आता दिल्लीत डागडुजी, बदल.. आणि कदाचित धक्केही! मोदी मोठे निर्णय घेणार...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 09:04 IST2025-02-27T09:01:40+5:302025-02-27T09:04:36+5:30
नजीकच्या काळात केंद्र सरकारमध्ये काही बदल होतील. काही मंत्र्यांना पक्षकार्यासाठी पाठवले जाईल. पंतप्रधान सध्या नव्या गुणवत्तेच्या शोधात आहेत !

आता दिल्लीत डागडुजी, बदल.. आणि कदाचित धक्केही! मोदी मोठे निर्णय घेणार...
हरीष गुप्ता
नॅशनल एडिटर, लोकमत, नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या रचनेत काही मोठे बदल करू इच्छितात; काही मंत्रालयांची डागडुजी होण्याचीही शक्यता आहे. पंतप्रधान सध्या नव्या गुणवत्तेच्या शोधात आहेत, हे नक्की! नुकतेच मोदींनी शक्तिकांत दास यांना पंतप्रधान कार्यालयात दुसरे प्रधान सचिव म्हणून नेमले. आर्थिक क्षेत्रात सध्या जे काही चालले आहे त्यावर पंतप्रधान समाधानी नसल्याचे हे द्योतक मानले जाते. दास यांना अकल्पितपणे मिळालेल्या या बढतीमुळे राजधानीतल्या सत्तावर्तुळात अस्वस्थता निर्माण होणे स्वाभाविक होते, असे सूत्रांकडून समजते. या बदलामागे देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती हा मुद्दा तर होताच, शिवाय संबंधित मंत्रालयांकडून तत्परतेने प्रशासकीय प्रतिसाद न मिळणे हेही एक कारण असल्याची चर्चा सध्या दिल्लीत आहे. अजूनही नोकरशाही अडथळे निर्माण करते, लालफितीचा कारभार चालतो असे म्हटले जाते. अनेक प्रकरणांच्या बाबतीत प्रशासकीय आणि धोरणात्मक बाजूने वेळीच निपटारा झालेला नाही. भारतामध्ये कारभार सुकर होण्याच्या गोष्टी केल्या जात असल्यातरी पदोपदी अडथळे निर्माण होत असल्यामुळे काम करणे कठीण असल्याचे ट्रम्प प्रशासनाने अलीकडेच जाहीरपणे म्हटले होते. स्वाभाविकच काही पायाभूत सुविधा तसेच महत्त्वाच्या आर्थिक क्षेत्राशी संबंधित मंत्रालयांमध्ये उपाययोजना आवश्यक झाली. आता काही बदल दिसतील.
मात्र अशा परिस्थितीत निष्ठावान माणसे शोधणे हाही एक प्रश्न असतो. येत्या ४ एप्रिलला अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा संपेल. काही कारणांनी थोडाफार विलंब झाला नाही तर तोवर संघटनात्मक मांडामांड पूर्ण झालेली असेल. सरकारमध्येही काही बदल होतील. काही मंत्र्यांना पक्षाचे काम करण्यासाठी पाठवले जाईल. कारण भविष्यात अनेक आव्हानांना सामोरे जावयाचे आहे. सर्वसाधारणपणे शपथविधी समारंभानंतर काही वर्षे जाऊ देऊन मोदी अशाप्रकारचे बदल करतात; परंतु चाकोरीबाहेरचा विचार करू शकणारी नवी गुणवत्ता आता त्यांना हवी आहे. जागतिक आव्हाने समोर ठेवून यातून मार्ग काढण्यासाठी असे करणे गरजेचे आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात काही धक्के बसतील असे दिसते.
... अखेरीस रेखा गुप्ता !
मोदी सरकार २०१४ पासून महिला नेत्याच्या शोधात होते. मोदी दिल्लीत आले तेव्हा अनेक प्रमुख महिला नेत्या पक्षाकडे होत्या. परंतु, जसजसा काळ पुढे सरकला तशी परिवाराशी जोडल्या गेलेल्या प्रमुख महिला नेत्यांची गरज भाजपला कायमच जाणवत राहिली. आपला ठसा ज्याच्यावर असेल अशा नव्या नेत्याच्या शोधात मोदी होते. आणि शेवटी रेखा गुप्ता
यांच्या रूपाने त्यांना तसे नेतृत्व सापडले.
रेखा गुप्ता या प्रारंभापासून संघ परिवाराशी जोडल्या गेलेल्या असून, पक्षात विविध स्तरावर त्यांनी काम केले आहे. निवडून आलेल्या आमदारांनी रेखा गुप्ता यांची नेतेपदी औपचारिक निवड करण्याची प्रक्रिया सुरू होण्याच्या आधीच मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक होऊन मुख्यमंत्र्यांचे नाव निश्चित झालेले होते.
रेखा गुप्ता यांची निवड करण्याची मोदी यांची पद्धत माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यासाठी मात्र चिंतेची बाब ठरू शकते. दिल्ली भाजपचा चेहरा म्हणून माध्यमातल्या काही मंडळींनी इराणी यांना समोर ठेवले होते. मीनाक्षी लेखी याही मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत होत्या. भाजपच्या हिमाचलातील खासदार कंगना राणावत काही प्रभाव टाकू शकल्या नाहीत. रेखा गुप्ता मात्र पहिल्यांदाच निवडून आल्या. यापूर्वी त्यांचा दोनदा पराभव झाला आहे. एकाअर्थाने त्या अचानक समोर आल्या. दिल्ली हा देशाचा चेहरा आहे. तेथे डबल इंजिनचे सरकार आल्यावर रेखा गुप्ता यांना काही ठोस करून दाखविण्याची संधी आहे. परंतु, त्यांना त्यासाठी आपली क्षमता सिद्ध करावी लागेल हेही तितकेच खरे.
harish.gupta@lokmat.com