यशासाठी ‘आयोजित संतती’चा खटाटोप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2019 05:34 AM2019-08-01T05:34:51+5:302019-08-01T05:38:15+5:30

डॉ. गिरीश जाखोटिया आज लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी आणि लोकशाहीर समाजसुधारक अण्णाभाऊ साठेंची जयंती. दोघेही आपापल्या क्षेत्रातील अत्यंत आदरणीय लोकनेते. ...

The 'organized offspring' strives for success | यशासाठी ‘आयोजित संतती’चा खटाटोप

यशासाठी ‘आयोजित संतती’चा खटाटोप

Next

डॉ. गिरीश जाखोटिया

आज लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी आणि लोकशाहीर समाजसुधारक अण्णाभाऊ साठेंची जयंती. दोघेही आपापल्या क्षेत्रातील अत्यंत आदरणीय लोकनेते. यांनी संस्था उभ्या केल्या व चळवळी चालविल्या त्या लोककल्याणार्थ. आजचे बहुतांश राजकारणी व त्यांचे पक्ष, उद्योगपती व त्यांच्या कंपन्या, सांस्कृतिक व क्रीडा संस्था, देशांची सरकारे इत्यादी तपासली तर ‘जीवघेण्या यशा’साठी सारंकाही करण्याची वृत्ती दिसून येते. यातलाच एक भाग प्रचलित झालाय तो ‘नेटवर्किंग’चा. हे यशाचं नेटवर्क चालविण्यासाठी मग विविध गुणसूत्रांनी नटलेली ‘संतती’ उधार घेणंही आता क्षम्य झालं आहे. ‘यशासाठी सबकुछ’ मानणाऱ्या नि प्रचलित झालेल्या या आजच्या संस्कृतीबद्दल व्यूहात्मक नजरेने थोडक्यात इथे पाहू या.

वर्ल्डकपच्या विजयानंतर कळले की इंग्लंडच्या संघातील तब्बल सात खेळाडू हे मूळ ब्रिटिश वंशाचे नव्हते. एका चिनी आॅटोमोबाइल कंपनीने एक ब्रिटिश कंपनी व ब्रँड खरेदी केला आणि या ब्रँडच्या नावे भारतात एक कंपनी नुकतीच उघडली. या कंपनीचा प्रमुख हा भारतीय आहे. आणखी एक बातमी आम्हा सर्वांना कळलेय की ब्रिटिश सरकारमध्ये भारतीय वंशाचे काही मंत्री व चिटणीस नियुक्त झालेत. एका अन्य बलाढ्य राजकीय पक्षातही आता विविध (?) प्रकारची नेतेमंडळी सामील झाली आहेत. या साºया गोष्टींत वरवर पाहता काही वावगं दिसत नाही. अशा कंपन्या, असे पक्ष, अशी बहुवांशिक मंत्रिमंडळे ही केंद्रभागी असणाºया एका ‘विशिष्ट’ विचारसरणीवर चालतात. या ‘विशिष्टते’बद्दलही आक्षेप असू नये जोपर्यंत ती अनैतिक नसते. या सगळ्या प्रकारांना आपण जीवशास्त्रीय भाषेत ‘आयोजित संतती’ म्हणू शकू. म्हणजे यशाच्या सातत्यासाठी स्वत:ला हव्या असणाºया गुणसूत्रांची संतती बनवून घेणं. प्राचीन इतिहासात हा प्रकार सर्रास वापरला जायचा. ‘नियोग’ अथवा ‘अयोनिज’ अशा या प्रकारात ‘संतती - निर्मिती’ व्हायची नि मग तिला ठरवलेल्या पित्याकडून वा पालकाकडून हवे ते ‘संस्कार’ दिले जायचे. ही संतती मग ‘वंशाचा दिवा वा वारसदार’ वगैरे व्हायची. यश देईपर्यंत या संततीचा वापर नि आदरसत्कार! यश देणं बंद केलं की दुसºया संततीचा शोध. थोडक्यात काय तर यश महत्त्वाचं, संतती नाही.

चिनी कंपनी भारतातील कर्मचाऱ्यांना ब्रिटिश ब्रँड वापरण्याचे संस्कार देईल, ब्रिटिश सरकार भारतीय वंशाच्या मंत्र्यांकडून ‘ब्रिटिश सभ्यते’ची अपेक्षा ठेवेल आणि बलाढ्य राजकीय पक्षाचे धुरीण आयात केलेल्या विविध प्रकारच्या नेत्यांकडून विशिष्ट राजकीय आचरणाची अपेक्षा ठेवतील. म्हणजे ‘आयोजित संतती’ला बख्खळ यश मिळविण्यासाठी तयार करणं! उद्योजकीय भाषेत आपण या सर्व खटाटोपाला ‘नेटवर्क फॉर सक्सेस’ असं म्हणू या. या नेटवर्कच्या मध्यस्थानी ती ‘आयोजित संतती’. म्हणजे असं की वाहन बनविणारी कंपनी ८० टक्के सुटे भाग बाहेरून घेते, बरंचसं भांडवल बँकांचं असतं, डिझाइन रॉयल्टीवर घेतलेलं असतं, वाहनांची विक्री वितरक वा डिलर्स करीत असतात इ.इ. वाहन बनविणारी कंपनी मात्र यशातील सिंहाचा वाटा घेते, तीच जगाला दिसते, तिचंच सातत्याने ब्रँडिंग होतं नि तिचीच दादागिरी चालते. म्हणजे या कंपनीचे ‘प्रॉडक्ट्स’ व संबंधित व्यवस्थापक हे यश मिळवून देणाºया ‘आयोजित संतती’सारखे असतात; पण साºया प्रक्रियेवर एक विशिष्ट गट संस्थात्मक ढाच्यातून नियंत्रण ठेवत असतो, जेणेकरून अत्यंत बलवान असलेले हे व्यवस्थापक व प्रॉडक्ट्स स्वबळावर काहीही करू शकणार नाहीत.

उद्योगात, राजकारणात, खेळात आणि आजकाल सांस्कृतिक संघटनांमध्येही अशा ‘आयोजित संतती’चं महत्त्व दोन परिमाणांवरच ठरतं - सातत्याने आपल्या पितृसंस्थेला यश मिळवून देणं आणि प्रक्रिया चालविणाºया कमअस्सल लोकांचं ‘संस्थात्मक’ वा ‘सामुदायिक’ श्रेष्ठत्व मान्य करणं. परंतु गोची इथेच होते! मुळात यशासारखं यशच असतं. प्रक्रिया चालविणाºया सामान्य लोकांनाही सतत भीती असते की संस्थेतील अन्य सामान्य लोक त्यांची जागा केव्हाही बळकावू शकतील. म्हणजे एनकेन प्रकारे यश मिळवत राहायलाच हवं. यासाठी मग प्रक्रियांच्या गुणवत्तेशी तडजोड केली जाते. संस्थेच्या नावावरच यश नोंदलं जाणार असल्यानं ‘संस्थेपेक्षा कुणीही मोठं नाही’ असं उच्चरवानं प्रत्येकाला सांगितलं जातं. ‘आयोजित संतती’ जी यश मिळवून देत असते, तिलाही अधूनमधून तिची ‘औकात’ दाखवली जाते. कधी संस्थेच्या वा पक्षाच्या अथवा संघटनेच्या बाहेर तिला तात्पुरतं बसवून किंवा तिच्या यशाचं फारसं कौतुक न करता.

आता या साºया विषय - मांडणीतील आयोजित संतती, विविध प्रक्रिया, त्या चालविणारे कारस्थानी सामान्य लोक, सामुदायिक वा संस्थात्मक दहशत, अनाकलनीय भंपक ध्येये व त्यासाठीचा मतलबी लवचीकपणा इत्यादी बाबी तुमच्या अवतीभवतीच्या घटनांना लावून पाहा, एक अकराळ-विकराळ चित्र उभं राहील. या चित्रानेच आम्ही सदासर्वकाळ गंडवले - घाबरवले गेलो आहोत. आम्ही त्या चित्राचाच एक भाग असलो तर ते बदलू नाही शकणार. धाडस करा, तारतम्य वापरा, चित्रातून बाहेर पडा; म्हणजे त्याला बदलता येईल. हां, हेसुद्धा तपासा की या सामुदायिक खेळात तुम्ही कुठे ‘आयोजित संतती’ म्हणून वापरले जात नाही आहात ना?


(लेखक व्यूहात्मक व्यवस्थापन, अर्थकारण व उद्योजकीय सल्लागार आहेत)

Web Title: The 'organized offspring' strives for success

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.