Need fearlessness, not carelessness | आजचा अग्रलेख - निर्भयता हवी, निष्काळजी नको

आजचा अग्रलेख - निर्भयता हवी, निष्काळजी नको

भारताची लोकसंख्या १३० कोटींच्या घरात असून, इतकी विशाल लोकसंख्या असलेल्या देशात सोशल डिस्टन्सिंग राखा हे सांगणे हेच हास्यास्पद व उपरोधिक आहे. त्यामुळेच लॉकडाऊन उठताच दिवाळीच्या तोंडावर बाजारपेठांत लोकांनी खरेदीकरिता तुफान गर्दी केली. मंदिर-मशिदी उघडताच लोक दर्शनाकरिता धावले. भविष्यात कदाचित उपनगरीय रेल्वे सुरू केली तर लोकलला लटकून प्रवास करायला लोक तयार होतील. कोरोना हा विषाणू जर जैविकयुद्धाच्या हेतूने ‘डागण्यात’ आला असेल तर चीनचा हेतू भारतासारख्या महाकाय लोकसंख्या असलेल्या आपल्या शेजारील शत्रूराष्ट्राला खिंडीत पकडण्याची खेळलेली अचूक खेळी आहे. भौगोलिकदृष्ट्या आकाराने मोठ्या; पण लोकसंख्या कमी असलेल्या देशांत सोशल डिस्टन्सिंगची पूर्तता सहज शक्य आहे. मात्र भारतात सोशल डिस्टन्सिंग बहुतांश वेळा अशक्य आहे. साहजिकच त्यामुळे कोरोनाचे सावट गडद होत जाते व चीनचा भारताला आर्थिकदृष्ट्या जखडून ठेवण्याचा हेतू त्यातून साध्य होतो. जर पुन: पुन्हा लॉकडाऊन न करता सर्व सुरू ठेवायचे ठरवले तर मृत्युदर वाढून वैद्यकीय सेवेवरील ताण वाढणे अपरिहार्य आहे. चीन हे तर आपले शत्रू राष्ट्र आहे. त्यांनी भारतीयांच्या जिवाची पर्वा करण्याचे कारणच नाही. परंतु महाराष्ट्रात काही मंडळींनी मंदिरे खुली करण्याकरिता अंगात वारं भरल्यासारखे घुमायला सुरुवात केली होती. हिंदुत्वाच्या राजकारणाशी हा मुद्दा जोडून दबाव वाढवला.

मनुवादी संस्कृतीशी अखंड लढा देणाऱ्या महामानवाच्या वारसांनीही जातिव्यवस्था व योनीशुचितेच्या कल्पना जपणारी धार्मिक स्थळे खुली करण्याकरिता टाळ कुटले. आता मंदिरे खुली झाल्यावर दिवाळीत अभ्यंगस्नानाचे सोपस्कार पार पडल्यावर अनेकांनी देवदर्शनाकरिता स्वाभाविक गर्दी केली. अनेक मंदिरात सुरक्षा व्यवस्था असली तरी ती अपुरी आहे. शिवाय मंदिरे दीर्घकाळ बंद राहिल्यावर अन्य उद्योगातील कामगार जसा मूळ गावी निघून गेला तसा मंदिरांमधील कामगारही गेला. त्यामुळे तुटपुंज्या कर्मचारी वर्गाच्या भरवशावर काम सुरू झाले. धार्मिक स्थळांमध्ये वृद्ध व लहान मुले यांना प्रवेश नाही ही अट पाळणे कर्मकठीण आहे. मंदिराबाहेर ठेवलेली पादत्राणे जर चोरी होतात तर सोबत नेलेली लहान मुले पालकांनी कुठे ठेवायची? मंदिरात तासन‌्तास बसून भजन-कीर्तन करणे हा तर ज्येष्ठ नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय. अनेक घरांत ज्येष्ठ नागरिकांनी लुडबुड केलेली तरुण पिढीला आवडत नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक जास्तीत जास्त काळ देवाचरणी व्यतित करतात. त्यामुळे काही मोठ्या मंदिरांमध्ये नियमाचे पालन झाले. मात्र छोट्या मंदिरांत नियमांचे निर्माल्य झाले. अर्थात गर्दी काही केवळ मंदिरातच झाली नाही. ती बाजारपेठेत झाली तशी हॉटेलांत होऊ लागली आहे. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे तब्बल सहा महिने प्रत्येक माणूस घराच्या चार भिंतीत कोंडला गेला होता. बाहेर धो धो पाऊस पडत असेल तर माणूस स्वखुशीने चार भिंतीत स्वत:ला कोंडून घेतो. मात्र जेव्हा हे कोंडून घेणे स्वत:च्या मनमर्जीने नसते तेव्हा या कोंडवाड्यातून आपली सुटका होण्याची वाट पाहणे हा मानवी स्वभावधर्म आहे. मुळात हा आता मी कोरोनाला घाबरत नाही, असे स्वत:ला बजावण्याचा व स्वत:ची कोंडवाड्यातून मुक्ती झाल्याचा आनंद प्रकट करण्याचा भावनाविष्कार आहे. कोरोना हे जर चीनने लादलेले जैविकयुद्ध असेल तर त्याविरुद्ध लढण्याकरिता ही निर्भयता एकाअर्थी उपकारक आहे. मात्र अशा युद्धसदृश्य परिस्थितीत निर्भयता आणि निष्काळजीपणा याची सीमारेषा धूसर असते. जर समाजातील मोठा वर्ग निष्काळजीपणे वागू लागला तर चीनसारख्या शत्रूराष्ट्राला हवे तसेच आपण वागू आणि त्यांच्या मृत्यूच्या सापळ्यात फसू.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नेमका हाच धोका हेरून जनतेला आवाहन करताना आपण निर्णायक वळणावर असल्याचे सांगितले. त्यातून लोक किती बोध घेतात ते महत्त्वाचे. त्यामुळे एकीकडे वाढती गर्दी हा नैसर्गिक मानवी भावनांचा आविष्कार आहे तर दुसरीकडे कदाचित हा कोरोनावर मात करण्याबाबतच्या अंध:कारमय भविष्यामुळे आलेल्या वैफल्याचा निदर्शक असेल. कारण कोरोनावरील लस कधी येणार व ती इतक्या मोठ्या लोकसंख्येला कधी मिळणार या विवंचनेत सारेच असताना डब्ल्यूएचओचे अध्यक्ष टेड्रोस अदनोम ग्रैब्रियस यांनी लसमुळे कोरोनाचा अंत होणार नाही, असे जाहीर केले आहे. रुग्णांना रेमडिसिवीर इंजेक्शन द्यावे की न द्यावे यावरही असाच गोंधळ सुरू आहे. अशा निर्नायकी अवस्थेत देवाचा आधार वाटणारे नक्कीच काही असतील.

Web Title: Need fearlessness, not carelessness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.