संसदीय जीवनात कधी सत्याची साथ सोडली नाही, ‘द चर्न’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात डॉ. विजय दर्डा यांचे भावनिक उद्गार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 10:09 IST2025-04-04T10:08:01+5:302025-04-04T10:09:25+5:30

Vijay Darda : संसदेतील १८ वर्षांच्या कार्यकाळात मी या देशातील सामान्य माणसांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केले आहे. यासाठी अनेकदा पक्षाच्या भूमिकेच्या पलिकडे जावे लागले. मात्र, सत्याची साथ सोडली नाही आणि नैतिकता जपली.

Never left the side of truth in parliamentary life, Dr. Vijay Darda's emotional statement at the book release ceremony of 'The Churn' | संसदीय जीवनात कधी सत्याची साथ सोडली नाही, ‘द चर्न’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात डॉ. विजय दर्डा यांचे भावनिक उद्गार

संसदीय जीवनात कधी सत्याची साथ सोडली नाही, ‘द चर्न’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात डॉ. विजय दर्डा यांचे भावनिक उद्गार

नवी दिल्ली -  संसदेतील १८ वर्षांच्या कार्यकाळात मी या देशातील सामान्य माणसांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केले आहे. यासाठी अनेकदा पक्षाच्या भूमिकेच्या पलिकडे जावे लागले. मात्र, सत्याची साथ सोडली नाही आणि नैतिकता जपली. 'द चर्न' हे पुस्तक म्हणजे माझ्या संसदीय जीवनाचा सारांश होय, असे भावनिक उद्गार लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन आणि राज्यसभेचे माजी खासदार डॉ. विजय दर्डा यांनी काढले. दिल्लीतील इंडिया इंटरनॅशनल सेंटरमध्ये 'द चर्न' या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.

यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना डॉ. विजय दर्डा म्हणाले की, या देशाच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेमुळे मला १८ वर्षांपर्यंत राज्यसभेचा खासदार म्हणून समाजाची सेवा करता आली. यासाठी मी देशवासीयांचे आणि महाराष्ट्रातील जनतेचा आभारी आहे. या प्रवासात मला राष्ट्रसेवेसाठी समर्पित ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आदरणीय बाबूजी यांचा सहवास आणि प्रेरणा लाभली. तर, माझी जीवनसंगिनी ज्योत्स्ना यांनी एक दिव्यप्रकाश बनून माझ्या मार्गातील अंधार दूर केला. सोबतच या काळात मला ज्यांची साथ लाभली त्या सर्वांचे मी आभार मानतो.

संसदीय जीवनाबाबत सांगताना डॉ. दर्डा म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि भारतीय जनता पक्षाने खासदारकीची ऑफर दिली होती. मात्र, मी ती नाकारली कारण मला काँग्रेसमधून खासदार व्हायचे होते. शेवटी काँग्रेसने आर. डी. प्रधान यांना उमेदवारी दिली आणि मी अपक्ष म्हणून उभा राहिलो. यात माझा विजय झाला.

खासदारकीच्या काळात मला माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यासारख्या थोर नेत्यांचा सहवास लाभला. संसदेच्या विविध समित्यांवर काम केले. १८ वर्षांच्या कारकीर्दीत मी ३४ खासगी विधेयके, ६४ विशेष लेख मांडले आणि २२५५ प्रश्न विचारले. या प्रश्नांवर सरकारने १४३ आश्वासने दिली, असेही त्यांनी सांगितले. महत्वाचे म्हणजे, विदर्भ, यवतमाळ, नागपूर आणि महाराष्ट्रातील लोकांचे आरोग्य, शिक्षण, रोजगार, गरिबी, सामाजिक समस्या महिलांचे हक्क, नक्षलवाद, शेतकऱ्यांच्या आत्महत्या असे विविध विषय उपस्थित केले. नागपुरात सुप्रीम कोर्टाचे खंडपीठ सुरू करण्याचीही मागणी केली होती.

व्हीपमुळे अनुपस्थिती
'द चर्न' या पुस्तकाचे प्रकाशन विधी व न्याय मंत्री अर्जुनराम मेघवाल यांच्या हस्ते होणार होते. याशिवाय, माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल, डॉ. अभिषेक मनू सिंघवी, भाजपचे खासदार डॉ. निशीकांत दुबे आणि बांसुरी स्वराज यांच्यात डिबेट होणार होती. मात्र, वक्फ संशोधन विधेयक राज्यसभेत सादर झाल्यामुळे भाजपने सर्व खासदारांना व्हीप जारी केला होता. यामुळे कुणालाही येता आले नाही.

Web Title: Never left the side of truth in parliamentary life, Dr. Vijay Darda's emotional statement at the book release ceremony of 'The Churn'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.