Piercing the future | वेध भविष्यकाळाचा

वेध भविष्यकाळाचा

ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त लेखिका महाश्वेतादेवी यांनी त्यांच्या एका कथेत महाभारतामधील कुरुक्षेत्रावरील धर्मयुद्धानंतर उद्भवलेल्या परिस्थितीचे भेदक वर्णन केले आहे. त्या लिहितात की, ‘रणभूमी धगधगत्या चितांनी पेटून उठली. कौरव, पांडवांच्या मृत वीरांचे विधिवत अंत्यसंस्कार होत होते. जसजशा चितांच्या ज्वाळा भडकू लागल्या, तसतसं दाटीवाटीनं दूर उभ्या असलेल्या शोकाकुल स्त्रियांच्या घोळक्यांचं हृदयभेदी आक्रंदन मन हेलावून टाकत होतं.
 

योद्ध्यांच्या अंत्यसंस्कारावेळी घिरट्या घालणाºया मांसभक्षी पक्ष्यांनी कुरुक्षेत्राचे आकाश झाकोळून गेले होते. आसमंत सडलेल्या शवगंधाने कोंदटून गेला. तेलात भिजवलेल्या लाकडांच्या सरणांवर सडणाºया प्रेतांचे उंचच उंच ढीग टाकण्यात आले. अशा चितांच्या रांगाच रांगा सर्वदूर पसरल्या होत्या. त्या चिता अनेक दिवस जळत राहिल्या.’ अंगावर काटा उभा राहील व कुरुक्षेत्रावरील त्या युद्धाची भीषणता मार्मीक शब्दांत व्यक्त करण्याची ताकद महाश्वेतादेवींच्या लेखणीतून व्यक्त झाली. कोरोना महामारी हेही जगावर लादले गेलेले तिसरे महायुद्ध असेल तर सध्या त्या युद्धाचा निकराने सामना करणाºया इटलीतील प्रख्यात लेखिका फ्रानसेस्का मेलँड्री यांचे ‘आपल्या भविष्यकाळाकडून’ हे खुले पत्र तितकेच गंभीर व भविष्याची दाहकता व्यक्त करणारे आहे. आज आम्ही जेथे उभे आहोत तेथे उद्या तुम्ही उभे असाल, असे सांगून त्या भारतीयांना जागे करण्याचा प्रयत्न करतात. परिस्थितीचे गांभीर्य कळलेल्या आणि न कळलेल्या लोकांमध्ये लॉकडाऊनच्या निर्बंधाबाबत वाद असल्याचे त्या म्हणतात. भारतातील गोरगरीब वर्ग रोजगार नसल्याने आपल्या गावी जाण्याकरिता किंवा जेथे दोन घास पोटात जातील, अशा ठिकाणी आसरा घेण्याकरिता धडपडत आहे; मात्र त्याचवेळी सुशिक्षित उच्च मध्यमवर्ग आणि श्रीमंत हा होम क्वारंटाईन होण्याचा सल्ला धाब्यावर बसवून पार्ट्या, समारंभात मिरवून युद्ध करणाºया अदृश्य हातांना साथ देत आहे. लॉकडाऊनच्या काळातील छंद, आॅनलाइन चॅटिंग, ग्रंथवाचन वगैरेमध्ये तुमचे मन रमणार नाही, असे भाकीत मेलँड्री यांनी व्यक्त केले आहे आणि ते यथार्थ आहे. जेव्हा आजूबाजूला माणूस मृत्यूचे तांडव पाहतो, युद्धात घराघरांतील व्यक्तीचे वाहणारे रक्त पाहतो तेव्हा त्याचा अहंगंड संपुष्टात येतो. अनेकांशी जपलेला वैरभाव क्षुल्लक वाटू लागतो. नेमकी हीच भावना कोरोनाच्या प्रकोपात बहुसंख्याकांच्या मनात निर्माण होणे स्वाभाविक आहे.

संस्कृतीचा विनाश, युगांत यालाच म्हणतात का? असा काळजात धस्स करणारा सवाल लेखिका करते. अशा बिकट प्रसंगात आजूबाजूच्या माणसांचे खरे चेहरे लक्षात येतात, हे वैश्विक सत्य त्या कथन करतात. प्रसिद्धीच्या झोतामधील माणसं गायब होतील किंवा विद्वान वाटणारी मंडळी असंबद्ध वाटू लागतील हे मेलँड्री यांचे मत संकटाच्या काळात इव्हेंट करणाऱ्यांची आठवण करून देते. कोरोनानंतर आपल्या प्रत्येकाचे जीवन बदलून गेलेले असेल असे सांगताना मुलांच्या शाळा आॅनलाइन झालेल्या असतील, वयोवृद्ध मंडळी हट्टी, दुराग्रही झालेली असतील आणि आतापर्यंत केवळ स्वत:चा विचार करणारे तुम्ही माणुसकी हाच खरा धर्म आहे, असे मानू लागाल, असा विचार त्या मांडतात.

काही मूठभर धर्मांध भारतीयांच्या मानसिकतेत जर असा फरक झाला, तर धार्मिक विद्वेषाच्या तव्यावर आपली पोळी पिकवू पाहणाºयांचे दुकान बंद होईल. कोरोना विश्वयुद्धाची ही मोठी देणगी असेल. कोरोना युद्धामुळे आपण सारेच एका नावेचे प्रवासी असल्याचे मेलँड्री म्हणतात. अन्यथा संपूर्ण जग हे वर्ण, वंश, आर्थिक सुबत्ता वगैरे निकषांवर कधीच ‘एकाच नावेचे प्रवासी’ या संज्ञेत बसणारे नव्हते; मात्र लागलीच लेखिकेला या युद्धानंतर निर्माण होणाºया भीषण बेरोजगारी, गरिबीची जाणीव होते आणि ती म्हणते की, लॉकडाऊननंतर नोकरी गमावलेल्या, पोटाची भ्रांत असलेल्यांना आणि आर्थिक सुबत्ता टिकून असलेल्यांना एकाच नावेचे प्रवासी कसे म्हणायचे? कोरोना विरुद्धचे हे युद्ध संपेल तेव्हा जग वेगळे असेल हे निश्चितच; पण राखेतून फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेणाºया हिरोशिमा- नागासाकीकडून शिकलेला धडाच या युद्धात कामी येईल.

Web Title: Piercing the future

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.