रवी टालेकार्यकारी संपादक, लोकमत, अकोला
'पावसाळ्याने उन्हाळ्याबरोबर हिवाळ्याशीही युती करून, महापावसाळी आघाडी स्थापन करून थंडीला बहुमत असूनही सत्तेबाहेर केले आहे. सगळ्या ऋतूंचा वख्खा विख्खी वुख्खू झाला आहे।' असे एक 'मिम' ज्येष्ठ विनोदी अभिनेते अशोक सराफ यांच्या छायाचित्रासह समाजमाध्यमांवर फिरत आहे. त्यातील विनोदाचा भाग बाजूला ठेवा; पण ते सध्याच्या राजकारणावरील अत्यंत चपखल भाष्य आहे! गेली काही वर्षे राजकारणाचा अक्षरशः चिखल झाला आहे. एकपक्षीय सरकारचे दिवस सरले, युती आघाड्यांचे पर्व सुरू झाले आणि राजकारणाचा स्तर घसरतच गेला. अनेक वर्षे सुसंस्कृत राजकारणासाठी ओळखले गेलेले महाराष्ट्रासारखे राज्यही त्यापासून अलिप्त राहू शकले नाही. विधिमंडळाच्या इमारतीत गल्लीतील गुंडांसारखा राडा बघण्याची वेळही या राज्यावर अलीकडेच आली. सुसंस्कृत राजकारणापासून गलिच्छ राजकारणापर्यतची वाटचाल करताना, भाषेचाही दर्जा खालावणे स्वाभाविकच म्हणावे लागेल. त्याचा (आणखी एक) अनुभव नुकताच आला.
केवळ शिवीगाळ केली म्हणजेच भाषेचा दर्जा खालावतो, असे नसते! अनेकदा संसदीय भाषेतील शब्दांचा वापर करूनही तो परिणाम साधता येतो. कुबड्या, अॅनाकोंडा, पेंग्विन, पप्पू, भस्म्या हे काही असंसदीय शब्द नव्हेत; पण जेव्हा त्या शब्दांच्या साथीला विरोधकांबाबतची विखारी भावनाही येते, तेव्हा भाषेचा दर्जा आपसूकच घसरतो. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुंबई दौऱ्यात 'आता महाराष्ट्रात भाजपला कुबड्यांची गरज राहिलेली नाही', असे विधान केले. महाराष्ट्र विधानसभेत भाजपचे एकट्याचे बहुमत नाही. शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट सरकारमध्ये सहभागी आहेत. असे असताना शाह यांच्या उंचीचा नेता असे वक्तव्य करत असेल, तर त्यांनी मित्रपक्षांना कुबड्या संबोधत त्यांची हेटाळणी केली, अशी चर्चा होणारच! मुख्यमंत्री फडणवीस यांना मित्र कधीच कुबड्या नसतात, अशी मखलाशी करावी लागली.
फडणवीस यांनी शाह यांची भाषा सांभाळून घेण्याचा प्रयत्न केला खरा; पण 'आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू बनू नये', असे विधान करून, स्वतःच पुढची पातळी गाठली. भाजप समर्थक राहुल गांधी यांना 'पप्पू' संबोधत त्यांची हेटाळणी करतात. आदित्य ठाकरे यांनी सोमवारी राहुल गांधी यांच्याप्रमाणेच पॉवर पॉइंट सादरीकरण करत मतचोरीचे आरोप केले. तो संदर्भ फडणवीस यांच्या विधानाला होता. आतापर्यंत भाजप समर्थक आदित्य ठाकरेंना हिणवण्यासाठी आदू बाळ, पेंग्विन असे उल्लेख करत असत. आता फडणवीसांनी भाजप समर्थकांना 'महाराष्ट्राचा पप्पू' हे आणखी एक विशेषण उपलब्ध करून दिले. आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेच्या ज्या निर्धार मेळाव्यात मतचोरीचे आरोप करणारे सादरीकरण केले, त्याच मेळाव्यात त्यांचे वडील उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांचे नाव न घेता 'मुंबई गिळायला एक अॅनाकोंडा येऊन गेला, पण आपण त्याचे पोट फाडून बाहेर येऊ', अशा आशयाचे वक्तव्य केले. त्यावर एकनाथ शिंदे कसे गप्प राहतील? भाजपला महाशक्ती संबोधणाऱ्या शिंदेंनी मग उद्धव ठाकरेंचा 'भस्म्या रोग झालेला अॅनाकोंडा' या शब्दांत उद्धार करत, भाजपप्रतिची निष्ठा सिद्ध केली! शिंदेंच्या या निष्ठेची टर उडवण्यासाठी उद्धवसेनाही शिंदेसेनेला 'मिंधे गट' संबोधत असते !
या सर्व नेतेमंडळींनी विरोधकांना हिणवण्यासाठी वापरलेला यातला कोणताही शब्द असंसदीय श्रेणीत मोडणारा नसला, तरी हे शब्द जेव्हा विरोधकाला अपमानित करण्यासाठी वापरले जातात, तेव्हा त्यांचा परिणाम शिवीपेक्षाही तीव्र होतो. त्यातून भाषेबरोबरच विचारसरणीच्या स्तराचाही हास दिसतो. लोकशाही व्यवस्थेत विरोधकांचा आदर राखणे ही एक परंपरा आहे. पं. नेहरूंनी डॉ. लोहियांचा, अटल बिहारी वाजपेयींनी पं. नेहरूंचा, तर डॉ. मनमोहन सिंग यांनी अडवाणींसारख्या विरोधकांचा नेहमीच सन्मान राखला. महाराष्ट्राला तर सुसंस्कृत नेत्यांची मोठी परंपरा लाभली आहे. यशवंतराव चव्हाण, आचार्य अत्रे, बाळासाहेब ठाकरे, शरद पवार इत्यादी नेत्यांनी विरोधकांवर तीक्ष्ण शब्दांत झोड उठवली, पण त्यामध्ये विखार कधीच नसे. पूर्वी वाद तीव्र असले, तरी भाषा सुसंस्कृत होती. आज मात्र नेत्यांमध्ये जणू कोण अधिक टोचून बोलतो, याचीच स्पर्धा असते.
भाषेचा दर्जा खालावण्यामागे माध्यमेदेखील जबाबदार आहेत. टीआरपीच्या स्पर्धेत उग्र वक्तव्यांना जास्त प्रसिद्धी मिळते. त्यामुळे मृदू भाषेपेक्षा तीव्र भाषा अधिक प्रभावी ठरते, असे नेत्यांना वाटू लागते. त्यातूनच राजकीय भाषणांच्या शैलीला घाणेरडे रूप मिळत जाते. परिणामी, सभ्य आणि संयमी राजकारणी मागे पडतात. राजकारणात मतभेद असतीलच; पण ते व्यक्त करताना विखार नव्हे, तर विचार मांडण्याची परंपरा परत आणण्याची नितांत गरज आहे; अन्यथा भाजपच्या एका प्रचार मोहिमेतील 'अरे, कोठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा?' हा प्रश्न विचारण्याची वेळ मतदात्यांवर येईल! ravi.tale@lokmat.com
Web Summary : Maharashtra's political discourse is degrading, marked by disparaging terms and declining respect among leaders. This shift from cultured debate threatens democratic values. Media's focus on sensationalism exacerbates the issue, demanding a return to respectful dialogue.
Web Summary : महाराष्ट्र की राजनीतिक भाषा अपमानजनक शब्दों और नेताओं के बीच घटते सम्मान से दूषित हो रही है। सभ्य बहस से यह बदलाव लोकतांत्रिक मूल्यों के लिए खतरा है। मीडिया का सनसनीखेज खबरों पर ध्यान इस मुद्दे को और बढ़ाता है, सम्मानजनक संवाद में वापसी की आवश्यकता है।