माणूस घडविते, समाजाला जोडते पंढरीची वारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2025 08:26 IST2025-07-06T08:25:10+5:302025-07-06T08:26:05+5:30
जात, धर्म, पंथ विसरून लाखो भाविक जेव्हा ‘वारकरी’ म्हणून एकत्र येतात, ग्यानबा-तुकारामाचा गजर करीत पांडुरंगाच्या भक्तीत रमतात, तो क्षण म्हणजे संतांच्या समतेच्या कार्याची आणि स्वप्नांची साकार झालेली फलश्रुती आहे.

माणूस घडविते, समाजाला जोडते पंढरीची वारी
मोहिब कादरी अहमदपूर
पंढरपूरची ‘वारी’ हा समता, बंधुता, एकतेचा संदेश देणारा सामाजिक आणि सांस्कृतिक उत्सव आहे. यात कोणत्याही जातीचा, धर्माचा, पंथाचा असण्यापूर्वी माणूस असणे आवश्यक आहे. बंधनकारक आहे. किंबहुना मूलभूत गरजच आहे. प्रसिद्ध उर्दू शायर ख़ुमार बाराबंकवी एका ठिकाणी म्हणतो,
‘सब कुछ हो रहा है इस तरक्की के ज़माने में,
मगर ये क्या ग़ज़ब है आदमी इंसां नहीं होता!’
संत साहित्यातून नुसता ‘माणूस’च नाही तर ‘चांगला माणूस’ घडण्याची प्रक्रिया होत असते. जात, धर्म, पंथाच्या पलीकडे जाऊन ‘माणूस’ म्हणून सर्वांना एकत्र करीत समतेचे कार्य वारकरी संप्रदायाने मध्ययुगात केले. परस्परांशी सुख-दु:खाने बांधला गेलेला माणसांचा समूह म्हणजे समाज. संत मानत होते की, ज्या समाजात ते राहतात त्याच्या उन्नतीची जबाबदारी त्यांच्यावर आहे. प्रत्येक संताने आपापल्या दृष्टिकोनातून समाजाचे निरीक्षण करून या कार्यात यथाशक्ती आपला हातभार लावला आहे. संतसाहित्य आणि भक्ती संप्रदायाची चळवळ ही समाजातील विकार संपवून माणूस माणसाशी जोडावा म्हणून होती. संत साहित्याने अभिजन-बहुजन दुफळी सांधून सामाजिक परिवर्तनाला गती दिली. वारीला केवळ धार्मिक महत्त्वच नाही तर त्याचे सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. समता, बंधुभाव आणि एकतेचा संदेश देणारा उत्सव आहे.
प्राचीन काळी धर्मात मनुष्यमात्राच्या सर्व व्यवहारांचा अंतर्भाव होत होता, केवळ आध्यात्मिक नाही. समाजाच्या धारणेसाठीच तर धर्म आहे; म्हणून व्यक्तीच्या नित्यनैमित्तिक कर्माला, व्यक्ती आणि समाजसंवर्धनाच्या संबंधाला, राष्ट्रासाठी समाजाच्या कर्तव्यालाच धर्म म्हणत असत. धर्मात व्यक्ती आणि समाजाच्या नैतिक, सामाजिक, राष्ट्रीय इत्यादी सर्व अंगांचा समावेश होत असे.
इस्लाम धर्मात जन्माला आलेले शेख महमद म्हणतात की,
‘नारळ वरुता कठीण, परी अंतरी जीवन,
शेख महमद अविंद, पण त्याचे हृदयी गोविंद!’.
किंवा संत कबीर जेव्हा म्हणतात,
भीमा के तट निकट पंढरपूर अजब क्षेत्र सुखदायी!
टाल, बिना और मृदंग बजावत संतनकी बादशाही!!
त्यावेळी धर्म ही संकल्पना विस्तृत होऊन ‘माणूसधर्म’ म्हणजे मानवतेवर आधारित धर्म होतो.
संत जनाबाई सारखी स्त्री ज्यावेळी म्हणते, ‘डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी’, तिथे स्त्री स्वातंत्र्याचा दृष्टिकोन आपणांस पाहावयास मिळतो. पंढरपुरातील जनाबाईच्या मुक्कामाशिवाय वारीला पूर्णत्व प्राप्त होत
नाही, असे म्हटले जात. स्त्रीला विटाळ मानणारे विचारप्रवाह असणाऱ्या काळातसुद्धा वारीतील स्त्रीपुरुष समानता समाजाला एक दिशा देण्याचे काम संतसाहित्य करते.
समाजातील सर्व घटकांना एकत्र घेऊन चालणारा हा संत साहित्याचा प्रवास आहे. समाजातील सर्वांच्या हितासाठी असणारे साहित्य म्हणजे संतसाहित्य आहे. घराच्या देव्हाऱ्यापासून समाजाच्या उंबरठ्यापर्यंत असणारा हा अभंगांचा परिपाठ सामान्य माणसाच्या विकासासाठी आणि उत्कर्षासाठी दिलेला आहे. प्रापंचिकांना उपदेश करताना सर्व संतांनी तत्कालीन समाज जीवनातील आजूबाजूच्या परिसरातील पशु, पक्षी, प्राणी, वनस्पती, इत्यादी वैशिष्ट्यांचा सहज सुंदर दाखला देत संत साहित्यातून निसर्गाचे व पर्यावरणाचे महत्त्व विशद केले आहे.
मराठवाड्यातील पैठणजवळ गोदावरी नदीच्या काठी आपेगावला जन्मलेल्या संत ज्ञानेश्वर माउलींनी तेराव्या शतकात अत्यंत सोप्या मराठी भाषेत भगवद्गीतेवरील भाष्य ‘ज्ञानेश्वरी’(भावार्थदीपिका)
हा ग्रंथ लिहिला आणि संत साहित्याचा पाया रचला. ९००० ओव्यांचे भाष्य ‘ज्ञानेश्वरी’, विश्वाच्या निर्मात्याला अर्पण करताना प्रसादरूपी दान म्हणजे पसायदान मागितलं. ते आपल्यासाठी नाही तर समाजासाठी.
एकात्मता साधणारे संत नामदेव
संत नामदेव महाराज प्रत्यक्ष श्रीविठ्ठलाच्या निकटवर्ती असलेला सखा होता, असे मानले जाते. ते वारकरी संप्रदायाचे महान प्रचारक असून भारतभर त्यांनी भावनिक एकात्मता साधली. भागवत धर्माची पताका पंजाबपर्यंत घेऊन जाण्याचे कार्य केले. दरवर्षी ते हिंगोली जिल्ह्यातील नरसी नामदेव येथून पंढरपूरला पायी वारी करत. संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव महाराज यांनी भारतभरातील विविध पवित्र तीर्थक्षेत्रांची यात्रा केली आणि तिथे त्यांनी अनेक लोकांना वारकरी संप्रदायाची दीक्षा दिली.
संत तुकाराम महाराज म्हणून ठरले जगद्गुरू
संत तुकोबाराय याच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा धागा पकडून म्हणतात, ‘सत्य असत्यासी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता’, किंवा ‘तुका म्हणे सत्य सांगे, येवोत रागे येतील ते.”
तुम्हाला राग आला तरी चालेल, पण मी सत्याची बाजू मांडल्याशिवाय राहणार नाही. सामान्यांसारखा संसार करूनही एक साक्षात्कारी संत होण्याचे भाग्य जगद्गुरू तुकारामांना लाभले.
एक संतश्रेष्ठ, कविश्रेष्ठ आणि श्रेष्ठ समाजसुधारक असणाऱ्या तुकोबांनी आपल्या आचारविचारांतून अवघ्या मनुष्यमात्राला उन्नतीचा मार्ग दाखवला म्हणून ते जगद्गुरू ठरले. संत तुकाराम महाराजांच्या पूर्वी त्यांच्या घराण्यात आठ पिढ्यांपासून विठ्ठलाची उपासना परंपरेने चालत आली होती.
माउलींकडून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वस्तुपाठ
वेद ऐकणेही अवघड त्या काळात चोखा महाराज अभंग बोलायला लागतात. त्या चोखा महाराजांच्या घरात जन्माला आलेले कर्ममेळा म्हणतात की, ‘जन्म गेले उष्टे खाता, लाज नाही तुमच्या चित्ता? एवढा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वस्तुपाठ संत ज्ञानेश्वरांनी घालून दिला.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीनंतर महाराष्ट्रात पारतंत्र्य, सामाजिक अव्यवस्था पसरली. धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरणावर याचा परिणाम झाला. अंधश्रद्धा, जादूटोणा, कर्मकांड वाढले. या स्थितीत तुकोबांनी सौम्य उपदेशच न देता, परिवर्तनासाठी तीव्र आणि प्रभावी भूमिका घेतली.