‘ऑपरेशन ब्लू स्टार’ ही चूकच होती; पण कोणाची? इंदिरा गांधींची खरेच होती का...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 08:17 IST2025-10-17T08:08:06+5:302025-10-17T08:17:55+5:30
सुवर्ण मंदिरातील ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ची मोठी किंमत इंदिरा गांधींनी स्वत:चे प्राण देऊन मोजली... मात्र, ती खरेच केवळ इंदिरा गांधींची चूक होती का?

‘ऑपरेशन ब्लू स्टार’ ही चूकच होती; पण कोणाची? इंदिरा गांधींची खरेच होती का...
- संजय नहार, अध्यक्ष, सरहद
‘जून १९८४ मध्ये सुवर्णमंदिरात करण्यात आलेले ‘ब्लू स्टार ऑपरेशन’ ही चूक होती आणि ज्यासाठी इंदिरा गांधी यांना आपल्या प्राणाची किंमत द्यावी लागली’ असे उद्गार काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी. चिदंबरम् यांनी एका पुस्तकाच्या प्रकाशन समारंभप्रसंगी काढले आणि पुन्हा एकदा या विषयाला तोंड फुटले. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पंजाबमधील अकाली आंदोलन ज्या पद्धतीने हाताळले, त्यावर अनेक लेख, पुस्तके लिहिली गेली आहेत आणि भविष्यातही लिहिली जातील. जून १९८४ मधील शिखांच्या सर्वोच्च पवित्र ठिकाणी म्हणजे सुवर्ण मंदिरात झालेली लष्करी कारवाई हा या कारवाईचा अंतिम बिंदू होता. या कारवाईला ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ असे संबोधण्यात आले होते.
इंदिरा गांधींनी हे आंदोलन ज्या पद्धतीने हाताळले, त्यावर बहुतेक लेख आणि पुस्तकांमध्ये टीकाच करण्यात आली आहे. लष्कराला पाचारण करण्यात इंदिराजींनी खूप घाई केली, असे काही जणांचे म्हणणे होते. त्यांच्या मते या समस्येवर इंदिराजींनी चर्चेद्वारे तोडगा काढायला हवा होता. ‘जून १९८४ पूर्वीच असा निर्णय का घेतला नाही?’- म्हणून काही जणांनी टीकाही केलेली आहे. आधी हा निर्णय घेतला असता तर सुवर्ण मंदिरात लपून बसलेल्या अतिरेक्यांना बाहेर काढण्याचे काम पोलिसही करू शकले असते, लष्कराच्या सहभागाची गरजच पडली नसती, असेही अनेकांचे मत दिसते. ही मते-मतांतरे आजवर अनेकदा लिहिली, व्यक्त केली गेली आहेत.
१९८८ मध्ये पोलिसांच्याद्वारे ‘ऑपरेशन ब्लॅक थंडर’ यशस्वीपणे राबविणारे वरिष्ठ पोलिस अधिकारी एस. एस. विर्क, स्व. इंदिरा गांधी यांचे तत्कालीन प्रधान सचिव पी. सी. अलेक्झांडर आणि मेजर जनरल रणजितसिंग दयाल या सर्वांशी माझ्या वेळोवेळी विस्तृत चर्चा झाल्या. त्यात ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ ही चूकच होती,’ याची कबुली जवळपास सर्वांनीच दिली; पण ‘ती चूक इंदिरा गांधी यांची होती का?’- यावर पी.सी अलेक्झांडर यांचे म्हणणे मला सत्याच्या जास्त जवळ जाणारे वाटते. ते म्हणतात, ‘या घटनेशी निगडित पडद्याआडच्या चर्चा, निर्णयप्रक्रिया आणि धोरणे ठरविण्याची प्रक्रिया यांच्याशी मी संबंधित असल्याने या प्रकरणाबाबत जास्त विश्वासार्ह माहिती कदाचित माझ्याकडे आहे. इंदिरा गांधी यांच्यासमोर गुप्तचर, तसेच विविध यंत्रणांकडून आलेली माहिती आणि लष्करी अधिकाऱ्यांची मते यामुळे दुसरा पर्याय नाही, असे वाटल्याने हा निर्णय घेण्यात आला.’

पी. सी. अलेक्झांडर यांनी याबाबत विस्ताराने त्यांच्या ‘कॉरिडॉर्स ऑफ पॉवर्स’ या आत्मचरित्रात लिहिले आहे. त्यात तेे लिहितात, ‘पंजाबची परिस्थिती हळूहळू खराब होऊ लागली आणि त्याला हिंदू विरुद्ध शीख असे धर्मयुद्धाचे स्वरूप येऊ लागले. त्यामुळे इंदिरा गांधी अत्यंत निराश झाल्या होत्या. अकाली आंदोलन हिंसक होऊ लागले, तेव्हा त्या इतक्या निराश होत्या की, त्यांनी वर्ष १९८२ च्या मे महिन्यातील शेवटच्या आठवड्यात पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्याचा मनोदय माझ्याकडे व्यक्त केला होता. आपण पंतप्रधानपदापासून दूर झालो, तर ते देशाच्या आणि त्यांच्या दृष्टीने योग्य ठरेल, असे त्यांना वाटत होते.’
पंजाब आणि हरियाणा यांच्यामधील राजधानीचा प्रश्न असेल किंवा पाण्याचा; तो शांततेने सुटला पाहिजे, अशी इंदिरा गांधींची प्रामाणिक इच्छा होती. मात्र, विदेशातून पंजाबमधील अस्थिरतेला आणि दहशतवादाला ज्याप्रकारे प्रोत्साहन दिले जात होते त्यामुळे त्यांना काळजी वाटत होती. भिंद्रनवाले सुवर्ण मंदिरात ठाण मांडून बसल्यावर दिल्ली ते पंजाब या भागात हल्ले, हत्या, जाळपोळ आणि हिंसाचार वाढू लागल्या. खलिस्तान निर्मितीची घोषणा होऊ शकते, असा अहवाल गुप्तचर खात्याकडून आल्याने २५ मे १९८४ या दिवशी इंदिरा गांधी यांनी लष्कराला पाचारण करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी लष्करप्रमुख जनरल अरुण कुमार वैद्य यांना बोलावून घेतले. त्यांनी या अहवालाच्या पार्श्वभूमीवर पंजाबमधील दहशतवाद आणि हिंसाचार प्रभावीपणे निपटून काढण्यास आणि लोकांना सुरक्षितता देण्यास लष्कराने प्राधान्य द्यावे, असे सांगितले. त्याप्रमाणे सुवर्ण मंदिराला वेढा घालणे आणि कमीत कमी बळाचा वापर करून अतिरेक्यांना बाहेर काढणे अशी योजना वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी इंदिरा गांधी यांच्यासमोर ठेवली. श्रीमती इंदिरा गांधी या योजनेबद्दल साशंक होत्या. मात्र, सुवर्ण मंदिराचे पावित्र्य राखले जावे, हा त्यांचा आग्रह होता.
- नंतर झालेल्या सुवर्ण मंदिरातील ‘ऑपरेशन ब्लू स्टार’मध्ये लष्कराला आणि देशालाही मोठी किंमत मोजावी लागली. ती इंदिरा गांधी यांनी स्वत:चे प्राण देऊन ती मोजली... मात्र, जे झाले ती खरेच केवळ इंदिरा गांधींची चूक होती का? याची कठोर चिकित्सा व्हायला हवी.