल शर्मा हे लोकांना हसत राहण्याचा सल्ला देत असतात

राजकारण हा सत्तासुंदरीचा विदुषकी खेळ नव्हे!
एका टी.व्ही. चॅनलवर कपिल शर्मा यांचा रिअॅलिटी शो होत असतो. त्यात कपिल शर्मा हे लोकांना हसत राहण्याचा सल्ला देत असतात व आपल्या विदूषकी चाळ्यांनी दर्शकांना हसवितही असतात. या कार्यक्रमात डॉ. गुलाटी नावाचे एक पात्र आहे. ते आपल्या विदूषकी चाळ्यांनी लोकांना खूप हसवित. त्यांच्या बोलण्याला शेंडा बुडखा काही नसतो. ते स्वत:चा परिचय देताना आपल्या डिगऱ्यांची नावेही सांगतात. त्यात एक डिग्री एम.बी.के.एच. अशी असते. त्या डिग्रीचा अर्थ विचारला तर ते सांगतात, ‘मै बकवास करता हूँ’ म्हणजे मै साठी एम., बकवास साठी बी., करता साठी के आणि हूँ साठी एच. आपल्या डिग्रीचे वर्णन ते अशातऱ्हेने करतात की दर्शकांना हसू आल्याशिवाय राहत नाही. सध्या निवडणुकीच्या धामधुमीत राजकीय नेत्यांच्या भाषणात याच तऱ्हेचा विनोद पहावयास मिळतो. पंजाब, गोवा, उत्तर प्रदेश आदि राज्यांच्या निवडणूक प्रचारात राजकीय नेते डॉ. गुलाटीप्रमाणेच बकवास करीत आहेत. त्याची सुरुवात अर्थातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
सध्या राजकारणात घोटाळे किंवा स्कॅम बरेच चर्चेत आहेत. स्कॅम या इंग्रजी शब्दात एस.सी.ए.एम. ही इंग्रजी अक्षरे आहेत. त्याची फोड करून सांगताना नरेंद्र मोदी यांनी एस. म्हणजे समाजवादी, सी. म्हणजे काँग्रेस, ए. म्हणजे अखिलेश आणि एम. म्हणजे मायावती असे त्या शब्दाचे विश्लेषण करून या चौघांपासून उत्तर प्रदेशला वाचवण्याचे त्यांनी मतदारांना आवाहन केले. त्याला उत्तर देताना अखिलेश यादव यांनी स्कॅमचा अर्थ सेव्ह कण्ट्री फ्रॉम अमित शहा अॅण्ड मोदी असा केला. तर राहुल गांधी यांनी स्कॅम शब्दाचे विश्लेषण सर्व्हिस, करेज (साहस), अॅबिलिटी आणि मोडेस्टी असे केले. राहुल गांधींच्या विश्लेषणाची नरेंद्र मोदींनी लोकसभेत भाषण देताना भरपूर टिंगलटवाळी केली.
मोठ्या नेत्यांच्या याचतऱ्हेच्या वक्तव्याला बालिशपणाच म्हणता येईल. पूर्वी आमच्या बालपणी आम्ही शब्दांची कसरत करून एकमेकांची टिंगल टवाळी करीत होतो. आता ते काम राजकीय नेते करू लागले आहेत असे दिसते. पण असे खेळ करून राजकीय नेत्यांनी सारे राजकारणच बालिश करून सोडले आहे. मग तो नेता कोणत्याही पक्षाचा का असेना, त्यांच्या वक्तव्यात पोक्तपणाचा, गांभीर्याचा अभावच जाणवतो. आपल्या देशाचे राजकारण तत्त्वशून्य होताना दिसते. मूल्ये आणि आदर्शाचे राजकारण केव्हाच मागे पडले आहे. ‘अच्छे दिन आनेवाले हैं’ हा ‘चुनावी जुमला’ असल्याचे अमित शहांनीच सांगून टाकले हे बरे झाले? यालाच संधिसाधूपणाही म्हणतात. सत्ता आपल्या हातात कशी येईल, याचे राजकारण सध्या सुरू आहे. ही सत्तादेखील लोकांची सेवा करण्यासाठी नको असते तर स्वत:चे भोग पूर्ण करण्यासाठी हवी असते.
गेल्या सार्वत्रिक निवडणूक प्रचारात भ्रष्टाचार आणि विकासाच्या मुद्द्यांवरच मते मागण्यात आली आणि मतदारांनीही बहुधा नेत्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्यांच्या पारड्यात मते टाकली. त्यानंतर याचतऱ्हेचे वक्तव्य हा ‘चुनावी जुमला’ होता असे सांगतानाही पक्षाच्या नेत्यांना लाज वाटली नाही. विदेशातील काळा पैसा आणून तो प्रत्येक नागरिकाच्या खात्यात जमा करण्याचे आश्वासन हेही याच तऱ्हेचे फसवे आश्वासन होते. तेव्हा काळा पैसा नागरिकांना देण्याची घोषणा करण्यात आली होती. हा पैसा का जमा करण्यात आला नाही याची विरोधी पक्षाकडून विचारणा होत आहे.
राजकीय नेत्यांनी एकमेकांना सवाल जवाब करण्याचे नाटक जरूर करावे. पण लोकांनीही या नेत्यांना विचारायला हवे की त्यांनी आमच्या भावनांसोबत हा खेळ कशासाठी मांडला आहे. लोकांना ‘स्कॅम’ या शब्दाचा अर्थ समजत नाही इतकी जनता दुधखुळी राहिलेली नाही. तेव्हा राजकीय नेत्यांनी त्यातून निरनिराळे अर्थ काढून लोकांना भुलविण्याचे काम करू नये. राजकारण हा लोकशाहीसाठी गंभीर विषय असतो व त्याचा संबंध सरळ लोकांच्या जीवनाशी असतो. लोकांचे वर्तमान आणि भविष्य प्रभावित करण्यालाच राजकारण म्हटले जाते. राजकारण म्हणजे शिव्या देणे किंवा पैसे कमावण्याचा तो उद्योगही नाही. तर लोकांचे भवितव्य घडविण्याचे माध्यम म्हणूनच राजकारण अस्तित्वात असते. पण राजकारणाच्या ठेकेदारांनी गेल्या ६०-७० वर्षांत राजकारणाचा अर्थच बदनाम करून टाकला आहे. त्यामुळे सगळे राजकारण हाच एक मोठा घोटाळा बनला आहे. आजच्या राजकारणात तत्त्वनिष्ठेला आणि मूल्यांना स्थानच उरले नाही. त्यामुळे आम्ही मूल्याधिष्ठित राजकारण करीत असतो असा दावा कोणताही राजकीय पक्ष करू शकत नाही, अशी सध्याची स्थिती आहे.
एकूणच राजकारण हा सत्तासुंदरीचा विदूषकी खेळ बनला आहे. त्यात प्रत्येक विदूषक हा स्वत:ला सर्वात महान समजत असतो आणि इतरांना तुच्छ लेखत असतो. सारी जनता आपल्या मुठीत आहे अशा भ्रमात राजकीय नेते असतात आणि आपण आपल्या तालावर जनतेला नाचवू शकतो असे नेत्यांना वाटत असते. तेव्हा या नेत्यांना आता विचारायची वेळ आली आहे की तुम्ही जे काही बोलता आहात, त्याचा तुम्हाला अर्थ तरी समजतो का? तुमच्या कृतीचा काय परिणाम होईल याची तुम्हाला जाणीव तरी आहे का? नेते परिस्थितीनुसार आपल्या वक्तव्यात बदल करीत असतात आणि स्वत:च्या टोप्याही बदलत असतात. सध्या होऊ घातलेल्या निवडणुकांतून कितीतरी नेत्यांनी स्वत:च्या टोप्या बदलल्या. तेव्हा त्यांना विचारायला हवे की एका रात्रीत तुमच्या विचारात असे परिवर्तन कसे झाले? जी व्यक्ती विरोधी पक्षात असेपर्यंत घोटाळेबाज म्हणून ओळखली जात होती ती पक्षांतर केल्याने एकदम शुद्ध चारित्र्याची कशी काय होऊ शकते? अनेक वर्षे एखाद्या पक्षात राहिलेल्या नेत्याला आपल्या पक्षात घेताना कोणत्याही पक्षाला तिळमात्र संकोच वाटत नाही. दुर्दैव हे आहे की भ्रष्टाचाराचा डाग प्रत्येकालाच लागला आहे. एक दिवस अचानक उत्तर प्रदेशच्या काँग्रेसच्या अध्यक्षांना साक्षात्कार होतो की आपण चुकीच्या पक्षात आहोत आणि भाजपाच्या नेत्याला वाटू लागते की आपण चुकीने काँग्रेसमध्ये होतो आणि मग तिच्या गळ्यात तिरंग्याऐवजी भगवा पट्टा बांधण्यात येतो! हे केवळ संधिसाधूपणाचे उदाहरण नाही तर आमच्या राजकारणात आता तत्त्वनिष्ठेला आणि मूल्यांना काही स्थान उरलेले नाही हे दर्शविणारे कृत्य आहे.
आज भाजपाचे नेते मायावतींवर कठोर टीका करीत असतात. पण याच भाजपाने दोनदा मायावतींसोबत सरकारमध्ये स्थान मिळविले होते ही चूक कबूल करायला ते तयार नाहीत. आपल्या चुकांबद्दल कोणत्याही राजकीय नेत्याला ना पश्चाताप होतो ना लाज वाटते. मतदार हा मूर्ख आहे असाच त्यांचा समज असतो. ही स्थिती आपल्या देशाच्या लोकशाहीसाठी घातक तर आहेच पण या लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांसाठी धोकादायकही आहे. तेव्हा यापुढे नागरिकांनी चुकीला चूकच समजले पाहिजे आणि मतदारांना मूर्ख समजण्याचा अधिकार कुणालाही नाही हे स्पष्टपणे सांगायला हवे. राजकारणातल्या अशातऱ्हेच्या विदूषकांची कृत्ये निव्वळ हसण्यावारी नेण्याऐवजी, त्यांना याची जाणीव करून देण्याची गरज आहे की जनतेला सर्व काही समजते!
विश्वनाथ सचदेव
(ज्येष्ठ पत्रकार)