संकल्प नववर्षाचा नव्हे, आयुष्याचा, बदलांचा, सकारात्मकतेचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2020 05:53 AM2020-01-01T05:53:09+5:302020-01-01T05:56:30+5:30

र्ष जरी नवीन असले तरी आपण त्यापलीकडे जाऊन मूळ प्रश्न स्वत:ला विचारणे आवश्यक आहे. आपल्या जीवनदृष्टीचे काय? तुम्ही स्पष्ट बघू शकता की तुम्ही कोणत्या दिशेने चालला आहात?

one should do resolution for life changes and positivity | संकल्प नववर्षाचा नव्हे, आयुष्याचा, बदलांचा, सकारात्मकतेचा!

संकल्प नववर्षाचा नव्हे, आयुष्याचा, बदलांचा, सकारात्मकतेचा!

Next

- डॉ. राजन वेळूकर, माजी कुलगुरू, मुंबई विद्यापीठ

नवीन वर्ष २०२० सुरू होणार आणि जुने वर्ष संपणार. अर्थातच बहुतेक मंडळी संकल्प ठेवणार (नेहमीप्रमाणे). वर्ष जरी नवीन असले तरी आपण त्यापलीकडे जाऊन मूळ प्रश्न स्वत:ला विचारणे आवश्यक आहे. आपल्या जीवनदृष्टीचे काय? तुम्ही स्पष्ट बघू शकता की तुम्ही कोणत्या दिशेने चालला आहात? आपण आपल्या दैनंदिन आयुष्यातील सांसारिक क्रियांमध्ये इतके अडकतो की कोणत्या मार्गाने चाललो आहोत हे आपल्याला दिसत नाही. आपण अंध होऊन जातो. आपण कुठे जात आहोत हे माहीत नसल्यास आयुष्याचा प्रवास करण्याचा अर्थ फारसा उरत नाही. म्हणूनच ते दैनंदिन जीवनामध्ये रिफ्लेक्ट (प्रतिबिंबित) होण्याची गरज असते. थोडे थांबून त्रयस्थ म्हणून स्वत:ला प्रश्न विचारायला पाहिजे. यामुळे जागृती होण्यास मदत होते. मी कुठे मार्गक्रमण करतो आहे? मागील वर्षी ठरवलेल्या सर्व गोष्टी पूर्ण केल्या आहेत का? मी जे काम केले ते बरोबर होते? मी कुठे चुकलो? या वर्षी वेगळ्या प्रकारे काम करण्याची आवश्यकता आहे का, असे अनेक प्रश्न आपण स्वत:ला विचारायला पाहिजेत. ज्या व्यक्तीस परिवर्तनाची इच्छा असते, तिने वरील प्रश्नांबद्दल जागरूक असणे आवश्यक ठरते. मगच गाडी रुळावर यायला सुरुवात होऊ शकेल.

बरेचदा आपण केलेला संकल्प अनेक प्रलोभनांमुळे व इच्छाशक्तीअभावी तोडतो. क्वचितच ते पूर्ण करतो. म्हणून प्रथम संकल्प नेहमी वास्तविक असायला पाहिजेत जेणेकरून ते आपल्या आयुष्यात परिवर्तन घडवून आणण्याची ताकद ठेवतात. संकल्प हे आपण स्वत:ला दिलेले वचन असते. आपण स्वत:ला दिलेले वचन पाळू शकत नसू तर दुसऱ्याला दिलेले कसे पाळणार? वचन पाळण्याची सवय कशी लागणार? जेव्हा आपण वचनास जागतो, तेव्हा तीन फायदे होतात - १. आपण सिद्ध करतो की आपणात बदलण्याची शक्ती आहे. २. आपण स्वत:वर अवलंबून राहू शकतो आणि ३. ठरविल्यास स्वत:मध्ये सकारात्मक बदल घडवून आणू शकतो.
 



आपण बरेचदा संभ्रमात असतो, की आपण विचारांनी तयार झालो आहोत की आपण आपले विचार तयार करतो? याचे उत्तर दोन्ही आहे. रोज आपल्या विचारांमुळे भावना, वर्तन आणि परिणाम आपोआप उद्भवतात. जर आपल्याला विचारांची जाणीव राहिली आणि त्याप्रति आपण सजग, संवेदनशील राहिलो, तर आपण त्यांची दिशा बदलू शकतो. असे झाल्यास भावना, वर्तन आणि परिणाम बदलण्यास मदत होत असते. जेव्हा आपण आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवू शकत नाही, तेव्हा ते आपल्यावर नियंत्रण ठेवतात. मग आपण एक स्वयंचलित यंत्र बनून राहतो. आपल्या विचारांवर आपले जेवढे नियंत्रण असते, त्याप्रमाणात आपल्याला यश मिळते. आपणास स्वयंचलित यंत्र व्हायचे नसेल आणि पहिला संकल्प सिद्धीस न्यायचा असेल; तर दुसरा संकल्प करणे महत्त्वाचे ठरते. तो संकल्प म्हणजे आपल्या विचारांची जागरूकता वाढविणे. आपल्यात सकारात्मक तसेच नकारात्मक विचार येत असतात. एक आपल्याला प्रेरणा, प्रोत्साहन, शक्ती देतात, मुक्त करतात; तर दुसरे गुलाम, अशक्त करतात. आपले मन, शरीर, आत्मा एकत्रित असल्यामुळे एका भागात जे घडते त्याचा परिणाम दुसऱ्या भागातही होऊ शकतो आणि म्हणून संकल्प करताना तो खात्रीलायक असायला पाहिजे. जेव्हा आपण आपल्या संकल्पाला चिकटून राहतो, तेव्हा आपण अधिक मजबूत होतो. आपला आत्मविश्वास वाढतो. संकल्पात शब्द व त्यामागचा अर्थ महत्त्वाचा असतो. जीवनाचा हेतू साध्य करायचा असल्यास अर्थरूपी संकल्प हवा. तो लघुदृष्टीचा नसावा. उदा. ‘यापुढील वर्षी मी (मला असलेले) व्यसन करणार नाही.’ यापेक्षा ‘मी माझ्या निरोगी जीवनासाठी व्यसन करणार नाही,’ हे अधिक अर्थपूर्ण आहे.

जीवनात ध्येय, हेतू महत्त्वाचे असतात. ते प्राप्त करण्यासाठी सावधगिरी बाळगा, संतुलित जीवन जगण्याचा प्रयत्न करा, अतिरेक टाळा, जागरूक राहा. आपले अस्तित्व किंवा हेतूचे कारण काय आहे हे बघण्याची दृष्टी निर्माण करा, दुसऱ्याचे कौतुक करायला शिका, कृतज्ञता व्यक्त करायला शिका. कृती करण्यापूर्वी विचार करा. निसर्ग, कला, संगीत, साहित्य, कविता, शिल्पकला इत्यादीपासून आनंद घ्यायला विसरू नका.

आयुष्य एक वर्षाचे नसते, ते सातत्याने सुरू असते. म्हणून संकल्प हा आयुष्याचा करा. केवळ एक वर्षाचा नव्हे. सरत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी आत्मपरीक्षण करा. झालेल्या चुका पुन्हा होणार नाहीत याची काळजी पुढील वर्षी घ्या. परंतु हे करताना कोणताही ताण घेऊ नका. सहजतेने जीवन जगा, संघर्ष टाळा. उत्सव ज्या मानसिकतेने साजरा करता त्याच मानसिकतेने आयुष्यही संकल्पाच्या माध्यमातून जगा. यश जास्त मिळेल. आपणास नवीन वर्षासाठी शुभेच्छा!

Web Title: one should do resolution for life changes and positivity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.