आता सर्वसमावेशक काँग्रेस हाच आधार!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2020 02:21 AM2020-12-28T02:21:46+5:302020-12-28T02:21:59+5:30

देशाच्या राजकीय पटलावर विविध राजकीय पक्ष सत्तेवर येतात आणि जातात.

Now the all-inclusive Congress is the basis! | आता सर्वसमावेशक काँग्रेस हाच आधार!

आता सर्वसमावेशक काँग्रेस हाच आधार!

Next

- मोहन जोशी

अस्वस्थतेच्या  वातावरणातला देश काँग्रेसकडे आशेने पाहत आहे ! आज काँग्रेस पक्षाचा वर्धापनदिन; त्यानिमित्ताने...

आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या व त्यानंतर देशाच्या विकासाचा भक्कम पाया रचणाऱ्या काँग्रेस पक्षाचा २८ डिसेंबर हा वर्धापनदिन म्हणजे कोट्यवधी कार्यकर्ते व जनतेच्या दृष्टीने ऐतिहासिक प्रेरणादिनच होय. स्वातंत्र्यानंतर प्रदीर्घ काळ काँग्रेसने देशाला नेतृत्व दिले. पंडित जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी, पी. व्ही. नरसिंहराव, डॉ. मनमोहनसिंग अशा काँग्रेसच्या पंतप्रधानांनी देशाच्या वाटचालीचा भक्कम पाया रचला, देशाला आत्मनिर्भर केले. त्याचबरोबर  लोकशाही, राष्ट्रीय एकात्मता, सर्वधर्मसमभाव आणि सामाजिक समता ही मूल्येदेखील समाजात खोलवर रुजवली. हे काँग्रेस पक्षाचे फार मोठे पायाभूत कार्य मानावे लागेल. हाच ऐतिहासिक वारसा यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी, सरचिटणीस प्रियांका गांधी आणि सर्व ज्येष्ठ नेते समर्थपणे पुढे चालवत आहेत.

भारतासारख्या कृषिप्रधान देशात कष्टकरी शेतकरी, दलित, पददलित, मागासवर्गीय, भटकेविमुक्त, आदिवासी, अल्पसंख्याक आणि त्याचबरोबर देशात काँग्रेसच्या धोरणांमुळे मोठ्या प्रमाणात उदयास आलेल्या मध्यमवर्गाला केंद्रबिंदू मानून त्यासाठीची धोरणे काँग्रेसने सतत आखली. महिला आणि युवावर्गाच्या आशा आकांक्षांनादेखील सातत्याने मोठे बळ दिले. त्यामुळेच केवळ राजकीय पक्ष न राहता काँग्रेस हा देशाचा विचार बनला. १८९१, १९२० (नागपूर) आणि स्वातंत्र्यानंतर १९५९ अशा तीनवेळा महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाची अधिवेशने झाली. त्यातील २६ डिसेंबर १९२० रोजी नागपूर येथे झालेल्या काँग्रेस महाअधिवेशनाची शताब्दी नुकतीच संपन्न झाली. भारतीय असंतोषाचे जनक असणाऱ्या लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर महात्मा गांधींचे नेतृत्व पुढे आले. त्याच कालखंडातील हे अधिवेशन होते.  काँग्रेसचा  सर्व घटकांना सामावून घेऊन पुढे जाण्याचा निर्धार आजही अबाधित राहिला आहे. काँग्रेसने कोट्यवधी गरीब जनतेला दारिद्र्यरेषेच्या वर आणले. राष्ट्रीय एकात्मता, सर्वधर्मसमभाव आणि सामाजिक समता या त्रिसूत्रीला शिरोधार्य मानून सारा समाज एकसंघ ठेवला.

गेल्या पाच-सहा वर्षांत मात्र देशात काही शक्ती चक्रे उलटे फिरविण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. जाती व धर्मांमध्ये तेढ वाढवून समाजात असुरक्षित वातावरण निर्माण होत आहे. न्यायव्यवस्था, निवडणूक आयोग, प्रसार माध्यमे यांच्या स्वातंत्र्याचा संकोच होताना दिसतो. मूठभर उद्योगपतींच्या हितासाठी खासगीकरण मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आता रेल्वेही यास अपवाद राहणार नाही.  काँग्रेस पक्षाने दिलेली किमान हमीदराची तरतूदही गुंडाळून मोठ्या भांडवलदार, कॉर्पोरेट जगताला कृषी क्षेत्र खुले केले जात आहे. 
ही सगळी धोरणे सर्वसामान्य जनतेच्या हिताची निश्चित नाहीत. देशात शेतकऱ्यांचा उद्रेक झालेला दिसतो तो याच पार्श्वभूमीवर ! कोरोना काळातील अवघ्या चार तासांचा कालावधी देऊन नोटबंदीप्रमाणेच लॉकडाऊनही जाहीर केले गेले. त्यात कोट्यवधी स्थलांतरित गरीब, कष्टकरी मजुरांचे अतोनात हाल झाले. त्यांना आधार दिला तो काँग्रेस पक्षानेच !

देशाच्या राजकीय पटलावर विविध राजकीय पक्ष सत्तेवर येतात आणि जातात. १९८० मध्ये काँग्रेसने फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घेतली. आता पुन्हा कोट्यवधी तरुणांचे आशास्थान बनलेल्या व बेकारीचा प्रश्न सोडविण्याची धमक असणाऱ्या काँग्रेस पक्षाकडे साऱ्या लोकशाहीवादी आणि प्रागतिक विचारांची जनता आशेने पाहत आहे. त्यातूनच काँग्रेसच्या विचारांचा प्रभाव वाढत राहील.

 

Web Title: Now the all-inclusive Congress is the basis!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.