New strategies for rebel warriors .. | आता नाय तर कधीच नाय ! बंडखोर योद्धयांची नवी रणनीती..
आता नाय तर कधीच नाय ! बंडखोर योद्धयांची नवी रणनीती..

- सचिन जवळकोटे
   

कधीकाळी आमदारकीची खुर्ची म्हणजे केवळ विकासाचं माध्यम; मात्र आता हीच खुर्ची प्रत्येक नेत्यासाठी जणू जीवनमरणाचा प्रश्न बनलीय. जीवघेणा संघर्ष ठरलीय. म्हणूनच की काय, उमेदवारी मिळाली नाही तर लगेच बंडाची भाषा बोलू लागलीय. बंडखोर योद्धयांची नवी रणनीती दिसू लागलीय.. कारण हातातोंडाशी आलेला घास हिसकावल्यानंतर बऱ्याच जणांना लक्षात आलंय, ‘आता नाय तर कधीच नाय !’ 

भगवी शिवशाही निसटली;
बारामतीची एसटी पकडली ! 

‘आमदारकी हवी असेल तर स्वत:चा कारखाना हवा’ हे जसं माळशिरसच्या ‘जानकरां’ना समजलं, तसंच ‘कारखाना उभा करायचा असेल तर सत्ता हवी’ हेही त्यांना नंतर ‘उत्तम’पणे उमजलं. म्हणूनच त्यांनी गेल्या काही वर्षांत कमळाचं फूल खिशाला लावून माळशिरस तालुक्यात भगवा ‘झंझावात’ निर्माण केलेला; मात्र लोकसभेपूर्वी ही ‘वात’च   ‘दादा अकलूजकरां’नी अलगदपणे काढून घेतलेली.
त्यानंतरही ‘दादां’शी  जुळवून घेण्याचा प्रयत्न झालेला; मात्र कितीही केले तरी ‘अकलूजकर’ काही आपल्याला तिकीट काढून ‘भगव्या शिवशाही’त बसवणार नाहीत, हे लक्षात आलेलं. त्यामुळं त्यांनी शेवटच्या क्षणी ‘बारामती’च्या एस्टीत खिडकीतून रुमाल टाकून गडबडीत जागा पकडली.. कारण ‘राखीव’मधल्या प्रस्थापित नेत्यांची मानसिकता लग्नाळू मुलीसारखी असते,‘मुलाची शेतीवाडी गावाकडं पाहिजे, परंतु तो कमवायला पुण्या-मुंबईतच पाहिजे.’ म्हणूनच ‘बारामतीची शेती’ कसायला ‘जानकरां’नी घेतलीय; कारण त्यांच्या लक्षात आलंय, नवख्या उमेदवारासमोर आपल्याला कदाचित हीच शेवटची संधी. आता नाय तर कधीच नाय.

सावंतशाही’तली ‘तानाजी सेना’ ‘आबां’ना समजलीच नाही...

‘सत्तेतली चालती-बोलती आमदारकी सोडून अपक्ष लढावं लागणं’ ही तशी एखाद्या नेत्यासाठी अत्यंत धक्कादायक अन् क्लेशकारक घटना. राजकारणात एकच पक्ष अन् एकच नेता धरून चालत नाही. वारा फिरण्यापूर्वीच पाठ फिरवावी लागते, हे ओळखण्यात करमाळ्याचे ‘नारायणआबा’ नक्कीच पडले कमी. त्यापायीच ‘अकलूजकरांचा शिक्का’ बसलेल्या ‘आबां’ना शेवटपर्यंत ‘सावंतशाही’तली नवी ‘तानाजी सेना’ काही उमजलीच नाही. ‘पात्रातली वाळू संपली की नदीचा प्रवाह बदलतो, तसं सेनेतला नेता बदलला की मुंबईचा दृष्टिकोन बदलतो’ हे त्यांना काही समजलंच नाही. तरीही ‘आबा’ लयऽऽ जिगरबाज. त्यांची जिद्द भारीऽऽ. कारण त्यांना एवढं तरी नक्कीच ठावूक की, आता नाय तर कधीच नाय !

हुकूमी सिक्का’ जय होऽऽ

‘सलीम-जावेद’ जोडगोळीलाही एवढी खतरनाक ट्विस्ट असलेली पिक्चर स्टोरी कधी सुचली नसेल, अशी जबरदस्त कहाणी ‘शहर मध्य’मध्ये रंगलीय. खुद्द जिल्हाप्रमुखाचंच तिकीट कुठं कापतात का रावऽऽ? हे म्हणजे ‘शोले’ टाईपच झालं की. अख्खा पिक्चरभर मुरारजी पेठेतल्या ‘विरू’नं ढिश्यूऽऽम ढिश्यूऽऽम करायचं...अन् शेवटच्या सीनला कुमठ्याच्या ‘जय’नं आपला ‘हुकूमी सिक्का’ फेकून मेन हिरो आपणच असल्याचं डिक्लेर करायचं... खरंतर ‘महेशअण्णां’ना सेनेचं राजकारणच अद्याप नीट न कळाल्याचं हे लक्षण. असो.
‘अण्णां’नी आता बंड पुकारलंय. या निवडणुकीत त्यांनी आपलं अख्खं राजकीय करिअर पणाला लावलंय, हेच निश्चित. कारण बंडखोरीनंतर त्यांना सेनेत किती स्थान असेल, हे सांगण्यासाठी कुण्या सर्व्हेची गरज नसावी. ‘काँग्रेसमधली घरवापसी’ तर केवळ ‘माय-लेकीं’वर अवलंबून. शहरात ‘घड्याळ्याचं अस्तित्व’ तर भिंतीवर मिरवण्यापुरतंच. ‘कमळ’वाले दोन्ही देशमुख तर नाकापेक्षा जड मोती कधी बाळगतच नाहीत. त्यामुळं ‘क्षणिक फायद्यापेक्षा कायमचे तोटे किती’ याचं गणित बांधण्यात ‘अण्णा’ मश्गुल. मात्र त्यांचे सारे कार्यकर्ते एकच हट्ट धरून बसलेत ‘अण्णाऽऽ नू निलपडू’ (म्हणजे अण्णाऽऽ तुम्ही उभाराच !) कारण या मंडळींनाही ठावूकाय, ‘आता नाय तर कधीच नाय !’

दिलीपरावां’ना परंपरा जपायचीय..
‘राजाभाऊं’ना इतिहास बदलायचाय !

दोन-तीन वर्षे व्यवस्थित रचून ठेवलेला पट कुणीतरी अकस्मातपणे उधळायचा प्रयत्न केला तर चवताळणं काय असतं, ते सध्या बार्शीतल्या ‘राजाभाऊं’कडं बघून लक्षात येऊ लागलंय. पालिका, पंचायत समिती अन् बाजार समिती ‘भाऊं’च्याच ताब्यात. सत्तेतल्या प्रमुख नेत्यांशी अत्यंत जवळीक. ‘देवेंद्रपंतां’चे लाडके म्हणून गावभर चर्चाही झालेली. त्याच बळावर गावोगावी कुदळी हाणलेल्या. नारळं फोडलेली. अशा परिस्थितीत अकस्मातपणे हातात शिवबंधन बांधून ‘दिलीपरावां’नी नेहमीप्रमाणं आपल्या कुशाग्र बुद्धीची चाणाक्ष खेळी साऱ्या जगाला दाखविली. ‘दर निवडणुकीला आपण चिन्ह बदलतो’ असं मोठ्या कौतुकानं सांगणाऱ्या ‘दिलीपरावां’नी यंदाही तीच परंपरा सुरू ठेवली; मात्र सर्वसामान्य बार्शीकर म्हणे राजकीय नेत्यांपेक्षाही हुश्शाऽऽर. ‘आम्ही तर अधून-मधून आमदारच बदलतो’ याचा दाखलाही इथल्या जनतेनं दिल्याचा इतिहास सांगतो. त्यामुळंच की काय, त्या आशेवर ‘रौतांची चाळ’ कामाला लागलेली. कारण या चाळीतल्या बारक्या लेकरालाही पूर्णपणे कळून चुकलंय ‘आता नाय तर कधीच नाय !’

( लेखक 'सोलापूर लोकमत'चे निवासी संपादक आहेत.)

Web Title: New strategies for rebel warriors ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.