अभिव्यक्तीचा अधिक्षेप नको, पण...
By Admin | Updated: October 15, 2016 00:13 IST2016-10-15T00:13:31+5:302016-10-15T00:13:31+5:30
महाराष्ट्र साहित्य परिषदेने सातारा जिल्ह्यातील पाटण येथे भरविलेल्या विभागीय साहित्य संमेलनाची जी दुर्दैवी सांगता झाली ती अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि समूहभावना यांचा

अभिव्यक्तीचा अधिक्षेप नको, पण...
महाराष्ट्र साहित्य परिषदेने सातारा जिल्ह्यातील पाटण येथे भरविलेल्या विभागीय साहित्य संमेलनाची जी दुर्दैवी सांगता झाली ती अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि समूहभावना यांचा गांभीर्याने विचार करणाऱ्या साऱ्या जाणकारांनाच अंतर्मुख करणारी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारविश्वाला वाहिलेल्या या संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रज्ञा दया पवार या मान्यवर कवयित्री होत्या. आंबेडकरी विचारांचे एक ज्येष्ठ अभ्यासक डॉ. रावसाहेब कसबे हे या संमेलनातील एक वक्ते होते. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून बोलणारी माणसे अतिशय स्वाभाविकपणे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारी व त्या स्वातंत्र्याची गळचेपी करण्याचे होणारे प्रयत्न निंदनीय ठरविणारी असणार. रावसाहेब कसबे यांनी आपल्या भाषणात छत्रपतींविषयी काढलेले उद््गार आणि मराठा मोर्चांसंबंधीचे त्यांचे वक्तव्य अनेकांच्या रोषाचा विषय बनले. आजच्या राजकीय व सामाजिक असहिष्णुतेच्या काळात असे विषय वादाचे बनले नाहीत तरच ते आश्चर्य ठरावे. आपल्याला न आवडणारा वा आपल्या मताविरुद्ध जाणारा विचार ऐकून घेण्याची लोकशाही प्रवृत्ती दिवसेंदिवस कमी होत जाण्याचा हा काळ आहे. स्वाभाविकच प्रज्ञा पवार आणि कसबे यांच्यावर रागावलेल्या शिवसेनेच्या स्थानिक आमदाराने ते संमेलनच गुंडाळायला लावून पवार आणि कसबे यांना तत्काळ पाटण सोडण्याची आज्ञा केली. हा सारा प्रकार केवळ दुर्दैवीच नाही तर आपल्या समाजधारणांमध्ये येऊ लागलेल्या अतिशय कर्मठ आणि राजकारणसंगत वृत्तीशी जुळणारा आहे असे म्हणूनच थांबावे लागते. ज्या आमदाराने तो केला तो शिवसेनेचा आणि ज्या नेत्याने या संमेलनाचे यजमानपद भूषविले ते राष्ट्रवादी काँग्रेसचे. त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयीच्या या वादाला एक राजकीय वळणही होते. राजकारणातील पुढाऱ्यांनी वाङ्मयीन व्यासपीठांवर येऊ नये असा आग्रह दुर्गाबाईंपासून अनेकांनी धरला पण राजकारण्यांचे आर्थिक वजन आणि साहित्यिकांची आर्थिक लाचारी यामुळे तसे प्रत्यक्षात कधी घडले नाही. देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत असल्याची चर्चा जुनी आहे. अल्पसंख्य, दलित व वंचितांंच्या समस्या मांडणाऱ्या माणसांची अभिव्यक्ती केवळ मारलीच जात नाही तर त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय-अत्याचाराच्या कथांनी अलीकडची वर्तमानपत्रे भरलेली आपण पाहिली आहेत. या वर्गाच्या बाजूने उभे राहणे हे वाङ्मयाएवढेच सामाजिक क्षेत्राचेही काम आहे. दुर्दैवाने समाजातला मोठा वर्ग आपल्या या दायित्वाचे भान न राखणारा आहे. त्याचमुळे अशी संमेलने उधळली जातात आणि त्यातल्या अभ्यासकांवर भाषणबंदी लादली जाते. या संमेलनात येणाऱ्या व बोलणाऱ्या अभ्यासकांनाही आताच्या काळात एक पथ्य पाळणे आवश्यक आहे. ज्या समाजासमोर व श्रोतृवर्गासमोर आपण बोलायला जातो त्याच्या भावभावनांचा आदर वक्त्यांनी केला पाहिजे. त्याचवेळी अभ्यासू म्हणविणाऱ्या वक्त्यांनी आपल्या भाषणात पुढे केलेले संदर्भ अचूकही असले पाहिजेत. डॉ. कसबे यांनी आपल्या भाषणात शिवाजी राजांनी आपल्या राज्याभिषेकासाठी मोठी दक्षिणा देऊन काशीच्या गागा भट्टाला बोलावून घेतले असे म्हटले. वास्तव हे की गागा भट्ट हा मुळात मराठी माणूस होता व त्याचे नाव विश्वेश्वर दिनकर कावळे असे होते. तेवढ्यावरच त्याचा शिवाजी राजांशी असलेला संबंध थांबत नाही. कावळे हे घराणे घृष्णेश्वरचे व शिवाजी राजांचे आजोबा मालोजी राजे यांच्या कुलोपाध्यायाचे होते. हा विश्वेश्वर लहानपणी बोबडा बोलायचा म्हणून त्याला गागा म्हणूनच चिडविले जायचे एवढेच. हा गागा त्यामुळे संतापून जाऊन सरळ काशीला गेला व तेथे त्याने धर्माध्ययन केले. त्याचा अधिकार लक्षात घेऊन त्याला हिंदू धर्मशास्त्रपीठाचे प्रमुखपद दिले गेले. त्याने विद्यापीठे स्थापन केली व धर्मग्रंथ लिहिले. गागा भट्टाचे या काळातील उत्पन्न त्याला कोणाच्याही दक्षिणेवर जगायला लावणारे नव्हते. (हा सारा इतिहास भारतीय संस्कृतीकोषात अत्यंत सविस्तरपणे लिहिला गेला आहे.) तात्पर्य, शिवाजी राजांनी गागा भट्टाला केलेले पाचारण हे आपल्या कुळाच्या कुलोपाध्यायाला दिलेले निमंत्रण होते. पैसे घेऊन राज्याभिषेक करून देणाऱ्या सामान्य भिक्षुकाला दिलेले ते आमंत्रण नव्हते. इतिहासाचे हे संदर्भ एवढ्या मोठ्या प्रमाणात व अशा प्रसिद्ध कोषात उपलब्ध असताना त्याचे छद्मी उल्लेख कोणत्याही प्रतिष्ठित विद्वानाला न शोभणारे आहेत हेही येथे नोंदविले पाहिजे. मात्र तेवढ्याखातर संमेलन उधळणे आणि प्रज्ञा पवार यांच्यासारख्या नामवंत कवयित्रीला गाव सोडून जायला सांगणे ही बाब मात्र मराठी माणसांच्या परंपरेतील सहिष्णुतेच्या व लोकशाही वृत्तीच्या परिपाठात बसणारी नाही. ‘मला तुझे म्हणणे मान्य नाही, मात्र ते मांडण्याच्या तुझ्या अधिकारासाठी मी लढा देईन’ हे व्हॉल्टेअरचे आणि म. गांधींचे उद््गार अशा वेळी आपण आठवले पाहिजेत.