नेपच्यूनचा शोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 04:08 IST2018-06-17T04:08:51+5:302018-06-17T04:08:51+5:30
मागच्या अंकात आपण बघितले होते की, युरेनसचा शोध सर विल्यम हर्शल यांना १३ मार्च १७८१ च्या रात्री लागला होता. हा ग्रह मालिकेतील ७वा ग्रह ठरला.

नेपच्यूनचा शोध
- अरविंद परांजपे
मागच्या अंकात आपण बघितले होते की, युरेनसचा शोध सर विल्यम हर्शल यांना १३ मार्च १७८१च्या रात्री लागला होता. हा ग्रह मालिकेतील ७वा ग्रह ठरला. आठव्या ग्रहाचा, म्हणजे नेपच्यूनचा शोध मात्र लावण्यात आला होता. इतर ग्रहांच्या कक्षेच्या गणितासारखे युरेनसच्या कक्षेचे गणित बसत नव्हते. कितीही प्रयत्न केला, तरी युरेनसची अचूक कक्षा काढता येत नव्हती किंवा त्याच्या पुढच्या स्थितींचे अचूक भाकीत करता येत नव्हते.
तेव्हा इंग्लडमधे जॉन एडम्स कोच या गणिततज्ज्ञाला कल्पना सुचली. युरेनस ग्रहाच्या पलीकडेही एखादा ग्रह असेल, तर त्याच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव युरेनसवर पडू शकेल आणि खरच जर असा ग्रह असेल, तर त्याला कुठे शोधता येईल, असा विचार करून त्याने उलट गणित मांडायला सुरुवात केली. निरीक्षणातून युरेनसच्या जागा माहीत होत्या. मग या जागांवर त्याला आणण्यास कारणीभूत असलेला ग्रह कुठे असेल, याचे गणित कोचने मांडले व आपले निष्कर्ष त्याने केंब्रिज वेधशाळेच्या संचालक जेम्स चालिस यांच्याकडे पाठविले, पण चालिसने निष्कर्षाला महत्त्व दिले नाही.
काहीसा असाच विचार फ्रांसमध्ये लव्हेरे यानेही केला. त्याने अशाच प्रकारे गणित सोडविले. या शिवाय वेगवेगळ्या तारखांना हा अज्ञात ग्रह वेगवेगळ्या तारखांना कुठे दिसेल, तेही त्याने काढले, पण फ्रेंच खगोलशास्त्रज्ञांंचे लक्ष वेधून घेण्यात त्यालाही यश आले नाही. हा जूनचा महिना होता. त्याने मग आपले निष्कर्ष बर्लिन वेधशाळेच्या जॉन गॉल यांना पाठविले. ज्या दिवशी गॉल यांना लव्हेरेचे पत्र मिळाले, त्याच रात्री त्यानी हेनरिक द अरेस्ट या विद्यार्थ्याबरोबर या नवीन ग्रहाचा शोध घ्यायचे ठरविले. ती तारीख होती २३ सप्टेंबर १८६४. ज्या ठिकाणी लव्हेरेने नवीन ग्रहाचे भाकीत केले होते, त्याच्या खूपच जवळ त्यांना एक नवीन खगोल दिसला. मग दुसऱ्या-तिसºया दिवशी परत त्यांनी निरीक्षणे घेऊन खात्री केली आणि असा युरेनसच्या पलीकडच्या ग्रहाचा शोध लागला. भाकीत केलेली जागा चित्रात चौकोनात दाखविली आहे, तर जिथे युरेनस सापडला, ती जागा वतुर्ळात दाखविली आहे. हा शोध म्हणजे, फ्रेंच लोकांना इंग्रजांवर एक मोठा विजय मिळविल्यासारखा होता. मधल्या काळात लव्हेरेच्या गणिताची माहिती इंग्लंडच्या एस्ट्रॉनॉमर रॉयल जॉर्ज एयरीयांपर्यंत पोचली. यात त्यांना एडमच्या गणिताचे साम्य दिसले आणि त्यांनी युरेनसच्या पलीकडचा हा ग्रह शोधण्याची एक गुप्त मोहीम सुरू केली होती. गंमत अशी की, बर्लिनच्या घोषणेनंतर इंग्लंडच्या लक्षात आले की, त्यांना ६ आणि १२ आॅगस्ट रोजी हा ग्रह दिसला होता, पण त्यांच्याकडे गॉलसारखे आकाशाचे अद्यावत नकाशे नव्हते. त्यामुळे त्यांना त्याची ओळखच पटली नव्हती. या शोधामुळे फ्रेंच आपल्या वर्चस्वाची टिमकी वाजवित होते आणि इंग्रज खजील झाले होते. पुढे इंग्रजांनी या शोधात आपणही भागीदार असल्याचा ओरडाआरडा सुरू केला, पण फ्रेंच त्यास बधायला तयार नव्हते. कालांतरानी पुढच्या पिढीतल्या शास्त्रज्ञांनी एडमच्या शोधाला श्रेय द्यायला हवे हे मानले.
या अनुषंगाने तीन मुद्दे मांडावेसे वाटतात. एक म्हणजे, सर्वप्रथम सांगितल्याप्रमाणे नेपच्यूनचा शोध हा लावण्यात आला होता. दुसरी बाब म्हणजे, जरी नेपच्यूनचा शोध इंग्रजांच्या हातून निसटला असला, तरी हा शोध न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाची पुष्ठी करणारा महत्त्वाचा शोध ठरला होता आणि शेवटी आपला एक समज असतो की, शास्त्रज्ञ म्हणजे सर्वसामान्यांपेक्षा वेगळ्या, खुल्या आणि निष्पक्ष विचारांचा असतो, पण तोही माणूसच असतो आणि त्याच्यातही सर्व माणसांसारखे गुणदोष असतातच. खरं तर हे एक फार मोठं आणि रोचक नाट्य घडलं होतं. यात आपण मानवी स्वभावाचे वेगवेगळे पैलू बघतो. तर शक्य असल्यास तुम्ही इंटरनेटवर याबद्दल अवश्य वाचा.
> हाच तो नकाशा ज्यावर नेपच्यूनचा शोध लागला.