- गजानन जानभोर
परदेशात राहणारा बाप मुलीच्या लग्नासाठी आपल्या गावात येतो, हे दृश्य केवळ सिनेमातच पाहायला मिळते. प्रत्यक्षात ते खोटे असते. मुश्ताक त्यापेक्षा वेगळा आहे.मुश्ताक खान मुलीच्या लग्नाच्या पत्रिका वाटताना परवा नागपुरात भेटला. हिंदी चित्रपट सृष्टीतील आघाडीचा विनोदी अभिनेता म्हणून आपण त्याला ओळखतो. त्याचा स्वत:चा चाहता वर्ग आहे. त्याच्या भूमिका लक्षात राहणाऱ्या आहेत. मुलीचे लग्न नागपुरातच करायचे, हा त्याचा आग्रह. खरे तर एखाद्या अभिनेत्याच्या घरचे लग्नकार्य हा तसा खासगी विषय. परंतु पेज-३ संस्कृतीमुळे माध्यमांसाठी ते खाद्य असते. मग शाहीद कपूरच्या लग्नापासून ते त्याच्या हनिमूनपर्यंत माध्यमे त्याला सतत पेटवत ठेवतात. ऐश्वर्या रायच्या बाळंतपणाची बातमी त्यामुळेच ब्रेकिंग न्यूज ठरते. अशा वातावरणात मुश्ताक खानसारखा ज्येष्ठ कलावंत आपले ‘सेलिब्रिटी’पण विसरून मायानगरीच्या झगमगाटापासून दूर जात सामान्य माणसासारखे जगू पाहतो, तेव्हा त्याची नोंद घेणे आवश्यक तर ठरतेच, पण इंद्राणी मुखर्जीने सँडविच खाल्ल्याची बातमी ब्रेक करणाऱ्या माध्यमांसाठी तो प्रायश्चित्ताचा भागही ठरतो. मुश्ताक खान हा मूळचा बालाघाटचा. नागपुरात त्याचे घर आहे. २५०-३०० हिंदी चित्रपटांमध्ये सर्वच बड्या नटांसोबत त्याने काम केले आहे. तशा अर्थाने तो सेलिब्रिटी. बाजारातील आपली पत घसरू नये यासाठी ही मंडळी कमालीची सावध असतात. म्हणूनच आपल्या आनंदाचे आणि दु:खाचेही ते ‘सेल्फी सेलिब्रेशन’ करतात. त्यांना सभोवताल गर्दी हवी असते. तिने ते सुखावतात. कालांतरानंतर ती त्यांची सवय होते आणि शेवटी व्यसन बनते. ती नसली की ते सैरभैर होतात. मुश्ताक खानला असल्या गोष्टींचे कधी आकर्षण वाटले नाही. ‘मुंबईतच लग्न का करत नाही, बॉलिवूडच्या कलाकारांना तिथे येणे शक्य होईल ना?,’ मुश्ताक हसतोे, ‘मी त्यांच्यासाठी मुलीचे लग्न करत नाही. त्यांच्यापैैकी कुणी यावे ही अपेक्षाही नाही. माझ्या संघर्षाच्या, दु:खाच्या काळात ज्यांनी सोबत केली, मला सांभाळले, कोसळताना सावरले, त्यांच्यासोबतच मी माझ्या आयुष्यातील परमोच्च आनंदाचा क्षण वाटून घेत आहे. मलाही यानिमित्ताने आप्तांचे ऋण फेडायचे आहे’ मुश्ताक विनम्र आहे. त्याच्या वागण्या-बोलण्यात अहंकार नाही. तो गर्दीत सहज एकरूप होतो. ४० वर्षांपूर्वी तो मुंबईला गेला. हिंदी चित्रपटात अभिनय करायला घरच्यांचा विरोधच. बरेच दिवस काम मिळत नव्हते. घरी परत जावे असे सारखे वाटायचे. वडील म्हणायचे, परत ये. पण त्याने धीर सोडला नाही. दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत. शेवटी निराश होऊन एके दिवशी मोठ्या भावाला फोन केला. ‘काय करू’? भावाने हिंमत दिली. ‘काळजी करू नको, काही दिवस वाट पाहू’ भाऊ गावात सायकलवर कपडे, दुपट्टे विकायचा आणि मुश्ताकला पैसे पाठवायचा. हळूहळू ‘ईफ्टा’त कामे मिळू लागली. अशातच सिद्धार्थ काकशी ओळख झाली. त्याला काही काम मिळाले. दिग्दर्शक इस्माईल श्रॉफने ‘थोडीसी बेवफाई’मध्ये त्याला छोटीशी भूमिका दिली. दिग्दर्शक टिनू आनंदला मुश्ताकची धडपड ठाऊक होती. त्याने ‘कालिया’मध्ये त्याला ‘रामदिन’चा छोटा रोल दिला. तो साऱ्यांनीच लक्षात ठेवला. ‘बकरी’ या नाटकातील अभिनयाने सलिम-जावेद हे लेखकद्वय त्याच्या प्रेमात पडले. बॉलिवूडमधील सर्वच आघाडीच्या दिग्दर्शकांसोबत त्याने काम केले आहे. मुश्ताक चित्रपटसृष्टीत आता स्थिरावला आहे. पण या मायानगरीत त्याने स्वत:ला हरवू दिले नाही. तो कुठल्या कारणास्तव कधी बदनाम झाला नाही आणि गावाकडच्या माणसांना विसरलाही नाही. त्यांच्याशी असलेले ऋणानुबंध अधिक घट्ट करण्यासाठी तो निमित्त शोधत असतो. मुलीचे लग्न त्यातीलच एक. ते मुंबईत केले असते तर शाहरुख, आमीर, सलमान या मित्रांना येणे सहज शक्य झाले असते. मित्रांचा आग्रह तो त्यासाठीच. मुखवट्यांच्या जगाला ते अनुसरुनही होते. मात्र या सर्वांना मुश्ताकचा एकच प्रश्न, ‘त्या रंगीबेरंगी वलयांकित गर्दीत माझी माणसे संकोचतील, मी त्यांना कुठे शोधणार? परदेशात राहणारा बाप मुलीच्या लग्नासाठी आपल्या गावात येतो, हे दृश्य केवळ सिनेमातच पाहायला मिळते. प्रत्यक्षात ते खोटे असते. मुश्ताक त्यापेक्षा वेगळा आहे. आपण जन्मास येतो तेव्हा एक नाळ असते. ती लगेच गळून पडते. दुसरी नाळ मात्र आपल्याला कधीच तुटू द्यायची नसते. मुश्ताकला ती अशी जीवापाड जपायची आहे.