डॅन्यूबकाठी ‘नीरज’ सोनेरी, जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 09:19 AM2023-08-29T09:19:19+5:302023-08-29T09:19:41+5:30

बुडापेस्ट शहरात नीरजने सुवर्ण जिंकले आणि चंद्रयान-३ च्या रूपाने भारतीयांच्या यशाचा जगभर डंका वाजत असतानाच नीरजच्या सोनेरी भालाफेकीने जणू तो आवाज थेट चंद्रापर्यंत पोहोचला.

'Neeraj' gold by the Danube, first Indian to win gold at World Championships | डॅन्यूबकाठी ‘नीरज’ सोनेरी, जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय

डॅन्यूबकाठी ‘नीरज’ सोनेरी, जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय

googlenewsNext

दोन वर्षांनंतर ऑगस्ट महिना व नीरज चोप्राचा जयजयकार असा योग जुळून आला आहे. कोविड महामारीमुळे वर्षभर उशिरा झालेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये दोन वर्षांपूर्वी भालाफेकीत नीरजने सुवर्णपदक जिंकले आणि क्रिकेटशिवाय अन्य कुठल्या तरी खेळात जल्लोषाची संधी तमाम भारतीयांना लाभली. नेमबाज अभिनव बिंद्राने बीजिंग ऑलिम्पिकमध्ये जिंकलेल्या सुवर्णपदकानंतरचे भारताचे हे केवळ दुसरे वैयक्तिक सुवर्णपदक होते. या कामगिरीने नीरज घराघरांत पोहोचला. नंतर तो डायमंड लीगमध्येही सोनेरी कामगिरी करीत राहिला आणि आता डॅन्यूब नदीकाठी वसलेली हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथे सुरू असलेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय तसेच पहिला आशियाई खेळाडू बनण्याचा बहुमान मिळविला.

बुडापेस्ट शहरात नीरजने सुवर्ण जिंकले आणि चंद्रयान-३ च्या रूपाने भारतीयांच्या यशाचा जगभर डंका वाजत असतानाच नीरजच्या सोनेरी भालाफेकीने जणू तो आवाज थेट चंद्रापर्यंत पोहोचला. मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीला, मंगळवारी देश राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करील तेव्हा नीरजचे यश लाखो मुखातून वदले जाईल. बुधवारी नारळी पौर्णिमा म्हणजे रक्षाबंधनाचा सण साजरा होईल. त्याच्याशी नीरज चोप्राचा वेगळा संबंध आहे. १४ जानेवारी १७६१ ला पानिपतावर अहमद शाह अब्दालीकडून दारुण पराभव झाल्यानंतर अपमानित चेहरा दाखविण्याऐवजी तिकडेच यमुना खोऱ्यात स्थायिक झालेल्या महाराष्ट्रातील अठरापगड समाजाचा नीरज चोप्रा वारस आहे. ही कुटुंबे अभिमानाने आपण रोड मराठा असल्याचे सांगतात. त्यांनी तेराव्या शतकातला राजपूत राजा रोड याचे नाव लावले.

कुतबुद्दीन अहमदकडे स्वत:च्या कन्येची डोली पाठविण्याऐवजी नारळी पौर्णिमेलाच या राजा रोडने राज्य सोडून स्वाभिमान जपून दक्षिणेकडे कूच केले होते. म्हणून रोड मराठा रक्षाबंधन साजरे करीत नाहीत. असो. नीरज म्हणजे कमळाचे फूल. ते आता क्रीडा क्षेत्रातील हिमालयासारख्या उत्तुंग कामगिरीचे प्रतीक तर आहेच. त्याशिवाय संघभावना, खिलाडूवृत्ती, नम्रता अशा अनेक दृष्टीने नीरज तरुण पिढीचा आदर्श आहे. बुडापेस्टच्या जागतिक अजिंक्यपद मैदानी स्पर्धेत  सुवर्णपदक विजेता नीरजशिवाय किशोर जेना व डी. पी. मनू हे दोघे भारतीय अनुक्रमे पाचव्या व सहाव्या स्थानी राहिले. नैसर्गिकपणे नीरज हाच त्यांचा आदर्श असणार. कोणत्याही जागतिक स्पर्धेच्या पहिल्या आठ स्पर्धकांमध्ये असे तीन भारतीय असण्याची ही पहिली वेळ. नीरजचे व्यक्तिमत्त्वही इतरांनीही आदर्श घ्यावा असे आहे. खिलाडूवृत्ती त्याच्या नसानसांत भिनलेली आहे. पाकिस्तानचा अर्शद नदीम हा भालाफेकीतला त्याचा प्रमुख प्रतिस्पर्धी.

नीरजने टोकियो ऑलिम्पिक ते आताच्या बुडापेस्ट स्पर्धेपर्यंत मैदानात अर्शदला मागे टाकले खरे; पण स्पर्धकाचा द्वेष करायचा नसतो हे दाखवून देताना स्पर्धा संपताच मैत्रीचेही दर्शन घडविले. अर्शददेखील तिरंगा ध्वज लपेटलेल्या नीरजसोबत कॅमेऱ्याला सामोरा गेला.  भारतीय सैन्यात सुभेदार पदावर कार्यरत नीरजच्या देशप्रेमावर कुणाला आक्षेप घेता येणार नाही. बुडापेस्टमध्येच सुवर्णपदक जिंकल्यानंतर तिरंगा ध्वजावर सही मागणाऱ्या चाहतीला नम्रपणे नकार देण्याइतके देशप्रेम त्याच्या धमन्यांमध्ये प्रवाहित आहे. तो धाडसी आहे. दिल्लीत महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनावेळी क्रीडा क्षेत्रातील भलेभले तारेतारका बोटचेपी भूमिका घेऊन मूग गिळून गप्प असताना नीरजने त्यांची जाहीर बाजू घेतली. जगभर डंका वाजत असूनही त्याचे पाय जमिनीवर असल्याचे त्याच्या वागण्या-बोलण्यातून सतत जाणवत राहते. आज तो अव्वल खेळाडू असला तरी स्वत:ला महान समजत नाही.

कालच्या सुवर्णपदकानंतर याबद्दल विचारले तर त्याने झेकोस्लोव्हाकियाचा महान भालाफेकपटू जान झेलेनी हाच महान खेळाडू असल्याचे नम्रपणे सांगितले. ते खरेही आहे. प्रत्येकी तीन ऑलिम्पिक व वर्ल्ड चॅम्पियनशिप सुवर्णपदके आणि तब्बल पाचवेळा ९५ मीटरपेक्षा लांब भाला फेकण्याची, ९८.४८ मीटर अशी थेट शतकाच्या अंतिम बिंदूपर्यंत धडक मारण्याची अलौकिक कामगिरी झेलेनीच्या नावावर नोंद आहे. इंग्लंडचा स्टीव्ह बेकले, रशियाचा सर्जेई मकारोव्ह, जर्मनीचे बोरिस हेन्री व रेमंड हेच तसेच फिनलँडचे सेपो रॅटी व अकी परवियाईनेन अशा दिग्गजांच्या पंक्तीत विराजमान नीरजला ९० मीटरची फेक खुणावतेय आणि कामगिरीतील त्याचे सातत्य पाहता तो देशाला अनेक पदकांची माळ अर्पण करील. उत्तुंग कामगिरीची त्याची भूक कायम राहो, या शुभेच्छा!

Web Title: 'Neeraj' gold by the Danube, first Indian to win gold at World Championships

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.