पाकिस्तानचे क्रौर्य आणि आपला राजनय
By Admin | Updated: May 5, 2017 00:27 IST2017-05-05T00:27:25+5:302017-05-05T00:27:25+5:30
पाकिस्तान हा धमक्या पचवून निर्ढावलेला मुजोर व बेमुर्वतखोर देश आहे. दोन भारतीय जवानांचे शिर धडावेगळे करून आपल्या सीमेत नेणाऱ्या त्याच्या

पाकिस्तानचे क्रौर्य आणि आपला राजनय
पाकिस्तान हा धमक्या पचवून निर्ढावलेला मुजोर व बेमुर्वतखोर देश आहे. दोन भारतीय जवानांचे शिर धडावेगळे करून आपल्या सीमेत नेणाऱ्या त्याच्या सैनिकांनी त्यांचाच फुटबॉलसारखा खेळ केल्याची क्रूर घटना अजून ताजी आहे. तिचे रक्त अद्याप सुकायचे असताना त्या देशाच्या सैनिकांनी आणखी दोन भारतीय सैनिकांचे शिर कापून नेले असतील तर त्याचा मस्तवालपणा, धमक्या, इशारे वा निषेधांच्या सुरांनी शमणारा नाही हे उघड आहे. पूर्वी त्याचे घुसखोर सीमेवर गोळीबार करायचे. पुढे ते पोलीस ठाण्यांवर हल्ले करू लागले. नंतर त्यांचा मारा लष्करी तळांवर सुरू झाला आणि आता ते हवाईतळांवर शस्त्रे डागू लागले आहेत. आपली बाजू मात्र निषेध, इशारे आणि आता प्रत्युत्तराच्या भाषेपर्यंत पुढे सरकली आहे. याच काळात पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी काश्मीरचा प्रश्न पुन: एकवार जागतिक व्यासपीठावर नेला असून, तो केवळ भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वादाचा प्रश्न नसल्याचे व त्याचे स्वरूप आंतरराष्ट्रीय असल्याचे बोलून दाखविले आहेत. पंतप्रधान, संरक्षणमंत्री, परराष्ट्रमंत्री आणि सेना दलाच्या प्रमुखांसह साऱ्यांनी व देशानेही या घटनेचा कडकडून निषेध केला असला तरी त्यावरची पाकिस्तानची प्रतिक्रिया थंड आणि लबाडीची आहे. या घटनेचे अस्सल पुरावे दाखवा असे त्याच्या प्रवक्त्याने परवा म्हटले तेव्हा तोही साऱ्यांचा संताप वाढविणारा प्रकार ठरला. अफगाणिस्तानातून रशियन सैन्य मागे जाणे, अमेरिकेने त्यातून माघार घेणे आणि चीनने आपला औद्योगिक महामार्ग पाकव्याप्त काश्मीरसह वजिरीस्तानातून पुढे नेण्याचा प्रकल्प हाती घेणे यासारख्या गोष्टी पाकला अनुकूल ठरलेल्या आहेत. चीनने अरुणाचलवर आपला हक्क सांगणे आणि भारताचे सगळे शेजारी देश चीनच्या प्रभावाखाली जाणे याही बाबी त्यालाच अनुकूल ठराव्या अशा आहेत. ट्रम्प बेभरवशाचे आहेत आणि परवाचे एर्डोगन आपल्याला डिवचून गेले आहेत. पाकिस्तानपल्याडचे सगळे मुस्लीम देश पाकिस्तानला अनुकूल आहेत आणि तो देशही आता अण्वस्रधारी झाला आहे. डॉ. ए.क्यू. खान हा त्याच्या बॉम्बचा निर्माता संशोधक स्वत:च धमकीची भाषा बोलणारा आहे. भारताविरुद्ध अण्वस्रे वापरू असे उद्गार त्याच्या सेना दलातील अनेक अधिकाऱ्यांनीही आजवर काढले आहेत. उत्तर कोरियाच्या किंग जोंगसारखी गुंडगिरी अंगात संचारल्यासारखी पाकिस्तानातील राज्यकर्त्या मंडळीची ही भाषा आहे. पाकिस्तानची ही स्थिती त्यावर आंतरराष्ट्रीय दबाव आणायलाही फारशी उपयोगाची नाही. अमेरिका, चीन, मध्य आशिया आणि भारताभोवतीचे देश त्यात सहभागी होण्याची शक्यता कमी आहे. राहता राहिला रशिया हा भारताचा परंपरागत मित्र. पण तोही आता आपल्यापासून दूर गेला आहे. रशियन सैनिकांनी पाकिस्तानी सैन्याबरोबर काश्मीर या भारताच्या (पाकव्याप्त) भूमीवर संयुक्त लष्करी कवायती कराव्या ही बाब साधी नाही. भारत व रशिया यांच्यात वाढत गेलेले अंतर सूचित करणारी ही गोष्ट आहे. त्यामुळे हा दबाव आणील कोण आणि कसा? ट्रम्प यांना त्यांच्या मित्र देशांशीही, अगदी कॅनडा व जपानशीही फारसे देणे-घेणे उरले नसावे असे त्यांचे वर्तन आहे. त्यांच्या राजकारणाचा कल चीनशी स्नेह वाढविण्याकडे आहे. शिवाय उ. कोरियाने त्यांचे डोळे सध्या विस्फारले आहेत. तात्पर्य कोणतीही जागतिक महासत्ता यावेळी भारताला मदतीला घेता येणारी नाही. जगातल्या प्रत्येकच अशांत घटनेवर बोलणारी युरोपातली राष्ट्रेही पाकिस्तानच्या उद्दामपणाविषयी बोलणे टाळताना दिसली आहेत. मध्यस्थीची भाषा बोलणाऱ्या परवाच्या एर्डोगननेदेखील भारतीय जवानांच्या क्रूर हत्येचा निषेध केल्याचे कुठे आढळले नाही. ही स्थिती भारताला स्वबळावर पाकिस्तानला नमवावे लागेल हे सांगणारी आहे. याआधी भारताने पाकचा १९६५ व १९७१च्या युद्धात निर्णायक पराभव केला आहे. नंतरचे कारगिलचे युद्धही त्याने जिंकले आहे. मात्र आजवरच्या या लढाया पारंपरिक शस्त्रांनिशी झाल्या. त्यात विमाने होती, रणगाडे होते आणि बंदुका होत्या. आताचे युद्ध कोणत्याही क्षणी अणुयुद्धाचे स्वरूप घेण्याचे भय आहे आणि पाकिस्तान हे युद्धखोर असलेले राष्ट्र आहे. अणुयुद्धाच्या तयारीची भाषा त्याने सातत्याने वापरली आहे. असे युद्ध प्रचंड मनुष्यहानी व वित्तहानी घडविणारे आहे. अणुबॉम्ब जोवर शस्त्रागारात असतो तोवरच त्याची परिणामकारकता महत्त्वाची असते. तो त्यातून बाहेर पडल्यानंतरचा हाहाकार सगळ्या जगाला पश्चाताप करायला लावणारा असतो. अमेरिकेने १९४५मध्ये अणुबॉम्बचा जो प्रयोग केला त्याच्या जखमा केवळ जपानी माणसांच्याच मनावर नाहीत, तो बॉम्ब टाकायला गेलेल्या वैमानिकांनाही त्या जखमांनी सारे आयुष्य छळले आहे. अमेरिकेचा त्याविषयीचा पश्चाताप कायम आहे आणि जपानने त्याची आठवण तशीच कायम राखली आहे. ही बाब पाकिस्तानसारख्या युद्धखोर देशाशी व्यवहार करताना मनात जपणे गरजेचे आहे. भारताच्या शांततावादी इराद्याविषयी जग आश्वस्त आहे आणि तेच त्याचे सध्याचे बळ आहे. हे बळ भारताच्या शस्त्रागारातील अण्वस्त्रांहूनही परिणामकारकतेत मोठे आहे. यापुढच्या काळात या दोन्ही बळांचा संयमाने वापर करणे हा आपल्या राजनयाची परीक्षा पाहणारा भाग आहे. मात्र त्यासाठी पाकला भिण्याचे वा त्याच्या कारवायांना भीक घालण्याचे कारण नाही. त्याला जरब बसेल अशा कारवाया करणाऱ्या गोष्टी लष्कराजवळ फार आहेत आणि त्यांचा वापर करणे आता गरजेचे आहे. पाकचे मस्तवालपण अंगणात येऊ न देणे ही बाब महत्त्वाची आहे.