वेध - खारपाणपट्टा : उ:शाप कधी?

By Admin | Updated: May 2, 2017 06:02 IST2017-05-02T06:02:02+5:302017-05-02T06:02:02+5:30

खारपाणपट्ट्यात दरवर्षीच हे चित्र कमीअधिक फरकाने दिसते. राज्यकर्ते बदलतात, मग नवी आश्वासने दिली जातात! पाण्याचा

Perforation - Kharpanpatta: A: When was the curse? | वेध - खारपाणपट्टा : उ:शाप कधी?

वेध - खारपाणपट्टा : उ:शाप कधी?

खारपाणपट्ट्यात दरवर्षीच हे चित्र कमीअधिक फरकाने दिसते. राज्यकर्ते बदलतात, मग नवी आश्वासने दिली जातात!  पाण्याचा दुष्काळ कायमस्वरूपी  संपविण्याच्या बाता केल्या जातात;  पण परिस्थितीत काही फरक पडत नाही.

पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला आणि बुलडाणा या तीन जिल्ह्यांमधून वाहत जाऊन जळगाव जिल्ह्यात तापीला जाऊन मिळणाऱ्या पूर्णा नदीला तिच्या खोऱ्यातील भागात पूर्वापार जीवनदायिनी संबोधले जाते. विशेषत: पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पूर्णेच्या दोन्ही काठांवर वसलेल्या गावांसाठी तर वर्षानुवर्षांपासून ही नदीच पिण्याच्या पाण्याचा एकमेव स्रोत आहे. त्यामुळेच या भागातील जनमानसाने पूर्णेला आईचा दर्जा दिला आहे. या भागातील माणूस पूर्णेला मोठ्या प्रेमाने पूर्णामाय म्हणतो.
अमरावती, अकोला व बुलडाणा या जिल्ह्यांमधील पूर्णेच्या दोन्ही काठांवरील भागात भूगर्भातील पाणी खूप खारे आहे. त्यामुळेच सुमारे ४० ते ५० किलोमीटर रुंद आणि १५५ किलोमीटर लांबीच्या या भागाला खारपाणपट्टा म्हणूनच संबोधले जाते. भूगर्भातील पाणी समुद्राच्या पाण्याशी साधर्म्य सांगण्याइतपत खारे असल्याने या भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी प्रामुख्याने पूर्णा व तिच्या उपनद्यांवरच अवलंबून राहावे लागते. लोकसंख्या कमी होती आणि धरणे बांधली गेली नाहीत, तोपर्यंत पूर्णामायने तिच्या लेकरांची पुरेपूर काळजी घेतली. अर्थात नदीपात्रातून पाणी आणण्याचे श्रम तेव्हाही होतेच; पण किमान चांगल्या गुणवत्तेचे पाणी मिळू शकत होते. पुढे शेतीच्या नावाखाली शहरांना पाणीपुरवठा करण्यासाठी बांधलेल्या धरणांनी आपल्या पोटात पाणी साठवणे सुरू केल्यापासून मात्र कधीकाळी बारोमास वाहणारी पूर्णामाय हिवाळ्यातच कोरडी पडू लागली अन् तिच्या लेकरांच्या पाण्यासाठी प्रचंड हालअपेष्टा सुरू झाल्या.
यावर्षी पावसाळा चांगला होऊनही पिण्याच्या पाण्यासाठी खारपाणपट्ट्यातील नागरिकांचे प्रचंड हाल सुरू आहेत. खारपाणपट्ट्याच्या अकोला व बुलडाणा जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये १५ ते २० दिवसांनंतर पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे हंडाभर पाण्यासाठी अख्खे गाव नदी किंवा नाल्याच्या पात्रात खोदलेल्या खड्ड्यांभोवती, हे खारपाणपट्ट्यातील सार्वत्रिक चित्र झाले आहे. एवढा आटापिटा करून मिळणारे पाणी गढूळ आणि चवीला मचूळ तर असतेच; शिवाय अनेक रोगांनाही जन्म देते. त्यामुळेच या भागात मूत्रपिंडाच्या विकारांनी त्रस्त असलेल्या लोकांची संख्या प्रचंड आहे. जिथे माणसांनाच चांगले पाणी मिळत नाही, तिथे पशूंचा काय पाड? दूषित पाणी पिऊन मरायला टेकलेली गुरे, हे या सगळ्याच गावांमधील चित्र आहे. काही गावे अगदी पूर्णेकाठी वसलेली आहेत; पण गावकऱ्यांना पाण्यासाठी तब्बल पाच किलोमीटरपर्यंत पायपीट करावी लागते.
हा प्रश्न केवळ पाणीटंचाईपुरताच मर्यादित नाही, तर त्याला सामाजिक पदरही आहे. मुलींचे विवाह खारपाणपट्ट्यातील मुलांशी लावून द्यायला इतर भागातील लोक तयार नसतात. आता तर खारपाणपट्ट्यातील उपवर मुलींचे कुटुंबीयही शक्यतोवर मुलीचा विवाह खारपाणपट्ट्याबाहेरील मुलांशी जुळविण्याचा प्रयत्न करतात. पाणीटंचाई एवढे उग्र रूप धारण करते, की पाण्याअभावी मुलींचे विवाहसोहळे स्वत:च्या गावाऐवजी एखाद्या नातेवाइकाच्या गावात आयोजित करण्याची पाळी वधूपित्यांवर येते!
खारपाणपट्ट्यात हे चित्र दरवर्षीच कमीअधिक फरकाने दिसते. सरकारला जाग येण्याची मात्र काहीही चिन्हे दिसत नाहीत. राज्यकर्ते बदलतात, मग नवी आश्वासने दिली जातात! पाणीपुरवठा योजनांच्या घोषणा होतात, पाण्याचा दुष्काळ कायमस्वरूपी संपविण्याच्या बाता केल्या जातात; पण परिस्थितीत काही फरक पडत नाही. प्रत्येक सरकारने या भागासाठी कोट्यवधी रुपयांच्या योजना जाहीर केल्या. कधी उच्चाधिकार समिती गठित केली जाते, तर कधी खारपाणपट्टा संशोधन केंद्राचे गाजर दाखविले जाते. कधी पूर्णेवर बॅरेजेस उभारण्याची घोषणा होते, तर कधी चार हजार कोटी रुपयांच्या सुधारणा प्रकल्प कराराची घोषणा होते. घोषणांचे पुढे काही होत नाही अन् शापित खारपाणपट्ट्याला उ:शापही लाभत नाही!

- रवि टाले

Web Title: Perforation - Kharpanpatta: A: When was the curse?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.