ध्वनिमुद्रित संदेश बोटातून ऐकवणारे नवे ‘वेअरेबल’ !
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 09:54 IST2025-02-24T09:51:23+5:302025-02-24T09:54:37+5:30
‘फिजिकल’ व ‘डिजिटल’ माध्यमांच्या संयोगातून ‘शब्देविण संवादू’ घडविण्याचा प्रयत्न सध्या प्रगतिपथावर आहे. ‘वेअरेबल’मधल्या या नव्या प्रयोगाची कहाणी !

ध्वनिमुद्रित संदेश बोटातून ऐकवणारे नवे ‘वेअरेबल’ !
- डॉ. दीपक शिकारपूर, माहिती तंत्रज्ञान
अभ्यासक
सध्या आधुनिक तंत्रज्ञानातला एक मुख्य प्रवाह आहे ‘वेअरेबल’. हे तंत्रज्ञान आपल्याला कपड्यांसोबत किंवा शरीरावर घालता येणाऱ्या वस्तूंसोबत जोडलेले असते. वेअरेबल ही छोटी इलेक्ट्रॉनिक उपकरणे आपल्या शरीरावर किंवा शरीरातील एखाद्या अवयवामध्ये (उदाहरणार्थ त्वचेमध्ये) ठेवल्यावर शरीराचे तापमान, रक्तदाब, रक्तातील ऑक्सिजन, श्वासोच्छ्वासाचा वेग, आवाज, आपले जीपीएस स्थान, शारीरिक हालचाल, हृदय-स्नायू यांची विद्युत क्रिया मोजण्यात मदत करू शकतात. मेंदूमधील क्रियाही मॉनिटर करू शकतात. ही उपकरणे सेन्सर्सच्या मदतीने माहिती जमा करतात आणि ब्लूटूथ किंवा वायफायच्या साहाय्याने तुमच्या स्मार्टफोन किंवा इतर उपकरणांना पाठवतात. सध्या अशी अनेक प्रकारची उपकरणे संशोधनाच्या विविध टप्प्यांवर आहेत जी भविष्यात उपलब्ध होतील... असेच एक तंत्र आहे बोटाद्वारे संदेशवहन !
एखाद्या व्यक्तीला फोन केल्यानंतर ‘...प्लीज रेकॉर्ड यूअर मेसेज आफ्टर द बीप’ हे ऐकावे लागण्याचे दिवस लवकरच संपतील. पण टेप किंवा स्मार्टफोनमधील ‘ॲप’च्या मदतीशिवाय हा ध्वनिमुद्रित संदेश संबंधित व्यक्तीने ऐकायचा कसा? - बोटाच्या स्पर्शातून! या तंत्रामध्ये ध्वनिलहरींच्या प्रक्षेपणासाठी मानवी शरीराचाच वापर केला जातो. आपल्या कानाला बोटाने स्पर्श केला असता हे संदेश ऐकता येतात. विशेष म्हणजे कोणत्याही वस्तूचा, अगदी धातूच्या साध्या पट्टीचाही वापर या कामासाठी करता येतो !
अर्थात अशीच आणखी एक यंत्रणाही अस्तित्वात आहे. तिला ‘द फिंगर व्हिस्परर’ (बोलणारी बोटे) असे नाव आहे. हे एक वेअरेबल इलेक्ट्रॉनिक साधन आहे. यामध्ये संदेश ऐकू इच्छिणाऱ्या व्यक्तीने स्वतःचे बोट स्वतःच्या कानात घातले की शरीरातील हाडांच्या विशिष्ट कंपनांमधून तिला संदेश ऐकू येतात. या तंत्रज्ञानामध्ये मूलतः हातात धरलेला, संगणकाला जोडलेला एक मायक्रोफोन वापरला जातो. संदेश ध्वनिमुद्रित करणाऱ्या व्यक्तीचे संपूर्ण बोलणे रेकॉर्ड केले जाते व संगणकाद्वारे ‘साउंड लूप’ हे तंत्रज्ञान वापरून त्याचे रूपांतर उच्च व्होल्टेजच्या अश्राव्य म्हणजे ऐकू न येणाऱ्या संदेशात केले जाते (या संदेशाचे व्होल्टेज जास्त असले तरी करंट अगदीच कमी असतो !). हा संदेश पुन्हा मायक्रोफोनकडेच पाठवला जातो. मायक्रोफोनधारी व्यक्ती स्वतःच एक ध्वनिक्षेपक बनते. कमी शक्तीच्या या ध्वनिमुद्रित संदेशामुळे तिच्या आसपासच्या ‘इलेक्ट्रोस्टॅटिक’ विद्युतक्षेत्रात बदल (मॉड्युलेशन्स) होतात. आता या व्यक्तीने एखाद्या विद्युतवाहक वस्तूला किंवा दुसऱ्या व्यक्तीच्या कानाला बोट लावला तरी त्या वस्तूचे वा बोटाचे स्पीकरमध्ये रूपांतर होते व ज्या व्यक्तीला स्पर्श केला गेला असेल तिला मूळ संदेश ऐकू येतो.
अशा तऱ्हेच्या संवादमाध्यमासाठी मानवी त्वचा हे सर्वोत्तम साधन आहे. ‘फिजिकल’ आणि ‘डिजिटल’ माध्यमांच्या संयोगातून दोन मानवांमध्ये ‘शब्देविण संवादू’ घडविण्याचा प्रयत्न केला जात आहे.. अर्थात या प्रयोगाच्या यशस्वीतेसाठी संबंधित वस्तूंच्या पृष्ठभागावर कंपने (व्हायब्रेशन्स) उत्पन्न होणे आणि या पृष्ठावर डायइलेक्ट्रिक (प्रत्यक्ष विद्युतप्रवाह नसतानाही विद्युतक्षेत्र असणारा पदार्थ) थर असणे अनिवार्य आहे, त्याचप्रमाणे स्पर्श करणारे बोट संपूर्ण कोरडे असणेही आवश्यक.
परस्परांशी प्रत्यक्ष स्पर्श-संपर्कात असलेल्या तीन-चार व्यक्तीदेखील एकाचवेळी अशाप्रकारे पाठविलेला हा संदेश ऐकू शकतात ! ऐकू येणारा आवाज फार जोराचा नसतो ही या तंत्राची (निदान सद्य:स्थितीतली) मर्यादा म्हणावी लागेल. ज्या लोकांना कानाने ऐकू येत नाही, त्यांच्यासाठी हे तंत्रज्ञान खूपच उपयोगी आहे. ते आपल्या बोटांच्या साहाय्याने आवाज ऐकू शकतात. हे तंत्रज्ञान अजूनही विकासाच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे, पण भविष्यात ते खूप उपयोगी ठरू शकते.
deepak@deepakshikarpur.com