आता अफझल गुरुचेही स्मारक ?
By Admin | Updated: March 3, 2015 23:09 IST2015-03-03T23:09:47+5:302015-03-03T23:09:47+5:30
मुफ्ती-भाजपा सरकारचा शपथविधी होताच त्यांनी पाकिस्तानसह काश्मिरातील दहशतवादी संघटनांचे कौतुक करून मोदींना व त्यांच्या परिवाराला अडचणीत आणले.

आता अफझल गुरुचेही स्मारक ?
मुफ्ती मोहम्मद सईद आणि त्यांचा पीपल्स डेमॉक्रेटिक पक्ष, नरेंद्र मोदींपुढील संकटे वाढवीत निघाला आहे. त्यांच्या नेतृत्वातील मुफ्ती-भाजपा सरकारचा शपथविधी होताच त्यांनी पाकिस्तानसह काश्मिरातील दहशतवादी संघटनांचे कौतुक करून मोदींना व त्यांच्या परिवाराला अडचणीत आणले. शपथविधीनंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी संसदेवर हल्ला चढविणाऱ्या अफझल गुरू या दहशतवाद्याचे दिल्लीच्या तिहार तुरुंगात पुरलेले प्रेत मागून त्यांच्यावरची आपत्ती आणखी वाढविली आहे. अफझल गुरुच्या नेतृत्वात दहशतवाद्यांच्या टोळीने २००१ च्या फेब्रुवारीत संसदेवर सशस्त्र हल्ला चढविला होता. त्यावेळी संसदेचे कामकाज चालू होते आणि तेव्हाचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यासह सगळे संसद सदस्य सभागृहात अडकले होते. संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेतील जवानांनी त्यांच्या प्राणांची बाजी लावून अफझलच्या सर्व साथीदारांना ठार केले आणि अफझलला पकडण्यात यश मिळविले. त्या लढतीत सुरक्षा दलातील दोघांना शहिदी मरणही आले. त्यानंतर अफझल गुरुविरुद्ध रीतसर फौजदारी गुन्हा दाखल होऊन त्याला सत्र न्यायालय, उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय या साऱ्यांनी गुन्हेगार ठरवून मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. राष्ट्रपतीकडे त्याने केलेला दयेचा अर्जही राष्ट्रपतींनी फेटाळून लावला. हा सारा काळ, म्हणजे फेब्रुवारी २००१ ते डिसेंबर २०१३, अफझल तिहारच्या तुरुंगात होता. त्यावेळी केंद्रात डॉ. मनमोहन सिंगांचे सरकार होते. हे सरकार अफझलला जिवंत ठेवून त्याला जास्तीची दया दाखवीत असल्याचा आरोप भाजपाचे नेते तेव्हा उच्चरवाने करीत होते. अखेर गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पुढाकार घेऊन अफझलला फासावर चढविले आणि त्याचे प्रेत तिहार तुरुंगातच पुरले गेले. तेव्हापासूनच मुफ्तींचा पक्ष देशाने अफझलवर अन्याय केला अशी ओरड करीत राहिला. आता तो पक्ष भाजपाच्या मदतीने काश्मिरात सत्तेवर आला आहे आणि त्याने आपल्या पहिल्याच वक्तव्यात पाकिस्तानसह सर्व दहशतवादी संघटनांचे जाहीर कौतुकही केले आहे. त्या पक्षाची कार्यक्रमपत्रिका आरंभापासूनच पाकिस्तानाकुल व दहशतीला संरक्षण देणारी राहिली आहे. तिला अनुसरूनच त्या पक्षाने अफझल गुरुचे प्रेत तुरुंगातून काढून काश्मिरातील त्यांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्याची मागणी केली आहे. मुफ्तींच्या पक्षातील ज्या आठ आमदारांनी तशा मागणीचे पत्रक काढले त्यात त्यांच्या सरकारातील एक मंत्री व पक्षाचा प्रवक्ताही सामील आहे. परिणामी ज्याला तत्काळ फाशी द्या असे भाजपाने म्हटले त्याचेच प्रेत साऱ्या इतमामानिशी काश्मिरात पोहचविण्याची व आपल्या मित्र पक्षाला समाधानी करण्याची जबाबदारी भाजपावर आली आहे. अफझल गुरुचे प्रेत काश्मिरात नेले की तेथे त्यावर मजार बांधली जाणार आणि ते अतिरेक्यांच्या उत्सवाचे स्थळ होणार. तशीही भाजपाच्या मित्र पक्षांना खुनी इसमांची व दहशतखोरांची स्मारके उभारण्याची सवय आहे. गांधीजींचा खून करणाऱ्या गोडसेची मंदिरे उभारण्याची भाषा बोलणारी माणसे भाजपातच आहेत. इंदिरा गांधी व जनरल वैद्य यांचा खून करणाऱ्यांना धर्मवीर म्हणवीत त्यांच्या गौरवशीला शिरोमणी अकाली दल या भाजपाच्या मित्र पक्षाने अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात याआधी उभारल्याही आहेत. खुनी माणसांना सरोपे देऊन त्यांची गौरवशाली छायाचित्रे प्रकाशीत करण्यामागचा अकाल्यांचा हेतू उघड आहे. मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या पक्षानेही तोच कित्ता गिरवीत आता अफझल गुरुचे स्मारक उभारण्याचा संकल्प केल्याचे दिसत आहे. भाजपाचे मित्र पक्ष अशी देशद्रोह्यांची व दहशतखोरांची स्मारके देशात उभारणार असेल तर त्याच्या सांस्कृतिक क्षेत्राला एक विषाक्त वळण मिळणार आहे. दहशतखोरांनाही प्रशंसक मिळतात. छत्तीसगड, मध्य प्रदेश, ओडिशा आणि महाराष्ट्राचा गडचिरोली जिल्हा यांत पोलिसांकडून मारल्या गेलेल्या दहशती नक्षलवाद्यांची अशी स्मारके कोणालाही पाहता येणारी आहेत. विषाला अमृताची फळे येत नाहीत. अमृत उगवायचे तर त्यासाठी अमृतच पेरावे लागते. द्वेष आणि तिरस्कार यावर ज्यांचे राजकारणच नव्हे तर समाजकारणही उभे असते त्यांच्या वाढीला येणारी फळेही द्वेष आणि तिरस्काराचीच असतात. भाजपाने परधर्माच्या द्वेषाचे राजकारण आजवर केले. आपल्या विचारसरणीला विरोध करणाऱ्यांचाही तिरस्कार त्याने तेवढ्याच टोकाचा केला. आताची त्याची गरज त्या तिरस्कृतांशीच राजकीय समझोते करण्याची आहे. मुफ्तींशी जुळवून घेण्याच्या त्याच्या आताच्या प्रयत्नांना त्यामुळे विषाचीच फळे येणार आहेत... सध्या तरी भाजपाच्या स्थानिक पुढाऱ्यांनी मुफ्तींच्या पक्षाने केलेल्या अफझल गुरुच्या प्रेताच्या मागणीला विरोध दर्शविला असला तरी पक्षाच्या राजकारणाची गरज त्यांना तो विरोध सोडायला लावणारच नाही असे नाही. त्या स्थितीत देशाच्या संसदेवर हल्ला करणाऱ्याचे ‘पुण्यपावन’ स्मारक काश्मिरात उभारण्याचे श्रेय मुफ्ती मोहम्मद सईद यांच्याएवढेच भाजपाच्या व पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांच्याही वाट्याला येईल. असा क्षण देशाच्या इतिहासात येऊ नये एवढेच अशा वेळी सांगायचे. देशद्रोह्यांचे व हिंसाचाऱ्यांचे कौतुक करणाऱ्यांचा समाज कधी मोठा होत नाही आणि ते करणारी माणसे नेहमी लहानच राहत असतात.