शहाणे करुन सोडावे, सकळजन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 09:11 PM2019-09-09T21:11:37+5:302019-09-09T21:13:27+5:30

संपूर्ण महाराष्टÑ प्रांती जनकल्याणाची मोठी चढाओढ सुरु झालेली दिसतेय.

Please be wise, Sakaljan! | शहाणे करुन सोडावे, सकळजन!

शहाणे करुन सोडावे, सकळजन!

Next

मिलिंद कुलकर्णी
संपूर्ण महाराष्टÑ प्रांती जनकल्याणाची मोठी चढाओढ सुरु झालेली दिसतेय. जनकल्याणात आपले ‘कल्याण’ आहे, असा दृष्टांत झाल्यासारखी प्रत्येकाच्या ओठी जनहिताच्या बाता (म्हणजे गोष्टी) दिसून येत आहेत. मीच केवळ जनकल्याण करु शकतो, असे प्रत्येक जण हिरीरिने सांगत आहे. ‘आपले स्वागत आहे’ अशी फलके गावात प्रवेश करताना दिसतात, तशी आता ‘आम्हीच आपले तारणहार, नम्र सेवक’ असे फलक दिसू लागले आहेत. सुहास्य वदन, राजबिंडे रुप, तरुण, तडफदार अशी आणि इतर अनेक विशेषणांनी ही फलके उजळून निघाली आहेत. प्रत्यक्षाहुनी प्रतिमा उत्कट याचा प्रत्यय ही फलके पाहिल्यावर येत आहे. विकास कामांची मोठी मालिका या फलकांवर दिसून येत असली तरी प्रत्यक्ष गावांमध्ये मात्र ‘विकास’ बेपत्ता आहे. मोठे पूल, धरणे, चकचकीत रस्ते, अत्याधुनिक शाळा, मैदाने असे फलकावर दिसत असले तरी हे चित्र ‘प्रतिकात्मक’ आहे अशी तर तळटीप लिहिलेली नाही ना, असे नागरिक बारकाईने तपासत आहे.
ग्रामीण व नागरी भागात ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र. उपजिल्हारुग्णालय, जिल्हा रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालयाचे रुग्णालय कार्यरत आहेत. तेथे उच्चविद्याभूषित डॉक्टरांचा चमू, सहाय्यक सहकारी वर्ग, अत्याधुनिक यंत्रसामुग्री, खाटांची व्यवस्था, रुग्णवाहिका, पुरेसा औषधीसाठा उपलब्ध आहे, असा दावा लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकार तर आता विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकार करीत असतानाही अनेक इच्छुक उमेदवार ‘भव्य’ आरोग्य शिबिरे, रोगनिदान शिबिरे का घेत आहेत, हा प्रश्न पामर जनतेला पडत आहे. यात दोन शक्यता दिसून येतात. एकतर सरकार करीत असलेला दावा फोल असावा. शासकीय रुग्णालयांमध्ये कोठेही दाव्याप्रमाणे आरोग्यसेवा मिळत नसावी, म्हणून इच्छुक उमेदवार म्हणतात त्याप्रमाणे, आरोग्य व रोगनिदान शिबिरांची गरज पडत असावी आणि या शिबिरांना शेकड्याने रुग्ण येत असावे. सरकारचा सुरळीत आणि सुयोग्य आरोग्यसेवेचा दावा खरा मानला तर इच्छुक उमेदवारांची शिबिरे ही थोतांड आणि जनतेच्या डोळ्यात धूळफेक करणारी असावी. केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आणि उमेदवार म्हणून स्वत: चा बायोडाटा भरभक्कम करण्यासाठी शिबिरांचे फोटो आणि उपलब्धी जमा करण्यासाठी आयोजन केले जात असावे.
आता दोन्ही दावे खरे किंवा खोटे आहे, याची कारणमिमांसा मायबाप जनतेने करायला हवी.
पाच वर्षांनंतर जनतेच्या बौध्दिक, रंजनात्मक विकासाची मोठी काळजी राजकीय नेत्यांना वाटायला लागली आहे. मोठमोठी नाटके, प्रथितयश कलावंत, अभिनेते, दूरचित्रवाहिन्यांवरील प्रसिध्द कार्यक्रम आता तालुकापातळीवर होऊ लागले आहेत. पूर्वी जिल्ह्याच्या गावी जाऊन हा कार्यक्रम बघण्यासाठी आटापिटा करावा लागत असे. आता ही सांस्कृतिक मेजवानी गावपातळीवर मिळाल्याने ग्रामस्थ आनंदी, समाधानी आहेत. पुन्हा रंजनाची चढाओढ आहे. एका इच्छुकाने एक कार्यक्रम घेतला की, दुसरा आणखी मोठा कार्यक्रम आणतो. महापुरुषांवरील महानाट्यांची रेलचेल आहे. एकाने एका महापुरुषावर महानाट्य आणले की, दुसरा दुसऱ्या महापुरुषावर महानाट्य आणतो. जनतेच्या मनोरंजनासाठी किती ही चढाओढ. पाच वर्षातील सांस्कृतिक दुष्काळ पाहणाºया जनतेला अशा पंचपक्वानाच्या मेजवानीने अपचन की हो व्हायचे...हे अपचन झाले की, आहेच पुन्हा ‘भव्य’ आरोग्य तपासणी शिबीर...सुज्ञ, समंजस नागरिक मात्र या भुलभुलैयात अडकून पडत नाही. सारासार विचार करुन तो मुलभूत प्रश्न मांडतो. आपल्या तालुक्यात एकही नाट्यगृह का नाही? राज्य नाट्य स्पर्धेत आपल्या तालुक्यातील रंगकर्मी सहभागी होतात, पण त्यांना तालमीसाठी हॉल मिळावा म्हणून दारोदार भटकावे लागते. काही रंगकर्मी, काही संस्था नियमितपणे प्रशिक्षण शिबिरे, स्पर्धा घेत असतात, त्यांना अर्थसहाय्यासाठी जिकिरीचे प्रयत्न करावे लागतात. अशांना मदतीसाठी पाच वर्षात कुणी प्रयत्न केल्याचे ऐकिवात नाही. पण निवडणुकीच्या तोंडावर कार्यक्रमांचा धुराळा उडवला म्हणजे मतदार भुलतीत, असे मानणे म्हणजे आपणच तेवढे शहाणे आहोत, असे समजण्यासारखे आहे.

Web Title: Please be wise, Sakaljan!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.