बाहेरुन आत का आतून बाहेर?
By Admin | Updated: July 22, 2016 04:41 IST2016-07-22T04:41:28+5:302016-07-22T04:41:28+5:30
माणूस सकाळी उठला की यांत्रिकपणे कामाला लागतो. आपण कोणीतरी महत्वाची व्यक्ती आहोत

बाहेरुन आत का आतून बाहेर?
माणूस सकाळी उठला की यांत्रिकपणे कामाला लागतो. आपण कोणीतरी महत्वाची व्यक्ती आहोत, आपल्याशिवाय हे जग चालू शकत नाही, असा त्याचा समज असतो. स्वत:च निर्माण केलेल्या या पिंजऱ्यात तो स्वत:च नकळतपणे अडकतो आणि नव्या दिवसाचे जोखड खांद्यावर घेऊन गैरसमजाची बरड जमीन नांगरायला सुरूवात करतो. शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही पातळ्यांवर त्याची हमाली सुरू होते. आपण कोणीतरी महान व्यक्ती आहोत सिद्ध करण्याची महत्त्वाकांक्षा त्याच्या मानगुटीवर बसलेली असते आणि त्याला पुढे पुढे हाकलत नेत असते. तो पळू लागतो, तडफडू लागतो, स्वत:ला सिद्ध करण्याच्या ईर्षेने आंधळा होऊन जातो. पण आपण एका भ्रामक पिकातून दुसरे भ्रामक पीक काढण्याचा उद्योग करत आहोत हे त्याच्या लक्षात येत नाही. गैरसमजाच्या एका क्षेत्रातून गैरसमजाच्या दुसऱ्या क्षेत्रात जात आहोत हे त्याच्या लक्षात येत नाही. निरर्थकाकडून निरर्थकाकडे चाललो आहोत हे त्याच्या लक्षात येत नाही आणि मग या अज्ञानातच त्याने आयुष्यातील आणखी एक सुंदर दिवस वाया घालवलेला असतो.
हे असे का होते, तर माणूस जगाच्या नजरेने स्वत:कडे बघत असतो. लोक काय म्हणतील, हा प्रश्न त्याला छळत असतो. समाज काय म्हणेल या चिंतेने त्याला पछाडलेले असते, आपल्याशिवाय जग पुढे निघून जाईल अशी भीती त्याला वाटत असते. त्याने तो आपल्या अस्तित्वाचा प्रश्न केलेला असतो. आपली दखल घेतली न जाणे म्हणजे आपला जणू मृत्यू असे त्याला वाटते. मग आपणच निर्माण केलेल्या भ्रमांच्या या जंगलात त्याची वाट चुकते ती कायमची ! तुम्ही जगाचा विचार करता पण स्वत:चा कधी करणार? आयुष्यभर बाहेर बघत राहाता पण आत कधी बघणार? ताओ तत्वज्ञानाचा निर्माता लाओत्सी म्हणतो की, तुम्ही बाहेर शोध घेण्याऐवजी स्वत:च्या आत डोकावून बघा. जगावर राज्य करण्याची स्वप्ने जे पाहातात ते त्यासाठी अपात्र असतात. ज्ञानप्राप्तीसाठी धडपडणारे दररोज त्यांचे शारीरिक क्लेश आणि मानसिक यातना वाढवून घेत असतात. फूल जसे निरुद्देशपणे उमलते आणि जितक्या निरुद्देशपणे एकेक पाकळी आत मिटून घेत विलय पावते तसे माणसाला जगता आले पाहिजे. फुलाप्रमाणे आपल्या मूलस्थानी निर्मळपणे विलय पावणे, याला लाओत्सी शांती म्हणतो. ती जर मिळवायची असेल तर महत्वाकांक्षारहित आणि वखवखशून्य कसे जगावे याचे धडे माणसाला जाणीवपूर्वक गिरवावे लागतील. बाहेरून आत घेण्याऐवजी आतून बाहेर पडायला शिकणे हा त्यातला सर्वात महत्वाचा धडा!
-प्रल्हाद जाधव