ज्याची त्याची वृत्ती आणि ज्याचे त्याचे आकाश...!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 04:57 AM2020-02-11T04:57:15+5:302020-02-11T05:00:27+5:30

महात्मा गांधी म्हणायचे खेड्याकडे चला, पण आम्ही खेडी ओस करून टाकली.

One whose attitude and one whose sky ...! | ज्याची त्याची वृत्ती आणि ज्याचे त्याचे आकाश...!

ज्याची त्याची वृत्ती आणि ज्याचे त्याचे आकाश...!

googlenewsNext

छोट्या छोट्या गोष्टींवर आम्ही चिडतो, संतापतो. सगळ्या गोष्टीत आम्हाला मालकी हक्क हवा आहे. वस्तू असो की व्यक्ती, आम्हाला त्यावर हक्क सांगायचा असतो. त्यातूनच एखादी सुंदर मुलगी आपल्याला आवडली आणि ती आपल्या प्रेमाचा स्वीकार करत नाही असे वाटले की आपल्यातली मालकी वृत्ती लगेच जागी होते आणि आपण वाट्टेल ते झालं तरी तिला मिळवण्याचा प्रयत्न करू लागतो. ही कसली पाशवी वृत्ती..? जर ती आपल्याला मिळत नसेल तर ती दुसऱ्या कोणालाही मिळू देणार नाही ही कसली विकृती..? याची उत्तरं शोधायची कुठे?


महात्मा गांधी म्हणायचे खेड्याकडे चला, पण आम्ही खेडी ओस करून टाकली. तर शहरांच्या जवळ असणारी गावं शहराच्या आत कधी आली हे त्या गावांनाही कळाले नाही. गावातल्या पोरांना तालुक्यातल्या पोरासारखी शान मारावी वाटते... तालुक्यातली पोरं जिल्ह्याच्या पोरांशी बरोबरी करू लागतात... तर जिल्ह्याच्या पोरांना पुण्या-मुंबईच्या पोरांसारखे स्टायलिश राहावे वाटू लागते. ही न संपणारी भूक वेळीच ओळखली नाही तर ती आपल्यातल्या स्वत्वालाच कधी खाऊन टाकते तेही कळत नाही.


एक ज्येष्ठ नेते त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना म्हणाले, मी कधी तरी अ‍ॅम्बेसेडर गाडीतून फिरायचो तेव्हा माझ्या मागे, काही अ‍ॅम्बेसेडर असायच्या. पुढे मी जरा बरी गाडी घेतली तर माझ्या मागच्याही गाड्या बदलत चालल्याचे मला दिसले. आता मी आणखी बºया गाडीतून फिरतो तर माझ्या मागे माझ्या गाडीसारख्याच गाड्या धावताना दिसतात. अरे बाबांनो, अ‍ॅम्बेसेडर ते या गाडीपर्यंतचा प्रवास करायला मला ५० वर्षे लागली. तुम्ही पाच-दहा महिन्यांत कसा काय हा प्रवास पूर्ण करता...? त्यांच्या या प्रश्नातच आजच्या व्यवस्थेचे विदारक दर्शन आहे.
विविध विकासाच्या कामासाठी सरकारने खासगी जमिनी विकत घेण्याचा सपाटा लावला. राजकीय हव्यासापोटी त्या जमिनींचा वाट्टेल तो मोबदला दिला जाऊ लागला. त्यातून हाती पैैसा येऊ लागला. अचानक आलेल्या श्रीमंतीमुळे गाड्या घेता आल्या, हाती सोन्याची कडी, गळ्यात सोन्याच्या चेन आल्या. वागण्या-बोलण्यात बेफिकिरी आली. महात्मा गांधीजींचे विचार आम्हाला जगण्यासाठी काही विचार देऊ शकतात की नाही याच्या खोलात कोणी जाईनासे झाले, पण त्याच गांधीजींचे फोटो छापलेले रंगीत कागद वाट्टेल ते मिळवून देऊ शकतात ही वृत्ती वाढीस लागली.


राज्यात ५५ टक्के शहरीकरण झाले आहे. ग्रामीण भागात जाण्याची कोणाची इच्छा उरलेली नाही. गावाच्या पारावर, एसटी स्टँडजवळील चहाच्या गाडीवर अथवा पानटपरीवर बेकारांचे तांडे हे आता कॉमन चित्र झाले आहे. त्यातच ‘करलो दुनिया मुठ्ठीमे’ म्हणत मोफत इंटरनेटने अवघे जग गावागावातल्या तरुणांच्या हाती दिले. हातातल्या स्मार्टफोनवर काहीही बघता येऊ लागले. ते पाहून तसे करण्याची वृत्ती वाढू लागली. मग तो हिंसाचार असो की अनैसर्गिक सेक्स. जे जे पाहू ते ते करण्याची लालसा विकृतीच्या टोकाला कधी गेली हेही कळेनासे झाले आहे.


या सगळ्यात कधी धर्माच्या नावाने, तर कधी जातीच्या नावाने, तर कधी महापुरुषांच्या नावाने दंगे, धोपे घडवण्यात राजकीय पक्ष धन्यता मानू लागले. विकासाच्या गोष्टी करणारे सोयीनुसार, देव, देश अन् धर्मासाठी माथी भडकवण्याचे काम करू लागले. या सगळ्यातून एक विदारक वास्तव गावोगावी दिसत आहे. आमच्या भावनादेखील इतक्या बोथट आणि उथळ होऊ लागल्या आहेत की एखादी घटना घडली की आम्ही कामधंदे सोडून त्याच घटनेच्या मागे धावत राहतो. प्रिन्स नावाचा मुलगा जेव्हा एका बोअरवेलमध्ये पडला तेव्हा देशातले सगळे चॅनेल्स चोवीस तास त्याच एका घटनेचे कव्हरेज दाखवत होते.


देशात त्या वेळी दुसरा विषयच नव्हता. मात्र त्यानंतर एकाही चॅनेलने उघडे पडलेले बोअरवेल आणि त्यातून होणारे अपघात यावर कधी मालिका केली नाही. कोणताही विषय तात्पुरता सनसनाटी करणे आणि त्यातून सगळ्यांना आपण जे दाखवू तेच कसे बरोबर आहे हे पटवून देण्याच्या जीवघेण्या स्पर्धेने तुमच्या-आमच्या जगण्यातला निखळ आनंदही हिरावला आणि दु:खाच्या भावनाही कोमेजून टाकल्या आहेत. या नशेतून आम्ही बाहेर पडणार आहोत की नाही याचा विचार ज्याने त्याने करायचा आहे. जग चंद्राच्याही पलीकडे जाण्याच्या गोष्टी करत असताना आम्ही कुठे चाललो आहोत याचाही विचार करता आला तर करावा.
- अतुल कुलकर्णी। वरिष्ठ साहाय्यक संपादक

Web Title: One whose attitude and one whose sky ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.