वेध - १९व्या कन्येच्या लग्नाची गोष्ट

By Admin | Updated: May 6, 2017 00:05 IST2017-05-06T00:05:51+5:302017-05-06T00:05:51+5:30

दिव्यांगांसाठी बालगृह चालविणाऱ्या शंकरबाबा पापळकरांच्या मंगल या १९व्या मानसकन्येचा विवाह जळगावात राष्ट्रीय महोत्सव म्हणून साजरा झाला. त्याची गोष्ट मोठी रंजक आहे...

Perplexing - The story of the marriage of the 19th wedding | वेध - १९व्या कन्येच्या लग्नाची गोष्ट

वेध - १९व्या कन्येच्या लग्नाची गोष्ट

 वझ्झर या अमरावती जिल्ह्यातील गावात असलेल्या स्व. अंबादासपंत वैद्य बालगृहातील मंगल या १९व्या कन्येचा विवाह जळगाव जिल्ह्यातील रावेर येथील योगेश जैन या तरुणाशी जळगावात झाला. हा विवाह सोहळा राष्ट्रीय महोत्सव म्हणून साजरा झाला आणि त्याला केंद्रीय मंत्र्यांपासून तर जिल्हा प्रशासनाच्या प्रमुखांपर्यंत मान्यवर मंडळी वऱ्हाडी म्हणून सहभागी झाली होती. असे कसे हा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. मात्र त्याला कारण असे आहे की, दिव्यांगांसाठी आदर्श असे बालगृह उभारून देशभर ‘वझ्झर मॉडेल’चा ठसा उमटविणाऱ्या शंकरबाबा पापळकर यांची मंगल ही मानसकन्या आहे. ती मूकबधिर असून, रावेरच्या योगेश या शिवणकाम करणाऱ्या मूकबधिर तरुणाने तिला अर्धांगी बनविले.
पुढे आणखी एक योग जुळून आला. बाबांना रोटरी क्लबच्या नागपूर येथे आयोजित अधिवेशनाला वक्ते म्हणून बोलाविण्यात आले. संवेदनशील बाबांनी दिव्यांगांचे प्रश्न रोटरी सदस्यांपुढे मांडत असतानाच मंगलच्या विवाहाची गोड बातमी दिली. जळगावच्या मंडळींनी या विवाहाची जबाबदारी घ्यावी, असे आवाहन करताच रोटरी क्लब आॅफ जळगाव वेस्टचे पदाधिकारी उभे राहिले आणि त्यांनी सहर्ष होकार दिला. आणि त्यानंतर शंकरबाबांच्या जळगावच्या फेऱ्या सुरू झाल्या. हा विवाह राष्ट्रीय महोत्सव म्हणून साजरा व्हावा, असा आग्रह धरणाऱ्या बाबांनी क्लबच्या पदाधिकाऱ्यांसह जळगावातील प्रतिष्ठित नागरिक, लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर त्यामागची भूमिका मांडली. वर-वधू दिव्यांग आहेत म्हणून त्यांच्याकडे दयादृष्टीने पाहून थाटामाटात विवाह करू नका, तर त्यांचा प्रश्न समाजापुढे मांडण्यासाठी त्याला महोत्सवी रूप द्या. बेवारस दिव्यांग मुला-मुलींसाठी राज्यात बालगृहे आहेत. ही मुले १८ वर्षांची म्हणजे सज्ञान झाल्यावर त्यांना बालगृहात ठेवण्याची परवानगी नाही. त्यामुळे सज्ञान होताच ही मुले रस्त्यावर येतात. त्यांचे पुढे काय होते, या गंभीर समस्येकडे शंकरबाबा पापळकर हे शासन आणि समाजाचे सातत्याने लक्ष वेधत आहेत. त्यासाठी प्रत्येक मानसकन्येचा विवाह धूमधडाक्यात साजरा करण्याचा त्यांचा आग्रह असतो. या विवाहालादेखील केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री सुरेशदादा जैन, खासदार रक्षा खडसे, आमदार सुरेश भोळे, स्मिता वाघ, संजय सावकारे, महापौर नितीन लढ्ढा, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, अपंग कल्याण विभागाचे आयुक्त नितीन पाटील, रतनलाल सी.बाफना, बुलढाणा अर्बन पतसंस्थेचे संस्थापक राधेश्याम चांडक यांच्यासह प्रमुख मंडळी उपस्थित होती. जैन उद्योगसमूहाचे अध्यक्ष अशोक जैन हे स्वागताध्यक्ष तर रोटरीचे उपप्रांतपाल डॉ.राजेश पाटील हे प्रकल्पप्रमुख होते. या विवाह सोहळ्यात सहभागी होण्यासाठी वझ्झरहून मंगलचे भाऊ-बहिणी, विवाहित भगिनी कुटुंबीयांसह आवर्जून आली होती.
आठवड्याआधी मंगल ही वझ्झरहून जळगावात आली आणि मान्यवर मंडळींनी आपल्या घरी बोलावून ओटी भरत तिला माहेरपणाची ऊब दिली. संसारोपयोगी साहित्य कुणी अज्ञात दात्याने थेट पाठवून दिले. शेगाव संस्थानने वऱ्हाडींसाठी लाडूचा प्रसाद पाठविला. समाजाच्या दातृत्वाचे अनोखे दर्शन या विवाह सोहळ्यातून दिसून आले. चांडक यांनी वर योगेशला आपल्या पतसंस्थेत नोकरी देण्याचे जाहीर केले. हा सगळा विवाह सोहळा मंडपाच्या शेवटी खूर्चीवर बसून शंकरबाबा साश्रुनयनांनी पाहत होते. कीर्तनकार सत्यपाल महाराजांनी केलेला आग्रह मोडता न आल्याने पहिल्यांदा व्यासपीठावर चढून शंकरबाबा म्हणाले, आता मी थकलो, सज्ञान दिव्यांगांचा प्रश्न सोडविण्यासाठी आणि तसा कायदा करण्यासाठी आता समाजाने सरकारवर दबाव आणावा. बाबांचे हे कळकळीचे आवाहन ऐकून उपस्थितांचे डोळे पाणावले.
१२३ बेवारस मुलांना बाप म्हणून स्वत:चे नाव लावणारा आणि १८ कन्यांचे विवाह थाटात लावून २८ सुदृढ नातवंडांचे आजोबा म्हणून आनंदाने भ्रमंती करणाऱ्या या ७६ वर्षीय अवलियाने जळगावकरांशी अल्पावधीत ऋणानुबंध कसे जुळविले, हे लक्षातही आले नाही.
- मिलिंद कुलकर्णी -

Web Title: Perplexing - The story of the marriage of the 19th wedding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.