आता हिंदी गळ्यालाही घोळवावा लागेल 'ळ'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2020 02:54 AM2020-11-24T02:54:13+5:302020-11-24T02:57:19+5:30

या पार्श्वभूमीवर भाषा अभ्यासक प्रकाश निर्मळ यांचे प्रयत्न फार मोलाचे आहेत. निर्मळ यांच्या पाठपुराव्यामुळं आता मराठीतल्या ‘ळ’चा समावेश हिंदी वर्णमालेत झाला आहे.

Now you have to mix 'L' with Hindi | आता हिंदी गळ्यालाही घोळवावा लागेल 'ळ'

आता हिंदी गळ्यालाही घोळवावा लागेल 'ळ'

googlenewsNext

सुकृत करंदीकर

मराठी संस्कृतोद‌्भव आहे का यावरून वाद घालण्याची गरज खरं तर अठराव्या शतकातच राजारामशास्री भागवत यांनी मोडीत काढली. सुमारे दोन हजार वर्षांचा इतिहास असलेली मराठी पूर्ववैदिक भाषा असल्याचं एव्हाना भाषा तज्ज्ञांनी स्पष्ट केलं आहे.  भाषा प्रवाही असते. कालौघात संस्कृत, कन्नड, तेलुगूसारख्या अनेक भारतीय भाषांमधले शब्द मराठीत रुळले. बहामनी काळापासून म्हणजे चौदाव्या ते सतराव्या शतकापर्यंतची तीनशे वर्षं महाराष्ट्राच्या सत्ताधीशांची भाषा फारसी होती. या फारसीचं आक्रमण प्रचंडच आहे. इमारत, जागा, जिल्हा, तालुका, जमीन, हवा, गुलाब, गरीब, पैसा असे अक्षरशः शेकडो फारसी शब्द मराठीत ठाण मांडून बसले आहेत. आता या शब्दांचं मूळ मराठी नाही यावर कोण विश्वास ठेवेल? मराठीचं नशीब थोर म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आलं. शिवरायांनी मातृभाषेचं महत्त्व जाणलं आणि राज्याभिषेकानंतर रघुनाथपंत हणमंते या पंडितावर ‘राज्यव्यवहार कोश’ निर्माण करण्याची जबाबदारी सोपवली. त्यामुळं तीनशे वर्षांचं फारसीचं आक्रमण थोपवण्यात मराठीला काहीअंशी यश मिळालं. पुढं इंग्रजी सत्ता आली. या इंग्रजीनं मराठीला चांगलंच ग्रहण लावलं. आता मराठीचा आग्रह धरणं हा गुन्हा वाटावा, इतका इंग्रजीचा थाट आहे. रवींद्रनाथ टागोरांनी ‘आमार शोनार बांगला’ म्हटलं की हृदय उचंबळतात; पण ‘जय महाराष्ट्र’ म्हटलं की मग ‘प्रादेशिक’, ‘संकुचित’ म्हणून हिणवलं जातं. या तथाकथित बुद्धिवाद्यांची ही भोंगळ मांडणी दुर्लक्ष करावी अशीच ! समृद्धीच्या बाबतीत अनेक भाषांच्या तुलनेत मराठी अधिक रसाळ, मधाळ, रसरशीत, टवटवीत, खटकेबाज आणि सौष्ठवपूर्ण असल्याची खूणगाठ मनी बांधावी. दरिद्री असलेच तर मराठीचा आग्रह न धरणारे तुम्ही-आम्ही !!

या पार्श्वभूमीवर भाषा अभ्यासक प्रकाश निर्मळ यांचे प्रयत्न फार मोलाचे आहेत. निर्मळ यांच्या पाठपुराव्यामुळं आता मराठीतल्या ‘ळ’चा समावेश हिंदी वर्णमालेत झाला आहे. ‘ळ’ चा ‘ल’ असा चुकीचा वापर हिंदी पट्ट्यात कोणी केला तर केंद्र सरकारच्या हिंदी आणि राजभाषा विभागाकडे तक्रार करण्याची निर्मळ यांची मागणी केंद्र सरकारने मान्य केली आहे. ‘‘ळ’’ हे व्यंजन द्रविड भाषांमध्ये आहे. मराठीतही आहे. खरं तर हिंदीवगळता चौदा भारतीय भाषांमध्ये आहेच. त्यामुळं मराठीतले काळे, टिळ‌क, गोपाळ, बाळासाहेब फक्त हिंदीत गेले की ‘काले’, ‘तिलक’, ‘गोपाल’, ‘बालासाहेब’ होतात. हे चुकीचे उच्चार आता थांबतील, अशी आशा करूया. 

हिंदीची लिपीदेखील मराठीप्रमाणेच देवनागरी. एकूण १२ स्वर, ३४ व्यंजनं अशा ४६ अक्षरांची ही देवनागरी लिपी. तरीही हिंदी वर्णमालेत एवढी वर्षं ‘ळ’ नव्हता. पण त्यातही मराठी थोडी वेगळीच. ‘चाळा’मधला ‘च’ वेगळा आणि ‘चहा’तला ‘च’ निराळा. ‘जागा’ आणि ‘जग’ यातला ‘ज’ वेगळा.  मराठी माणसांप्रमाणेच मराठी भाषाही तशी अवघडच. ‘मराठी भाषा ही मुमुर्षु आहे’, असा संताप ब्रिटिश राजवटीतच सन १९२६मध्ये इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी व्यक्त केला होता. ‘मुमुर्षु’ म्हणजे मरणासन्न, मरणाची इच्छा धरणारी. राजवाडे कर्ते विचारवंत होते, नुसतेच बोलके नव्हे. ‘मराठीखेरीज दुसऱ्या भाषांतून लिहिणार नाही’, असा पण त्यांनी केला आणि आयुष्यभर कटाक्षाने तो पाळलाही. त्यांना दुसरी भाषाच येत नव्हती, असं मात्र मुळीच नव्हतं. फ्रेंच, रशियन या भाषा मुळातून वाचण्याइतकं ज्ञान राजवाडेंना होतं. गेल्या शतकाच्या प्रारंभी झालेले रानडे, गोखले, टिळक, आगरकर, डॉ. आंबेडकर, सावरकर यासारख्या कितीतरी प्रज्ञावंतांचं  इंग्रजी, संस्कृत, फारसी अशा अनेक भाषांवर प्रभुत्त्व होतं. ते ब्रिटिशांच्या भुवया उंचावतील अशा फर्ड्या इंग्रजीत बोलत. पण मराठीतही ही मंडळी तितकीच बलदंड होती.

राजवाडे म्हणाले तसं मराठी मुमुर्षु नाही, हे गेल्या शंभर वर्षात दिसलं आहे. पण ती वर्धिष्णू व्हायची तर ‘ऑक्सफर्ड’प्रमाणं दरवर्षी त्यात नव्या शब्दांची भर घातली पाहिजे. कालसुसंगत शब्दांची निर्मिती केली पाहिजे. निर्मळ यांनी ‘ळ’ला हिंदीच्या दरबारात जागा मिळवून दिली. पण ळ, ण या व्यंजनांनी सुरू होणारा शब्दही मराठीत नाहीच. ळ आणि णने सुरू होणारे शब्द मायमराठीत प्रसवण्याचं, रुजवण्याचं आव्हान कोणी स्वीकारील का? ‘ळ’च्या निमित्तानं एवढा गळा तर काढलाच पाहिजे.

(लेखक लोकमत पुणे आवृत्तीचे सहसंपादक, आहेत)

Web Title: Now you have to mix 'L' with Hindi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.