शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

राजकारणाचा नको, माणुसकीचा वाजवूया भोंगा!

By किरण अग्रवाल | Updated: May 2, 2022 15:43 IST

Not politics, let's sound the horn of humanity : विकासाचे सारे मुद्दे संपले म्हणून की काय, राज्यात सध्या भोंग्याच्या विषयावरून राजकीय गहजब सुरू आहे.

 -  किरण अग्रवाल

राज्यात राजकीय भोंग्यांचे कर्कश आवाज येत असले तरी, त्यात अडकण्यापेक्षा सामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठीचा जागर अगोदर व्हायला हवा. तप्त उन्हात कासावीस होणाऱ्या जिवांची तृष्णातृप्ती करण्यासाठी यंत्रणांच्या कानाशी भोंगे वाजविणे प्राधान्याचे आहे, पण ते सोडून भलतेच सुरू आहे.

 

एकीकडे उन्हाचा कडाका वाढून सामान्यांच्या घशाला कोरड पडली असताना दुसरीकडे राज्यात भोंग्यांवरून राजकीय वातावरण गढूळ होऊ पाहताना दिसत आहे; त्यामुळे हे भोंगेपुराण आवरा आणि तहानलेल्यांना पाणी पुरवा असे ओरडून सांगण्याची वेळ आली आहे.

विकासाचे सारे मुद्दे संपले म्हणून की काय, राज्यात सध्या भोंग्याच्या विषयावरून राजकीय गहजब सुरू आहे. प्रार्थना स्थळावरील भोंग्यांवरून हा विषय पुढे आल्याने त्याचा संबंध धर्माशी जोडला जात आहे; पण धार्मिक तणाव अनुभवून झालेली जागोजागची सामान्य जनता यापासून हात झटकून दूर असलेली दिसत आहे ही खूप मोठी समाधानाची बाब आहे. याचे कारणही साफ आहे, ते म्हणजे भोंग्यांपेक्षा जगण्या मरण्याशी निगडित सामान्यांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत; त्यामुळेच राजकीय पातळीवर चर्चित या विषयावर स्थानिक व सामाजिक पातळीवर प्रतिध्वनी उमटलेले नाहीत. परस्परातील सामाजिक सलोख्याची व बंधुत्व भावाची वीण घट्ट असल्याची खात्री यातून पटून जावी.

 

आज स्वयंपाकाचा गॅस महाग झाला आहे. इंधनाचे दरही वाढले असून, डाळींचे भाव वाढल्याने गृहिणींच्या किचनचे बजेटही कोलमडले आहे, ई पास मशीन बंद पडल्याने रेशनवरचे धान्य मिळण्यात अडचणी येत आहेत, पण राजकारण्यांना भलतेच भोंगे वाजविण्यात स्वारस्य दिसत आहे. भलेही ध्वनिप्रदूषण व पर्यावरणाच्या दृष्टीने भोंग्यांचा विषय उपस्थित केला गेला असेल, पण त्यासंबंधीचे भोंगे वाजविण्यापेक्षा जनसामान्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नांकडे यंत्रणांचे लक्ष वेधण्यासाठी भोंगे का वाजविले जाऊ नयेत? काँग्रेसने समयसूचकता दाखवीत तेच केले म्हणायचे. त्यांनी महागाई वाढल्याबद्दल भोंगे वाजविले.

 

महत्त्वाचे म्हणजे सध्या उन्हाळा सुरू असून, यंदा जागतिक विक्रम नोंदविण्याइतके तापमान वाढलेले आहे. प्रथेप्रमाणे उन्हाळ्याच्याअगोदर सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांनी पाणी टंचाईचे आराखडे तयार करून लाखो रुपयांच्या निधीची तरतूदही करून ठेवली आहे; पण प्रत्यक्षात अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची बोंब होताना दिसत आहे. अकोला, बुलडाणा, वाशिमसारख्या जिल्ह्याच्या ठिकाणी चार दिवसांआड पाणीपुरवठा होत असून, ग्रामीण भागात तर यापेक्षा वाईट स्थिती आहे. मनुष्याच्याच नव्हे तर गुराढोरांच्या व पशुपक्ष्यांच्या चारा पाण्याची व्यवस्थादेखील बिकट बनत चालली आहे. यावरील उपाय योजनाबाबत स्वस्थ असलेल्या लोकप्रतिनिधी व प्रशासनालाही जागे करण्यासाठी खरे तर भोंगे वाजविण्याची गरज आहे.

 

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून निर्णय प्रक्रिया लांबल्याने अकोला महापालिकेत लोकप्रतिनिधींची राजवट संपुष्टात आली असून, प्रशासनाचे राज्य सुरू आहे. बरे, निवडणुकाही लांबल्याने आता तर माजी झालेले नगरसेवकही नागरी समस्यांपासून तोंड लपवू पाहताना दिसत आहेत. मग आपल्या चालीने वा गतीने काम करू पाहणाऱ्या प्रशासनाच्या कानाशी भोंगे कोण वाजविणार? बाहेर उन्हाचा चटका बसतो म्हणून जिल्हा परिषदांमधील वातानुकूलित कक्षात बसून कारभार रेटणाऱ्या लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांना ग्रामीण भागात हंडाभर पाण्यासाठी होणारी दमछाक कशी दिसणार? असे इतरही अनेक विषय आहेत ज्याकडे तातडीने लक्ष पुरविणे गरजेचे आहे, पण आपले राजकारणी भलत्याच विषयात गुंतलेले दिसत आहेत.

 

सारांशात, राजकीय धबडग्यात क्षीण होत चाललेल्या माणुसकीचाच जागर गरजेचा आहे. गेल्या कोरोनाच्या संकटात पद, पैसा, प्रतिष्ठा, आदी सारे व्यर्थ ठरून माणुसकीच कामात आल्याचे प्रकर्षाने बघावयास मिळाले होते, या संकटातून नवा जन्म लाभलेल्यांनी भलत्या भोंग्यांच्या आवाजात आपल्या कानठळ्या बसू न देता माणुसकी व सर्वधर्मसमभाव जपणुकीचा भोंगा वाजविण्याची भूमिका घ्यायला हवी इतकेच यानिमित्ताने.