एखाद्या चलनाची किंमत किती घसरावी आणि त्यामुळे त्या देशाच्या अर्थव्यवस्थेला किती हादरे बसावेत? सध्या इराण या स्थितीतून जात आहे. डॉलरच्या तुलनेत त्यांचं चलन ऐतिहासिक नीचांकी पातळीवर पोहोचलं आहे. इराणमध्ये एका डॉलरची किंमत तब्बल १४ लाख रियालपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे इराणचं अक्षरश: कंबरडं मोडलं आहे.
या घसरणीमुळं देशात महागाई आणखी प्रचंड वाढली आहे. रियालमधील ही महाप्रचंड घसरण अशा वेळी झाली आहे, जेव्हा इराण आधीपासूनच अमेरिका आणि पश्चिमी देशांच्या प्रतिबंधांविरोधात झुंज देत आहे. रियालचा दर घसरल्यानं त्याचा थेट परिणाम लोकांच्या जीवनमानावर आणि जगण्या-मरण्यावर होत आहे. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की इराणच्या सेंट्रल बँकेचे प्रमुख मोहम्मद रजा फरजिन यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. वाढती महागाई, घसरती क्रयशक्ती आणि सरकारच्या आर्थिक नीतींवर नाराज असलेल्या लोकांनी सरकारचे वाभाडे काढायला सुरुवात केली आहे. जागोजागी आंदोलनं, निदर्शनं होत आहेत. देशाची इतकी घसरण का झाली, जनता दोन वेळच्या जेवणाला महाग का झाली, म्हणून लोक सरकारला जाब विचारताहेत.
डिसेंबरमध्ये देशातील महागाई दर ४२.२ टक्क्यांपर्यंत पोहोचला, जो मागील वर्षीच्या तुलनेत खूप जास्त आहे. हा दर नोव्हेंबरच्या तुलनेतही १.८ टक्क्यांनी अधिक आहे. याचा सर्वात मोठा फटका सामान्य लोकांच्या दैनंदिन गरजांना बसला आहे.
अधिकृत आकडेवारीनुसार, खाण्या-पिण्याच्या वस्तूंच्या किमती मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे ७२ टक्क्यांनी वाढल्या आहेत. आरोग्य आणि मेडिकल सेवांच्या खर्चात सुमारे ५० टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना जगणं मुश्कील झालं आहे. हे कमी म्हणून की काय, याच दरम्यान, इराणच्या सरकारी मीडियामधील बातम्यांनी लोकांची चिंता आणखी वाढवली आहे. २१ मार्चपासून सुरू होणाऱ्या इराणी नववर्षापासून सरकार टॅक्स आणखी वाढवण्याचा विचार करीत आहे. लोक आधीच महागाईनं त्रस्त असताना करवाढीच्या शक्यतेनं लोकांमध्ये राग आणि भीती दोन्ही वाढले आहेत. लोकांच्या जगण्या-मरण्याचं सरकारला काही पडलं आहे की नाही? जनतेचा काहीही विचार न करता नेते आणि राजकारणी मात्र स्वत:च्याच तुंबड्या भरण्यात मग्न असल्यानं जनता संतापानं अक्षरश: धुमसते आहे.
बँकांनी जाहीर केलेला दर एक डॉलरला जवळपास ४२ हजार रियाल दाखवला जातो. हा दर जागतिक बाजारात किंवा औपचारिक रूपांतरण साधनांवर आधारित असतो; पण इराणच्या मुक्त विदेशी विनिमय बाजारात, खऱ्या व्यवहारात डॉलरचा दर साधारण १४ लाख रियालपर्यंत आहे.
अलीकडच्या काळात झिम्बाब्वे या देशानं मात्र मोठा ‘इतिहास’ घडवला आहे. २००७-२००८मध्ये झिम्बाब्वेमध्ये डॉलरचं मूल्य प्रचंड वेगानं घसरलं. २००८च्या अखेरीस तर एका अमेरिकन डॉलरला अब्जावधी झिम्बाब्वे डॉलर अशी स्थिती आली होती. महागाईचा दर एका वर्षात ७९,६००,०००,००० टक्के (७९.६ अब्ज टक्के) इतका पोहोचला होता. २००९ मध्ये सरकारनं स्वतःचं चलन बंद करून अमेरिकी डॉलर अधिकृत व्यवहारासाठी वापरायला सुरुवात केली. २०१८मध्ये व्हेनेझुएलाच्या बोलिव्हर या चलनाचा दरही एका अमेरिकन डॉलरला २,४८,००० बोलिव्हर इतका घटला होता!
Web Summary : Iran's currency has hit a historic low, with one dollar equaling 1.4 million rials. This devaluation fuels inflation, impacting living standards amid existing U.S. sanctions. Public anger over economic policies is rising, marked by protests and demands for governmental accountability.
Web Summary : ईरान की मुद्रा ऐतिहासिक निचले स्तर पर पहुंच गई, एक डॉलर 14 लाख रियाल के बराबर है। इस अवमूल्यन से मुद्रास्फीति बढ़ रही है, जो मौजूदा अमेरिकी प्रतिबंधों के बीच जीवन स्तर को प्रभावित कर रही है। आर्थिक नीतियों पर जनता का गुस्सा बढ़ रहा है, विरोध प्रदर्शन और सरकारी जवाबदेही की मांग हो रही है।