यापुढील लढा संविधानयुक्त भारतासाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2016 02:44 IST2016-04-14T02:44:12+5:302016-04-14T02:44:12+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीला वेगळा संदर्भ व अर्थ आहे. सध्या संघाच्या नेतृत्वाखालील भाजपाकडे देशाची धुरा आहे. त्यामुळे संघ परिवारालाही बळ मिळाले आहे. अशा स्थितीत

यापुढील लढा संविधानयुक्त भारतासाठी
- अर्जुन डांगळे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीला वेगळा संदर्भ व अर्थ आहे. सध्या संघाच्या नेतृत्वाखालील भाजपाकडे देशाची धुरा आहे. त्यामुळे संघ परिवारालाही बळ मिळाले आहे. अशा स्थितीत भारतीय संविधानाची मूल्ये रुजविण्याची, जोपासण्याची जबाबदारी या देशातील वंचित, कष्टकऱ्यांसाठी लढणाऱ्यांच्या खांद्यावर आली आहे. भाजपाकडून बाबासाहेबांच्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्मारकांच्या घोषणा होत आहेत. मात्र, सामाजिक परिवर्तनाचा विचार रुजविण्यासाठी केंद्र शासन पावले उचलताना दिसत नाही.
डॉ. आंबेडकर विशिष्ट समाजाची मक्तेदारी नाही. त्यांचा लढा देशाच्या विकासासाठी होता. वंचित, कष्टकऱ्यांना माणूसपणाचे हक्क मिळवून देण्यासाठी होता. महिलांना बाळंतपणाची तीन महिन्यांची रजा, कर्मचाऱ्यांना आठ तास ड्युटी, एम्प्लॉयमेंट एक्स्चेंज या बाबी त्यांच्या संकल्पनेतून आल्या. नद्याजोडणी प्रकल्पाची संकल्पनाही त्यांची होती. शेती, सिंचन, वीज, अर्थकारण या सर्व विषयांवर त्यांनी विपुल विचार मांडले. अशा द्रष्ट्या नेत्याचे तत्कालीन नतद्रष्ट सरकारने न ऐकल्याने देशासमोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
पँथरने झंजावात निर्माण केला होता. पण पँथरला कोणीच स्वाभाविकपणे वाढू दिले नाही. आजचे रिपब्लिकन पक्षही आपल्या कलेने चालावेत, असा सर्वच पक्षांचा प्रयत्न असतो. त्याला काही बळी पडतात. आंबेडकरी चळवळ गटातटांत विभागली आहे. ऐक्य होत नाही, टिकत नाही, तरुणांचा पुढाऱ्यांवर विश्वास नाही आणि कुठल्याही गटाची स्वतंत्रपणे लढण्याची ताकद नाही. त्यामुळै रिपब्लिकन पक्षाचा एकजातीय पाया नष्ट करणे आवश्यक आहे.
‘सबका साथ सबका विकास’ हा नारा देत भाजपाने देशाची सत्ता मिळविली. भाजपाच्या प्रचारात समान नागरी कायदा, गोवंश हत्याबंदी, राम मंदिर, ३७० वे कलम, हिंदू राष्ट्र, वंदे मातरम् हे मुद्दे नव्हते. मात्र आता ते असे मुद्दे उकरून काढत देशाला सरंजामी मनोवृत्तीकडे घेऊन जाऊ पाहत आहेत. अनिष्ट प्रथा-परंपरांविरुद्ध सध्याच्या सुरू असलेल्या लढ्याबाबत संघाची चुप्पी दिसत आहे.
क्रांतीचे चाक वेगाने फिरत असते. त्याच वेळी प्रतिक्रांतीही गतिमान होते. हा संघर्ष सतत चालू आहे. आज तो नव्या स्वरूपात सुरू झाला आहे. कोण देशभक्त आणि कोण देशद्रोही, हे ठरविणारे तुम्ही कोण? बाबासाहेब एकेकाळी गांधींना म्हणाले होते, ‘आय हॅव नो मदरलँड’. असे म्हणण्याची वेळ आज तुम्ही आमच्यावर येऊ देऊ नका. यातून केवळ असुरक्षितताच जन्म घेईल. या असुरक्षिततेतून तुम्हाला सत्ता मिळेलही, पण ती सत्ता अराजकता आणि यादवीच्या दिशेने घेऊन जाणारी असेल. रिपब्लिकन जनशक्ती संघटनेच्या माध्यमातून हाच प्रयत्न सुरू आहे. आंबेडकरी पक्षांच्या राजकारणाची कोंडी फोडण्याचे काम तरुणच करू शकतात. यातूनच समविचारी व्यक्ती, संघटनांना घेऊन सर्वसमावेशक भूमिका असणारी नवीन ताकद निर्माण होईल.