शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

पर्रीकरांच्या जाण्याने सत्वशील पर्वाचा अस्त!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 06:42 IST

पर्रीकरांच्या झंझावाती राजकारणाचे सावट बराच काळ गोव्यावर असेल. नव्या शासकांचे मूल्यमापन करताना पर्रीकरांची कार्यक्षमता, दराऱ्याचा निकष लावला जाईल. नोकरशाहीच्या सुस्त कारभाराला नाके मुरडताना ऐकताना पर्रीकरांचे स्मरण हमखास होईल.

मनोहर पर्रीकर आता आपल्यात नाहीत. दुर्धर अशा व्याधीशी प्रखर झुंज देत त्यांनी रविवारी संध्याकाळी देह ठेवला. ही झुंजही त्यांच्या स्वभावाला साजेशी होती. त्यांच्या असंख्य चाहत्यांना त्यांचे नसणे ही कल्पना जशी सहन होणार नाही, तशीच त्यांच्या ध्येयधोरणांशी तीव्र मतभेद असलेल्यांनाही ही वस्तुस्थिती सहजासहजी पटणार नाही. गेल्या किमान दोन दशकांत पर्रीकरांचे गोव्यातील समाजजीवनातले अस्तित्व सर्वव्यापी होऊन राहिले होते. या राज्यावर जसे त्यांचे निरतिशय प्रेम होते, तितकेच प्रगाढ प्रेम गोव्यानेही त्यांच्यावर केले. मनोहर पर्रीकर हे सार्वजनिक जीवनातील सत्य, शील आणि सन्मार्गाचे चालते बोलते प्रतीक होऊन राहिले. गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकरांनंतर समाजाच्या सर्व स्तरांशी एकरूप होणारा आणि म्हणूनच अवघ्यांचा कंठमणी बनलेला मनोहर पर्रीकर हा एकमेव मुख्यमंत्री. गोव्यातच नव्हे तर राष्ट्रीय स्तरावरही आपली छाप उमटविलेला आणि मुख्यमंत्रीपदापासून देशाच्या संरक्षणमंत्री पदासारख्या उच्च पदापर्यंत मजल मारलेला गोव्याच्या इतिहासातील तो एकमेव नेता. या प्रभावाच्या व्याप्तीचे इंगित त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होते.आपला भवताल समग्रपणे व्यापण्याचे कसब पर्रीकरांच्या ठायी होते. राजकारणावर त्यांनी आपली मांड बसवली आणि मग ते गोव्यातील सार्वजनिक जीवनातही व्यापून राहिले. कुणी त्यांचे चाहते बनले, तर कुणी कट्टर निंदक. पण मनोहर पर्रीकर यांच्याकडे दुर्लक्ष करणे शक्य झाले नाही. पर्रीकर उच्चविद्याविभूषित होते, समाजाच्या उच्चस्तरात सहज वावर व्हावा, अशी त्यांची सामाजिक पार्श्वभूमी होती. पण त्यांनी आपले राजकीय वर्तन सर्वसामान्यांच्या दैनंदिन आशाअपेक्षांशी समांतर राहील, याची जाणीवपूर्वक काळजी घेतली. आयआयटीचा पदवीधर असलेला आणि कल्पकतेच्या बळावर सुबत्तेचे शिखर गाठण्याची क्षमता असलेला एक उच्चवर्णीय अभियंता आपल्या सुखदु:खांशी समरस होतो, आपल्यासाठी रस्त्यावर येऊन ठाण मांडतो, विधानसभेत आपल्या हिताचे विषय अथकपणे मांडतो याचे राज्यातील बहुजनांना कौतुक वाटले आणि पर्रीकर बघता बघता गोव्याचे लोकनेते बनले. ते स्वत:ला बहुजन समाजाचे नेते म्हणवून घेत. ते खरेही होते. त्यांना यश आले ते बहुजन समाजाने त्यांना आपले मानले, म्हणूनच. जे त्यांना जमले ते बहुजन समाजातील स्वयंघोषित नेत्यांनाही जमले नाही यातच पर्रीकरांची महती पटावी. रा. स्व. संघाच्या संस्कृतीत आपल्या सामाजिक प्रेरणांची नाळ पुरलेली आहे, हे सत्य पर्रीकरांनी कधीही लपवले नाही. तरीही त्यांच्या राजकारणाला अल्पसंख्याक समाजाच्या सर्व स्तरांतून मिळालेला प्रतिसाद विस्मयकारक होता.ऐतिहासिक कारणांमुळे गोव्यातला ख्रिस्ती समाज एकगठ्ठा मतदान करायचा. पंचवीस टक्क्यांच्या आसपास असलेल्या या मतांना लहानमोठी खिंडारे पाडणे पर्रीकरांना शक्य झाले ते आपल्या वैयक्तिक वकुबाच्या बळावर. भारतीय जनता पक्षाला एकहाती सत्तेच्या जवळ घेऊन जाण्याचे श्रेय त्यांना द्यावेच लागेल. राजकारण ते अक्षरश: जगले. अपप्रवृत्तींना सबळ पर्याय उपलब्ध करून देऊ शकतो याची ग्वाहीही त्यांनी दिली. नेहमीच मसीहाच्या शोधात असलेल्या जनसमूहाने त्यांना बिनशर्त उचलून डोक्यावर घेतले. आलेल्या संधीचे सोने करण्याचे कसब त्यांनी तीन दशकांतल्या सार्वजनिक जीवनात आत्मसात केले. एक सुशील आणि अ-भ्रष्ट नेता म्हणून अत्यंत काळजीपूर्वक आपली प्रतिमा विकसित केली. या प्रतिमेची दखल पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वालाही घ्यावी लागली. देशाचे संरक्षणमंत्री म्हणून कसोटीच्या क्षणी झालेली पर्रीकरांची नियुक्ती आणि त्यांच्या कार्यकालात घेतले गेलेले काही निर्णय केवळ गोव्याच्याच नव्हे तर संपूर्ण देशाच्या अभिमानाचा भाग बनून राहिलेले आहेत. त्यांच्याठायी एक उत्तम प्रशासक, द्रष्टा व कल्पक कार्यदर्शी होता. पाच वर्र्षेे मनाजोगता निरंकुश राजशकट चालवणे त्यांच्या भाग्यात नव्हते. मृत्यू हे अटळ सत्य. पर्रीकरांची जागा भरून काढणारे सक्षम नेतृत्व दृष्टोत्पत्तीस नसल्याचे आज जरी भासत असले तरी गोव्याची भूमी वांझ नाही. एका वादळाचा मनाला चटका लावणारा अंत सर्वांच्याच संवेदनेला ओरखड्यासारखा सलत राहील.

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरgoaगोवा