अनिवासी भारतीयांनी विकासात योगदान द्यावे
By Admin | Updated: February 7, 2015 00:08 IST2015-02-07T00:08:30+5:302015-02-07T00:08:30+5:30
गणराज्य दिनानिमित्त अमेरिकेचे अध्यक्ष नुकतेच भारतात येऊन गेले. आपल्या भेटीत त्यांनी अनेक कार्यक्रमांतून आपले विचार व्यक्त केले.

अनिवासी भारतीयांनी विकासात योगदान द्यावे
गणराज्य दिनानिमित्त अमेरिकेचे अध्यक्ष नुकतेच भारतात येऊन गेले. आपल्या भेटीत त्यांनी अनेक कार्यक्रमांतून आपले विचार व्यक्त केले. सिरीकोर्ट आॅडिटोरियम येथे त्यांनी दिलेले भाषण अत्यंत महत्त्वपूर्ण होते. निवडक लोकांसमोर भाषण देताना ते म्हणाले की, ‘अमेरिकेत ३० लाख भारतीय वंशाचे लोक सध्या वास्तव्य करीत आहेत. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत ते महत्त्वपूर्ण योगदान देत आहेतच, पण हे अनिवासी भारतीय लोक भारतालासुद्धा प्रगतिपथावर नेण्यासाठी खूप काही करू शकतात.’
२० व्या शतकातील ६० व्या दशकात डॉक्टर, इंजिनिअर, चार्टर्ड अकाउंटंट, प्रोफेसर या श्रेणीतील हजारो प्रोफेशनल अमेरिकेत स्वत:चे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी गेले. हे भारतीय पुन्हा भारतात परत आले नाहीत. त्यापूर्वीदेखील मोठ्या प्रमाणात भारतीय लोक उदरनिर्वाहासाठी अमेरिकेत गेले होते. तेथील चांगल्या जीवनमानामुळे आणि तेथे मिळणाऱ्या सुखसोयीमुळे ते अमेरिकेतच रमले. त्यांनी भारतात परत येण्याचे नावच काढले नाही. काही लोक परत आलेसुद्धा. पण भारतात त्यांना तशा सुखसोयी आणि तेवढे वेतनमान न मिळाल्याने ते पुन्हा अमेरिकेत निघून गेले. अशातऱ्हेने अनेकांनी अमेरिकेचे नागरिकत्व पत्करले. ६०व्या दशकात वा त्यापूर्वी जे भारतीय अमेरिकेत गेले ते खूप संपन्न झाले. काही उद्योगपती झाले, तर काहींनी स्वत:च्या बँका, हॉटेल्स आणि मॉटेल्स सुरू केले. काहीजण आयात-निर्यातीचा व्यवसाय करू लागले. पण लोकांनी ते ज्या गावातून अमेरिकेत गेले, त्या गावाच्या विकासासाठी काहीही केले नाही. उलट गावाची दुरवस्था पाहून ते त्याबद्दल भारत सरकारलाच दोष देत राहिले. वास्तविक त्या गावातील लोकांना अमेरिकेत स्थायिक झालेल्या आपल्या लोकांविषयी केवळ आत्मीयताच वाटत नव्हती, तर त्यांनी आपल्या गावाचा लौकिक वाढविला याचा अभिमान वाटत होता. भारत परिवर्तनाच्या वळणावर आज उभा असताना, या अनिवासी भारतीयांनी आपापल्या जन्मभूमीच्या विकासासाठी योगदान देण्याची गरज आहे. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी आपल्या भाषणातून त्यांच्याविषयी अशीच अपेक्षा व्यक्त केली आहे.
अलीकडे बंगळुरू, चेन्नई, मुंबई, हैदराबाद, दिल्ली यांसारख्या निवडक शहरांत अमेरिकेत आजवर वास्तव्य करीत असलेले डॉक्टर आता स्वत:चे क्लिनिक सुरू करून भारतीयांना आपल्या ज्ञानाचा फायदा देऊ लागले आहेत. येथे आल्यावर त्यांच्या लक्षात आले आहे की, अमेरिकेत त्यांना ज्या सुखसोयी मिळत होत्या, त्या प्रकारच्या सुखसोयी भारतातील अनेक शहरांतही त्यांना कमी दरात उपलब्ध होऊ लागल्या आहेत. मोठमोठे बंगले कमी भाड्याने त्यांना मिळू लागले आहेत. अमेरिकेत जी कामे त्यांना स्वत:ला करावी लागत होती ती करण्यासाठी भारतात त्यांना नोकरही मिळतात. भारतातील ज्या हवामानाची त्यांना सवय होती व जे त्यांना अमेरिका - इंग्लंडसारख्या देशात मिळत नव्हते तसे हवामान या उतारवयात त्यांना अनुभवायला मिळू लागले आहे. केवळ डॉक्टरच नव्हे, तर बिझिनेस मॅनेजमेंटची डिग्री असलेले भारतीयसुद्धा भारतातील मोठ्या कंपन्यांत चांगल्या पगारावर काम करू लागले आहेत. काहींनी भारतात येऊन स्वत:चा उद्योग थाटून त्यात यश मिळविले आहे.
आज अमेरिकेत असे भारतीय आहेत की ज्यांच्यापाशी अपरंपार पैसा आहे. अशी माणसे भारतात गुंतवणूक करू शकतात व भारतात पायाभूत सोयी निर्माण करण्यासाठी साह्य करू शकतात. दुर्दैव हे की, त्यांना यासंदर्भात मार्गदर्शन करणारे कुणी नाही. सुदैवाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनिवासी भारतीयांना आश्वासन दिले आहे की, त्यांनी जर त्यांच्या पैशाची भारतात गुंतवणूक केली तर त्यांचा पैसा सुरक्षित राहण्याची हमी दिली जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी दिलेल्या आश्वासनावर विसंबून अमेरिकेत वास्तव्य करणाऱ्या गर्भश्रीमंत ज्येष्ठ नागरिकांनी आपापल्या गावाच्या विकासासाठी आपल्या पैशाचा उपयोग यापुढे केला पाहिजे. ते त्यांचे कर्तव्यच आहे.
गेल्या १०० वर्षांत भारतातून लाखो लोक जगभरातील भिन्न भिन्न देशांत उद्योग उदिमासाठी जाऊन तेथे स्थायिक झाले आहेत. भारतात इंग्रजांचे राज्य असताना, इंग्रज व्यावसायिकांनी अनेक कुशल भारतीय कामगारांना जहाजातून भिन्न भिन्न राष्ट्रांत काम करण्यासाठी अनेक आकर्षणे दाखवून नेले. मॉरिशस, सूरीनाम, द. आफ्रिका, फिजी, इतकेच नव्हे तर इंग्लंड, आॅस्ट्रेलिया यांसारख्या राष्ट्रांत हे लोक काम करता करता तेथेच स्थायिक झाले. इतकेच नव्हे तर तेथील नागरिकत्वही त्यांनी स्वीकारले. त्यापैकी अनेक जण संपन्नता अनुभवत आहेत. कुणी तेथे खासदार झाले आहेत, तर काही पंतप्रधानपदापर्यंतही पोचले आहेत. मूळ भारतीय असलेले महेंद्र चौधरी फिजीमध्ये पंतप्रधान झाले. मलेशिया आणि सिंगापूर येथेही अनेक भारतीय आहेत, जे तेथे व्यवसाय करता करता श्रीमंत झाले आहेत. ते भारतात गुंतवणूक करू इच्छितात, पण त्यांना त्याविषयी मार्गदर्शन करणारे कुणी नाही. भारतातील शासकीय अधिकारी त्यांना परकीयच मानतात. त्यांना येथे चांगली वागणूक मिळाली, तर ते निश्चित भारतात गुंतवणूक करण्यास तयार होतील.
डॉ. गौरीशंकर राजहंस
माजी खासदार