आता हे नवेच विष!
By Admin | Updated: July 22, 2015 22:35 IST2015-07-22T22:35:02+5:302015-07-22T22:35:02+5:30
बऱ्याच दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी सत्तेला विषाची उपमा दिली होती. त्यातून त्यांना कदाचित असे सुचवावयाचे असेल की, जनता जनार्दनाच्या कल्याणासाठी राजकारणातून

आता हे नवेच विष!
बऱ्याच दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी सत्तेला विषाची उपमा दिली होती. त्यातून त्यांना कदाचित असे सुचवावयाचे असेल की, जनता जनार्दनाच्या कल्याणासाठी राजकारणातून सत्ताकारणात जाणाऱ्यांना हे विषदेखील प्राशन करावे लागते. पण राहुल गांधींच्या मनातील भाव समजून न घेता, त्यांच्यावर तेव्हां बरीच टीका झाली होती. आता याच विषाचा नवा ‘प्रयोग’ बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केला आहे आणि तेदेखील एका वादात सापडले आहेत. कसेही करुन बिहारची सत्ता हस्तगत करायचीच या जिद्दीने जसे नरेन्द्र मोदी पेटले आहेत तसेच कसेही करुन मोदींच्या भाजपाला बिहारच्या सत्ताकारणात घुसखोरी करु द्यायची नाही, या जिद्दीने नितीश-लालू आणि मुलायम हे तिघे पेटले आहेत. त्यासाठी त्यांनी जनता परिवार नावाचे गारुड तयार करुन जयप्रकाश नारायण यांच्या मुशीत तयार झालेल्या साऱ्यांना एका झेंड्याखाली आणण्याचा निर्धार केला आहे. यातील मुलायम यांचा तसा बिहारच्या सत्ताकारणाशी व्यक्तिगत पातळीवर काही संबंध नाही. त्यामुळे जोवर उत्तर प्रदेशात या परिवाराची हाळी दिली जाऊन त्यांच्या स्थानाला काही धक्का बसत नाही, तोवर ते बिहारात या परिवाराला समर्थन देण्याबाबत उत्साही आहेत. पण नितीश आणि लालू यांचे तसे नाही. त्यांची राजकीय पाळेमुळे बिहारातच गाडली गेलेली आहेत आणि उभयता सत्तेबाबत अत्यंत महत्वाकांक्षी आहेत. त्यामुळे जनता परिवाराची तथाकथित ‘सैद्धांतिक’ भूमिका दोहोंनी स्वीकारलेली असली तरी प्रत्यक्ष निवडणुकीला सामोरे जातानाचा जागावाटप हा फार मोठा आणि विवाद्य मुद्दा अजूनही त्यांच्या पटलावर आलेला नाही. पण त्याआधीच नितीश यांनी केलेल्या एका ट्विटमुळे मोठी धमाल उडाली आहे. त्यांना कोणीतरी म्हणे असा प्रश्न विचारला की, लालूंच्या राजदला सोबत घेऊन तुम्ही बिहारचा विकास कसा काय करु शकणार? उत्तरात नितीश लिहिते झाले, ‘जो रहीम उत्तम प्रकृती का करी सकत कुसंग, चंदन विष व्यापत नहीं लपटे रहत भुजंग’! म्हणजे चंदनाच्या झाडाला भुजंगाने विळखा घातला तरी चंदनाचा सुगंध जसा लोप पावत नाही, तसेच उत्तम पुरुषांचे असते! आता यातील उत्तम पुरुष म्हणजे दस्तुरखुद्द नितीशकुमार हे सांगण्याची गरज नाही. पण भुजंग कोण? नितीशकुमार यांनी ज्या प्रश्नाच्या उत्तरात हे काव्य वापरले, तो प्रश्न लालूप्रसाद यांच्या संदर्भातला असल्याने साहजिकच भुजंगाची उपमा लालूंना दिल्याचा योग्य अर्थ सर्व संबंधितांनी काढला आणि अवघ्या बिहारात मोठी खळबळ माजली. जातीवंत राजकारण्याप्रमाणे नितीश यांनी हा उल्लेख लालूंना नव्हे तर भाजपाला उद्देशून असल्याचे सांगून सारवासारव सुरु केली असली तरी तिच्यावर कोणी विश्वास ठेवायला तयार नाही. नशीब सदरचे ट्विट आपण केलेलेच नाही वा आपले ट्विटर खाते कुणीतरी पळवून नेले असेही ते म्हणाले नाहीत. बऱ्याचदा उत्तम पुरुषही मनातल्या रास्त भावना गाफीलपणे का होईना व्यक्त करुन जातो हेच खरे!