नांगरणी
By Admin | Updated: May 30, 2016 03:04 IST2016-05-30T03:04:22+5:302016-05-30T03:04:22+5:30
समाजपुरुषाचे लघुरूप म्हणून मानवी शरीराचा विचार करण्याची विचारदिशा फार प्राचीन आहे.

नांगरणी
समाजपुरुषाचे लघुरूप म्हणून मानवी शरीराचा विचार करण्याची विचारदिशा फार प्राचीन आहे. भगवान गौतम बुद्धांच्या जीवनातील एक कथा या संदर्भात विलक्षण बोलकी ठरते. पावसाळा तोंडावर आल्याने पेरणीची लगबग सर्वत्र सुरू असताना बुद्ध एका शेताच्या मेरेवरून चालले होते. रानात शेतकऱ्याने औत धरले होते. मन लावून शेतकरी औत हाकत होता. मात्र औताचा तास तिरकाच पडत राहिल्याचे बुद्धांच्या ध्यानात आले. ‘‘अरे, तुझा तास सरळ नाही तर तिरका आहे,’’ असे बुद्धांनी टोकताच, नाही म्हटले तरी शेतकरी वरमलाच. ‘‘अहो संन्यासीबाबा, औत हाकण्यातले आपल्याला काय कळते? आपण काय शेतकरी आहात का?’’ शेतकऱ्याने भगवान बुद्धांना अंमळ त्रासूनच प्रश्न केला. मुखावरची शांती आणि हासू कणभरही ढळू न देता बुद्ध उत्तरले, ‘‘होय, मीसुद्धा तुझ्यासारखा एक शेतकरीच आहे.’’ आता अचंबित होण्याची पाळी होती शेतकऱ्याची! ‘‘महाराज आपण कधी शेती केलीत? कोठे आहे तुमचे शेत?’’ तो शेतकरी विचारता झाला. बुद्ध हसले. म्हणाले, ‘‘अरे, हे माझे शरीर दिसते आहे ना तेच माझे शेत. यातील मन हेच माझे वावर.
त्याची नांगरणी करण्यासाठी विवेकाचा नांगर
मी त्यांत घालतो. अनिष्ट विचार
आणि कुवासनांची धसकटे वेचून
काढतो. वैराग्यरूपी अग्नीने राब
जाळतो. सद्विचारांचे बीज पेरतो. निर्मळ प्रज्ञेचे सिंचन पुरवतो आणि त्या माझ्या वावरातून निर्वाणाचे अमूप पीक मी पदरात पाडून घेतो.’’ एवढं उत्तर देऊन भगवान आपल्या
वाटेने शांतपणे निघून गेले! समाजरूपी
शेताची निगराणी संतविचार याच भूमिकेतून करत आलेले आहे. विवेकाचा आग्रह ही
परंपरा प्रकर्षाने धरते त्याचसाठी. विवेकाच्या नांगराने आपण आपल्या मनाची भूमी
सतत नांगरायची असते. या नांगरणीमध्ये खंड पडता कामा नये. परंतु, विवेकाचा नांगर हाती पेलून मनरूपी शेताची नांगरट अविरत चालू ठेवणे, हे विलक्षण धैर्याचे काम होय. कारण, विवेकाच्या आधारे जीवनाची वाटचाल सुरू राखणे, हे असिधारा व्रतच जणू! म्हणूनच की काय, पण, ‘देह’गाव वसवण्याचे कौलपत्र सुपूर्त केलेल्या ‘जिवा’जीपंत ठाणेदाराला ‘आत्मा’रामपंत कमाविसदार एक मोठा सावधगिरीचा इशारा देऊन ठेवतात. एकनाथांच्या व्यक्तिमत्त्वात भिनलेला समाजमनस्क संत या ठिकाणी आपल्याला अतिशय ठसठशीतपणे प्रतीत होतो. ‘आत्मा’रामपंत ‘जिवा’जीपंतांना बजावतात, ‘‘धैर्याचा नांगर धरून। शेतांमधील खडे काढून। वासनेच्या पालव्या तोडून। संशयाच्या काशा गोळा करून।’’ गावची लावणी करणे. संतपरंपरेने आपल्याला परोपरीने केलेल्या या बोधाचाच नेमका विसर आज पडतो आहे का? विवेकाचा नांगर आपण गुंडाळून अडगळीत फेकून दिलेला आहे का? मनरूपी शेताची मशागत जागृतीने करण्यासाठी ‘विवेकाचा नांगर धरा’ या आवाहनाचा विचार आपण केव्हा करणार? या नांगरणीला आपण अजून किती उशीर लावणार?
-अभय टिळक