Palghar Mob Lynching: निषेधार्ह पालघर हत्याकांडाला धार्मिक रंग देणे खेदजनक!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 06:09 AM2020-04-23T06:09:44+5:302020-04-23T06:10:09+5:30

घटनेच्या ठिकाणी साधू-संत विनवणी करीत असताना, त्यांना कोणतीही दयामाया न दाखवता त्यांची निर्घृण हत्या करण्यात येते, ही घटना महाराष्ट्राला कलंक लावणारी अशीच आहे. मात्र, या घटनेला धार्मिक रंग देऊन कुणी राजकारण करू पाहत असतील, तर ती बाब अतिशय खेदजनक म्हणावी लागेल.

Palghar Mob Lynching Its unfortunate to give religious color to the incident happened in palghar | Palghar Mob Lynching: निषेधार्ह पालघर हत्याकांडाला धार्मिक रंग देणे खेदजनक!

Palghar Mob Lynching: निषेधार्ह पालघर हत्याकांडाला धार्मिक रंग देणे खेदजनक!

Next

- जगदीश भोवड, मुख्य उपसंपादक, मुंबई

जगभरासह भारतात सध्या ‘कोरोना’सारख्या छुप्या शत्रूशी दोन हात सुरू असतानाच पालघर जिल्ह्यामधील डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथे जमावाकडून झालेल्या दोन साधू आणि त्यांच्या चालकाच्या सामूहिक हत्याकांडाने महाराष्ट्रासारख्या प्रगतशील राज्याच्या माथी लांच्छन आले आहे. ही घटना निषेधार्हच आहे. मात्र, त्याच वेळी आता या प्रकरणावरून जे राजकारण केले जाऊ लागले आहे आणि त्याला धार्मिक रंग देण्याचे प्रयत्न होत आहेत, ते पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा फासणारे आहे.

देशभरामध्ये ‘लॉकडाऊन’ जाहीर करण्यात आल्याने राज्यांच्या तसेच जिल्ह्यांच्या सीमा बंद आहेत. वाहतूक व्यवस्था ठप्प आहे. अगदीच महत्त्वाचे काम असले, तरच रीतसर परवानगी घेऊनच जावे लागते. नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथील श्री मौनीबाबा मठ तथा दक्षिणमुखी हनुमान मंदिर आश्रमाचे मुख्य महंत कल्पवृक्षगिरी ऊर्फ चिकणेमहाराज हे त्यांच्या गुरूंचे निधन झाल्याचे वृत्त समजल्याने त्यांचे कांदिवली येथील शिष्य सुशीलगिरी महाराज आणि चालक नीलेश तेलंगडे यांच्यासोबत सुरतकडे निघाले होते. मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून जाणे जिल्हाबंदीमुळे अडचणीचे असल्याने चालक तेलंगडे याने छुप्या मार्गाने प्रथम त्र्यंबकेश्वर गाठले होते. तेथून जव्हार-खानवेल असा प्रवास करीत केंद्र्रशासित प्रदेश असलेल्या सिल्वासामधून पुढे सुरत गाठण्याचा त्यांचा विचार होता.



मात्र, ते डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथे आले असता, या साधूंना अडवून कुठलीही शहानिशा न करता त्यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अडीचशे ते तीनशे नागरिकांचा जमाव त्या ठिकाणी जमला होता. घटनास्थळी दाखल झालेल्या दंडुकेधारी पोलिसांनादेखील न जुमानता त्यांच्यासमोरच जमावाने साधू आणि कारचालकाची हत्या केली. ही सारी घटना पोलिसांसमोरच घडल्याने त्या तिघांचे प्राण वाचविण्याच्या कर्तव्यात हलगर्जीपणा केला म्हणून दोन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबितही करण्यात आले आहे.

सामूहिक हत्याकांडाच्या (मॉब लिचिंगच्या) अशा घटना उत्तर प्रदेश, बिहारसारख्या राज्यांमध्ये घडतात. मात्र, महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात अशी घटना घडणे, हे लांच्छनास्पद आहे. पोलिसांसमोरच ही घटना घडलेली असल्यामुळे लोकांना आता पोलिसांची भीती राहिलेली नाही, हेही तेवढेच खरे आहे. या घटनेनंतर पोलीस प्रशासनाने लगेचच आजूबाजूच्या गावांतील तब्बल ११० लोकांची धरपकड केली. असे असतानाही काही पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते या घटनेचे राजकारण करून त्याला जातीय रंग देण्याचा प्रयत्न करीत आहेत, हे अत्यंत चुकीचे आहे.



वास्तविक, डहाणू तालुक्यासह धामणविरा, कोटला, सायवन, कैनाड, ब्राह्मणपाडा तसेच बोर्डी आदी भागांत रात्रीच्या वेळी चोर, दरोडेखोर फिरत असल्याच्या घटनेने अनेक निरपराध लोकांना पकडण्यात आल्यावर पोलिसांकडून थातूरमातूर चौकशी करून त्यांना सोडून देण्यात येत असल्याच्या भ्रमातून संशयितांना नागरिकांकडून मारहाण करण्याचे प्रकार वाढू लागले होते. त्यातूनच ही घटना घडण्यापूर्वीही दोन दिवस अगोदर याच परिसरामध्ये मदत वाटप करण्यासाठी गेलेले सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वास वळवी आणि त्यांचे सहकारी यांनाही अडवून मारहाण करण्याचा प्रयत्न झाला होता. अफवांचा अनुचित प्रभाव कुठल्या थराला जाऊ शकतो, याचे हे उदाहरण होय. या कार्यकर्त्यांनी पोलिसांना मदतीला बोलावले असता पोलिसांवरदेखील हल्ला झाला होता. कारचालकासह दोन साधूंचे हत्याकांड आणि समाजसेवकाला केलेली मारहाण, या दोन घटना काही दिवसांच्या अंतराने
घडल्या आहेत. खरे तर या घटना का घडल्या? याचा विचार प्रथम होणे गरजेचे आहे.



या परिसरात सोशल मीडियावरून त्याआधी काही दिवस छुप्या पद्धतीने अपप्रचार केला जात होता. काही चोर-दरोडेखोर रात्रीच्या वेळी या परिसरामध्ये येऊन लुटालूट करीत आहेत. आपल्या मुलांच्या किडन्या काढण्यासाठी आणि आपल्याला लुटण्यासाठी चोर तसेच दरोडेखोर फिरत असल्याच्या अफवेमुळे आदिवासीबहुल भागातील लोकांच्या हातून काहीतरी विपरीत घडण्याआधी समाजप्रबोधन करून त्यांचे मतपरिवर्तन करणे अत्यंत आवश्यक होते. तसा प्रस्ताव कष्टकरी संघटनेने डहाणू तहसीलदार आणि कासा पोलिसांना दिलासुद्धा होता. मात्र, त्या प्रस्तावाला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या. समाज प्रबोधनाने काही अंशी मतपरिवर्तन झाले असते, तर एवढी अमानुष घटना कदाचित टाळली जाऊ शकली असती. घटनेच्या ठिकाणी साधू-संत विनवणी करीत असताना, त्यांना कोणतीही दयामाया न दाखवता त्यांची निर्घृण हत्या करण्यात येते, ही घटना महाराष्ट्राला कलंक लावणारी अशीच आहे. मात्र, या घटनेला धार्मिक रंग देऊन कुणी राजकारण करू पाहत असतील, तर ती बाब अतिशय खेदजनक म्हणावी लागेल.

Web Title: Palghar Mob Lynching Its unfortunate to give religious color to the incident happened in palghar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.