एक शिक्षक, एक शहाणं गाव... आणि एक शाळा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 07:38 IST2025-07-04T07:38:09+5:302025-07-04T07:38:46+5:30

‘वर्ल्ड‌स‌् बेस्ट स्कूल २०२५’ या पुरस्काराच्या लघुयादीतील ४ भारतीय शाळांमध्ये एक आहे जालिंदरनगरची जि.प. प्राथमिक शाळा. या शाळेच्या प्रवासाबद्दल...

One teacher, one wise village and one school! | एक शिक्षक, एक शहाणं गाव... आणि एक शाळा!

एक शिक्षक, एक शहाणं गाव... आणि एक शाळा!

दत्तात्रय वारे, शिक्षक, जि. प. प्राथमिक शाळा

जालिंदरनगर, ता. खेड, जि. पुणे

जिल्हा परिषदेची शाळा म्हटली की तिची एक विशिष्ट प्रतिमा आपल्या डोळ्यांसमोर उभी राहते. गळकी कौले, पडकी इमारत, मोडकी बाके आणि दुरवस्था… ही प्रतिमा सपशेल चुकीची असते असेही नाही. मला अशा दोन शाळांमध्ये काम करायची संधी मिळाली. सहसा अशी शाळा म्हणून नाक मुरडणे ही शिक्षकांची पहिली आणि स्वाभाविक प्रतिक्रिया असेल तर त्यात आश्चर्य काही नाही; मी मात्र ते आव्हान म्हणून स्वीकारले आणि बदलाची सुरुवातही तिथूनच झाली.

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात जालिंदरनगर हे लहानसे गाव. इथल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत माझी बदली झाली तेव्हा शाळा बंद पडण्याच्या यादीत होती. पटसंख्या अवघी तीन  होती. तिथून पुढे वर्षभरात शाळेची पटसंख्या १२०वर जाऊन पोहोचली  आणि ‘मुख्यमंत्री माझी शाळा - सुंदर शाळा’ स्पर्धेत सर्वोत्तम ठरली. त्यापूर्वी मी वाबळेवाडीच्या शाळेत काम केले, तिथे पटसंख्या ३२ होती, शाळा म्हणजे दोन गळक्या खोल्या होत्या. दोन-अडीच वर्षांनी तिथे प्रवेश मिळवण्यासाठी ५००० मुलांची ‘वेटिंग लिस्ट’ लागली. - हा चमत्कार तुम्ही कसा काय करता?- असा प्रश्न मला अनेकदा विचारला जातो. त्यावर माझे उत्तर आहे - शिक्षकाचे प्रामाणिक, तळमळीचे प्रयत्न आणि जबाबदार लोकसहभाग!

प्राथमिक शाळेचा शिक्षक ही व्यक्ती गावात केंद्रस्थानी असते. ‘नजरेत’ही असते. या  शिक्षकाला शाळा, विद्यार्थी, गाव, ग्रामस्थ यांच्याप्रति प्रामाणिक तळमळ आणि आत्मीयता उपजतच असली पाहिजे. तिचे ढोंग करता येत नाही. शिक्षक तळमळीचा असेल आणि त्याचे प्रयत्न प्रामाणिक असतील तर संपूर्ण गाव त्याच्या पाठीशी उभा राहतो आणि तिथून शाळेच्या कायापालटाला सुरुवात होते.

वाबळेवाडीमध्ये शाळेला चांगली इमारत, त्यासाठी पुरेशी जागा हवी, असे आम्ही म्हणताच ग्रामस्थांनी दीड एकर जागा शाळेला बक्षीसपत्र करून दिली. त्या जागेची ‘मार्केट व्हॅल्यू’ सात ते आठ कोटी रुपयांच्या घरात होती. तिथून जवळच असलेल्या एका माजी आमदाराच्या शाळेच्या पटसंख्येवर आमच्या शाळेमुळे परिणाम होऊ लागल्यावर आमदार महोदयांनी शाळेला सर्वतोपरी उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ग्रामस्थ शाळेच्या पाठीशी उभे राहिले आणि ग्रामसभेत ठराव करून आमदारालाच गावबंदी केली. गावातील मुलांना चांगले शिक्षण देणारी आपली शाळा असावी, या लोकभावनेतूनच हे शक्य झाले.

सरकारी शाळा म्हटले की, ‘त्या शाळा ही सरकारची जबाबदारी’ ही अपेक्षा चुकीची नाही. पण सरकारच्या अखत्यारीत एक लाखांहून जास्त शाळा आहेत. सगळ्यांना देण्यासाठी निधी तरी सरकारकडे आहे की नाही कोणास ठाऊक? अशा परिस्थितीत ‘सरकार येईल आणि शाळा सुधारेल’ अशी अपेक्षा न करता शिक्षकानेच ग्रामस्थांच्या मदतीने हे करणे हा एकमेव मार्ग मला तरी दिसतो.

जालिंदरनगरच्या शाळेत काय नाही? इथले विद्यार्थी इंटिग्रेटेड आणि इनोव्हेटिव्ह पद्धतीचे शिक्षण घेतात. इथे २२ पेक्षा जास्त कौशल्ये शिकवली जातात. रोबोटिक्स, भारतीय आणि परदेशी भाषा, मेकॅनिक्स, कोडिंग, इलेक्ट्रॉनिक्स, प्लंबिंग, कारपेंटरी, ज्वेलरी मेकिंग अशा कितीतरी गोष्टी इथली मुले शिकतात. इस्रोबरोबर शाळेचे टाय-अप आहे. पॅराशूट, प्रत्यक्ष लाँचसाठी तयार उपग्रह क्युब सॅट, रॉकेट आणि त्यासाठी लागणारे इंधन, ॲस्ट्रो फिजिक्स अशा विषयांची मुलांना माहिती आहे. हे करण्यासाठी शिक्षकाचे समर्पण, प्रामाणिक मेहनत ही मात्र सगळ्यांत आवश्यक ‘टुल्स’ आहेत. ती असतील तर काहीही अशक्य नाही.

२८ वर्षे मी शिक्षकी पेशात आहे. अनेक मुले या काळात हाताखालून गेली. हल्ली आपल्या घरातील व्यक्तीचीही खात्री आता देता येत नाही; पण या सगळ्या विद्यार्थ्यांची मी खात्री देऊ शकतो की ते कधीही चुकीचे वागणार नाहीत. भ्रष्टाचार करणार नाहीत. त्यांना निराशा येणार नाही असे नाही; पण आलीच तर निराशेच्या भरात कुठलेही चुकीचे पाऊल ती मुले उचलणार नाहीत.

 एक चांगला, तळमळीचा शिक्षक आणि त्याच्या प्रयत्नांना पाठिंबा देणारे शहाणे गाव यांची एकत्रित तयारी असेल तर जिल्हा परिषदेच्या प्रत्येक शाळेचा चेहरामोहरा बदलणे शक्य आहे!

                dattajiware@gmail.com

                (शब्दांकन : भक्ती बिसुरे)

Web Title: One teacher, one wise village and one school!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.