घुबड... त्यांना तो शकुन, मग इतरांना अपशकुन कसा?

By गजानन दिवाण | Published: December 3, 2019 02:12 AM2019-12-03T02:12:11+5:302019-12-03T02:12:25+5:30

घुबड संपले, तर आपले काय बिघडले? प्रत्येक ठिकाणी स्वार्थ शोधणाऱ्या माणसाच्या जगात हा प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो.

Owl... could they do it, then how could they offend others? | घुबड... त्यांना तो शकुन, मग इतरांना अपशकुन कसा?

घुबड... त्यांना तो शकुन, मग इतरांना अपशकुन कसा?

googlenewsNext

- गजानन दिवाण (उपवृत्तसंपादक, लोकमत, औरंगाबाद)

प्रगतीची अनेक शिखरे पार केली, तरी घुबडाला पाहणे शकुन की अपशकुन, असा प्रश्न अनेकांना पडतो. गावागावात तो उपस्थित होतो. पुढारलेल्या शहरांमध्ये देखील तो होतो. घुबडाचे तोंड पाहिले की अपशकुन होतो, असा आमचा गैरसमज. काळ्या जादूच्या अंधश्रद्धेतून वाढलेली शिकार, प्रचंड जंगलतोड, जंगलावरील अतिक्रमणे आणि वणव्यांमुळे या घुबडांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. हे थांबावे आणि जनजागृती व्हावी म्हणून पुण्यात गेल्या आठवड्यात जागतिक घुबड परिषद भरविण्यात आली होती. जगभरातील १६ देशांमधील संशोधकांनी या ठिकाणी हजेरी लावली.
घुबड संपले, तर आपले काय बिघडले? प्रत्येक ठिकाणी स्वार्थ शोधणाऱ्या माणसाच्या जगात हा प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो. शेतात पिकांची प्रचंड नासाडी करणारे उंदीर आणि घूस या घुबडाचे मुख्य अन्न. घुबडाला शेतकऱ्यांचा मित्र म्हटले जाते, ते यामुळेच. उंदराच्या सात जाती, सरपटणाºया चार जाती, चिचुंद्रीच्या तीन आणि काही किडेदेखील घुबडाचे अन्न. जगभरात घुबडाच्या जवळपास २४० जाती आढळतात. त्यातील ३८ प्रकारच्या जाती भारतात आढळतात. यातही ५० टक्क्यांपेक्षा अधिक घुबड एकट्या महाराष्टÑात आढळतात. अंधश्रद्धेतून भारतात दरवर्षी ७८ हजार घुबडांची हत्या होत असल्याची आकडेवारी या परिषदेचे संयोजक आणि इला फाउंडेशनचे संस्थापक डॉ. सतीश पांडे यांनी दिली. हा पक्षी तसा अतिशय देखणा; पण काही कारणांमुळे तो भेसूर वाटतो. घुबडाचे डोळे समोर असतात आणि त्यांची रचना ट्यूबसारखी असते. त्याला तीन पापण्या असतात. मोठ्या डोळ्यांमुळे तो रात्रीसुद्धा स्पष्ट बघू शकतो. दिवसा आराम करतो आणि रात्री तो शिकारीसाठी बाहेर पडत असतो. घुबडाला डोळे हलविता येत नाहीत. आजूबाजूला पाहण्यासाठी तो डोळे नव्हे तर अख्खे डोके गोल फिरवीत असतो. माणसांच्या नजरेत हे भीतीदायक असते. त्याच्या मानेत १४ मणके असतात. त्यामुळेच तो आपली मान २७० अंशांमध्ये फिरवू शकतो. घुबडाची ऐकण्याची क्षमतादेखील अतिशय उत्तम असते. घुबडाच्या पंखांवरील पिसांची रचना अशी असते की, ज्यामुळे उडताना त्याच्या पंखांचा अजिबात आवाज होत नाही. स्वत:च्या रक्षणासाठी घुबड भयावह आवाज काढू शकतात. भीती वाटण्याचे हे आणखी एक कारण.
ज्याचे तोंड पाहिल्याने दिवस वाईट जातो, असा समज असलेल्या त्या घुबडावर कोल्हापूरचे संशोधक डॉ. गिरीश जठार यांनी नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ येथे तीन वर्षे अभ्यास केला. नंतर तब्बल एक महिना मेळघाटात घालविला. या काळात दिवसातून किमान तीन वेळा त्यांना घुबड दिसायचे. म्हणून त्यांचा कुठलाच दिवस वाया गेला नाही. उलट याच घुबडाच्या संशोधनावर त्यांनी पीएच.डी. मिळविली. घुबडाच्या अतिसंकटात असलेल्या आठ जातींपैकी ‘रानपिंगळा’ या जातीचा घुबड जठार यांनी शोधला. महाराष्टÑात घुबडाच्या १२ पेक्षा जास्त जाती आढळणारे तोरणमाळ, मेळघाट आणि तानसा अभयारण्य ही तीनच ठिकाणे आहेत. घुबडाला वाचवायचे असेल, तर त्यांचा अधिवास वाचवायला हवा. हाच विचार करून बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी अर्थात ‘बीएनएचएस’ने तानसा अभयारण्यात विविध उपक्रम हाती घेतले आहेत. स्थानिकांची जैवविविधता समिती स्थापन करून जंगलावरील अतिक्रमण, वणवे रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे. शिवाय जंगलाशेजारी राहणाºया लोकांचे जंगलावरील अवलंबित्व कमी केले जात आहे. जनजागृतीसाठी दरवर्षी २४ आॅक्टोबर हा रानपिंगळा संवर्धन दिवस साजरा केला जात आहे. जठार यांच्याशिवाय महाराष्टÑात पुण्यात राहणारे पंकज कोपर्डे घुबडाच्या उत्क्रांतीवर अभ्यास करीत आहेत. त्यांनी याच विषयावर पीएच.डी. मिळविली आहे. त्यांच्या अभ्यासानुसार भारतात आढळणाºया लहान आकाराच्या घुबडाची उत्क्रांती साधारण ३० ते ५० लाख वर्षांपूर्वी झाली असावी.
देवी लक्ष्मी स्वर्गातून खाली उतरत असताना तिच्याजवळ सर्वात आधी घुबड पोहोचले. त्यामुळे तिने घुबडाला आपले वाहन निवडले, अशी एक आख्यायिका सांगितली जाते. जठार आणि कोपर्डे या दोघांनाही घुबड शकुन ठरले. तसे पाहिल्यास घुबड कोणासाठीच अपशकुन ठरत नाही. शेतकºयांचा मित्र, म्हणजे तो सर्वांचाच मित्र. मग त्याचा अपशकुन कसा?

Web Title: Owl... could they do it, then how could they offend others?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.