नवे राजकुमार
By Admin | Updated: May 18, 2015 23:32 IST2015-05-18T23:32:04+5:302015-05-18T23:32:04+5:30
सत्तालोलुप राजकारणातील हे ‘नवश्रीमंत राजकुमार’ आहेत. त्यांना बिस्लेरीचे घोेट घेत, कूलरच्या गारव्यात पेपर सोडवता येतात,

नवे राजकुमार
सत्तालोलुप राजकारणातील हे ‘नवश्रीमंत राजकुमार’ आहेत. त्यांना बिस्लेरीचे घोेट घेत, कूलरच्या गारव्यात पेपर सोडवता येतात, कमरेला रिव्हॉल्व्हर खोचून मूक-बधीर शाळेतील मुलांसमोर मर्दुमकी गाजवता येते, बिअरबारचे उद्घाटनही करता येते.
सामान्य नागरिकांसाठी वेगळा न्याय आणि लोकप्रतिनिधी, सेलिब्रेटींसाठी विशेष न्याय, अशी कायद्याची नवी व्याख्या अलीकडच्या काळात वेगाने रूढ होऊ लागली आहे. मंदिरापासून मदिरालयापर्यंत या अतिविशिष्ट व्यक्तींना अतिविशिष्ट सन्मानाची वागणूक मिळत असते आणि त्या गोष्टींचे निर्लज्जपणे समर्थन करणारे काही ‘सल्माननीय’ (‘सन्माननीय’ हा शब्द आता कालबाह्य) माणसे याच समाजात आपल्या अवतीभवती वावरतही असतात. या विशेष सन्मानाच्या सेवा यादीत आता विद्यापीठांच्या परीक्षा केंद्रांचीही भर पडली आहे.राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांना परीक्षार्थी म्हणून परीक्षा केंद्रावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने पुरवलेली अतिविशिष्ट सेवा सध्या चर्चेचा विषय आहे.
आपण ज्या खात्याचे मंत्री आहोत ते खाते सामाजिकदृष्ट्या अतिशय संवेदनशील आहे. या मूल्यांचा विसर या मंत्र्याला पडला आणि त्यांनी स्वत:पुरती सामाजिक न्यायाची सोयीस्कर व्याख्या तयार करून घेतली. मंत्रिमहोदय यावर्षी नागपूर विद्यापीठाच्या डॉ. आंबेडकर विचारधारा या पदव्युत्तर अभ्यासक्रमाची परीक्षा देत आहेत. बडोले पेपर सोडवत असताना त्यांच्या खोलीत कूलरची व्यवस्था करण्यात आली, परीक्षा केंद्रावर त्यांना नास्ता-बिस्लेरी देण्यात आली. त्यांची हुजरेगिरी करण्यासाठी विद्यापीठातील अधिकारी-कर्मचारी पूर्ण वेळ सेवेत होते. हे महाशय परीक्षा केंद्रावर मंत्र्याच्या थाटातच आले. फक्त गाडीवर लाल दिवा तेवढा नव्हता. पहिल्या दिवशी बीएमडब्ल्यू व दुसऱ्या दिवशी स्कोडा आणि सुरक्षा रक्षकांचा ताफा तैनात होता. ‘मंत्रिमहोदय परीक्षा द्यायला जाणार आहेत, बातमी कव्हर करायला या’, असे निरोप त्यांच्या हुजऱ्यांनी सर्वांना आवर्जून पाठवलेही होते. परीक्षेनंतर माध्यमांना बाईट देताना त्यांच्याभोवती असलेला लवाजमा बघितल्यानंतर अतिविशिष्ट सेवेचे इतर पुरावे देण्याची गरज उरत नाही.
हा संतापजनक प्रकार उघडकीस आल्यानंतर नागपूर विद्यापीठाचे अधिकारी असे काही घडलेच नसल्याचा आव आणत आहेत. या विद्यापीठातील बहुतांश परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांचे हाल होतात. त्यांना प्यायला साधे पाणीही मिळत नाही, विद्यार्थ्यांना स्वत: टेबल-खुर्च्या स्वच्छ करून पेपरला बसावे लागते. डॉ. सिद्धार्थ विनायक काणे कुलगुरू झाल्यानंतर ही परिस्थिती सुधारेल असे वाटत होते. पण डॉ. काणे आपल्या कल्पनाविश्वातच रमलेले असतात. ‘पूर्वीच्या कुलगुरूंना विद्यापीठ कसे सांभाळता आले नाही आणि आपणच कसे व्यवस्थित काम करीत आहोत,’ या बढाया मारण्यातच त्यांचा दिवस जातो. त्यांच्याही भोवती जुनेच खुशमस्करे नव्या मुखवट्यात एकवटले आहेत. नागपूर विद्यापीठात माहिती केंद्र नाही. विद्यापीठ परिसरातील अनेक पदव्युत्तर विभागात पुरेसे विद्यार्थी नाहीत. या समस्यांकडे लक्ष द्यायला कुलगुरूंकडे वेळ नाही. राज्याच्या मंत्र्याला व्हीआयपी वागणूक देऊन कुलगुरूंनी त्यांच्यावर असलेल्या राजकीय आणि वैचारिक प्रभावाचे ‘जाहीर’ दर्शन घडविले आहे.
आपण लोकप्रतिनिधी झालो की आपल्याला कसेही वागण्याचा परवानाच मिळतो, अशा मगु्ररीत वावरणाऱ्यांची संख्या वाढत आहे. सत्तालोलुप राजकारणातील हे ‘नवश्रीमंत राजकुमार’ आहेत. त्यांना बिस्लेरीचे घोेट घेत, कूलरच्या गारव्यात पेपर सोडवता येतात, कमरेला रिव्हॉल्व्हर खोचून मूक-बधीर शाळेतील मुलांसमोर मर्दुमकी गाजवता येते, बीअरबारचे उद्घाटनही करता येते. एकीकडे मुख्यमंत्री आपल्या सुरक्षा ताफ्यातील रक्षक कमी करतात, मानवंदनेची जुनाट परंपरा नाकारतात. पण त्यांचेच सहकारी मंत्री सरंजामशहासारखे वागतात.
लातूर नजीकच्या हासेगाव येथील रवी बापटले हा प्रामाणिक कार्यकर्ता एड्सग्रस्त मुलांसाठी उपोषणावर बसतो, या मुलांसाठी काही तरी करा, अशी विनवणी हिवाळी अधिवेशनात काही पत्रकार सामाजिक न्यायमंत्र्यांना करतात, तेव्हा ‘बघू’ एवढेच थंड उत्तर देऊन हेच बडोले निघून जातात. मंत्रिपदाची झूल आणि लाल दिव्याचा झोत कातडीवर पडू लागला की लोकप्रतिनिधी निगरगट्ट बनतात आणि त्यांना सामान्य माणसाच्या सामाजिक न्यायाचा विसर पडत असतो. या सर्व घटना त्याच्याच निदर्शक आहेत.
- गजानन जानभोर