पर्यटनस्थळ नव्हे!
By Admin | Updated: July 19, 2015 22:47 IST2015-07-19T22:47:39+5:302015-07-19T22:47:39+5:30
नाशिक जिल्ह्याच्या पेठ या आदिवासी तालुक्यातील हरसूल या गावाची रचना आणि तेथील निसर्ग पाहू जाता, ते एक अत्यंत आकर्षक पर्यटनस्थळ म्हणून विकसित होऊ शकते.

पर्यटनस्थळ नव्हे!
नाशिक जिल्ह्याच्या पेठ या आदिवासी तालुक्यातील हरसूल या गावाची रचना आणि तेथील निसर्ग पाहू जाता, ते एक अत्यंत आकर्षक पर्यटनस्थळ म्हणून विकसित होऊ शकते. पण आजवर तशी कोणतीही दखल न घेणारे अनेक सरकारी अंमलदार सध्या मात्र या ‘पर्यटनस्थळाकडे’ धाव घेत असून, गेल्या आठवडाभरापासून त्या गावाचे जे धुमसणे सुरू आहे, त्याची म्हणे सहानुभूतीने चौकशी आणि पाहणी करीत आहेत. परंतु ते करीत बसण्यापेक्षा त्यांनी संबंधित पोलीस यंत्रणेला कामाला लावले आणि काम करूही दिले तर आणि तरच या धुमसण्याचा अंत होऊ शकतो. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे हरसूलचा पेच किंवा दंगा जातीय नसून आदिवासी विरुद्ध पोलीस असा आहे. मुळात आदिवासी जमातीइतकी गरीब, पापभीरू आणि कोणाच्याही अध्यातमध्यात न पडणारी दुसरी कोणतीही जमात नाही. असे असताना, हा समाज इतका का संतापून उठतो, हे न्यायालयीन चौकशांमधून लक्षात येणारे नाही. एका आदिवासी युवकाची हत्त्या झाली पण त्याच्या हत्त्येकऱ्यांना स्थानिक पोलीस संरक्षण देत आहेत, असा समस्त गावकऱ्यांचा वहीम वा संशय आहे. सदरची हत्त्या होताना पाहणारे आणि हत्त्या करणाऱ्यांना ओळखणारे काही लोक त्याच गावात आहेत, असे सांगितले जाते. पण ही बाजू लक्षात न घेता, पोलिसांनी तपास कार्यातही हलगर्जी केली असे लोक उघड बोलू लागले आहेत. याच लोकांच्या संतापाचा गेल्या आठवड्यात उद्रेक झाला आणि संतप्त गावकऱ्यांनी पोलिसांवर हल्ला केला. संतापलेल्या जमावावर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी पोलिसांनी जो गोळीबार केला, त्यातही एक आदिवासी युवकच मारला गेला. साहजिकच राज्याच्या विधिमंडळात त्याचे पडसाद उमटले आणि ठोकळेबाज पद्धतीने न्यायालयीन चौकशीची मागणी केली गेली. ही न्यायालयीन चौकशी कशाची; गोळीबाराची, बंदच्या दिवशी झालेल्या लुटालुटीची की दंगलीची? मुळात हे तिन्ही प्रकार प्रतिक्रियेच्या रूपात घडले गेले आहेत. लोकांना अपेक्षा आहे ती, भगीरथ तुळशीराम चौधरी या बावीस वर्षीय तरुणाची जी हत्त्या केली गेली, त्या हत्त्येचा नीट तपास करण्याची व हत्त्येकऱ्यांना जेरबंद करण्याची. पण तिकडे कोणाचेच लक्ष दिसत नाही. त्यामुळे जोवर हे सारे घडून येत नाही तोवर हरसूल पहिल्यासारखे शांत आणि निवांत होणे, एकूण कठीणच आहे.