PM Narendra Modi Birthday: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सकारात्मक ऊर्जेचा अविरत आणि अखंड प्रवाह: नारायण राणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 09:02 IST2021-09-17T09:00:51+5:302021-09-17T09:02:16+5:30
मोदीजींच्या नेतृत्त्वाखाली देश महासत्ता बनेल.

PM Narendra Modi Birthday: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सकारात्मक ऊर्जेचा अविरत आणि अखंड प्रवाह: नारायण राणे
१७ सप्टेंबर, २०२१ रोजी आपले लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी ७१व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. भारत मातेसाठी त्यांनी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले आहे. मला हा विश्वास आहे, की मोदीजींच्या नेतृत्त्वाखाली देश महासत्ता बनेल. मोदीजी हे देशाला सकारात्मक ऊर्जा देणारे नेतृत्व आहे. त्यांना विकासाची आणि प्रगतीची दृष्टी आहे. त्यांनी चारवेळा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून १४ वर्षे काम करून गुजरातला विकासाच्या नव्या मार्गावर नेले.
गेल्या ७ वर्षांच्या आपल्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीत त्यांनी करोडो भारतीयांची स्वप्ने साकार केली.एक सक्षम प्रशासक या नात्याने त्यांनी कलम ३७० आणि अयोध्येतील राम मंदिर हे संवेदनशील प्रश्न मार्गी लावले. शतकानुशतके न सुटलेले अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावले. कोविड १९च्या विरोधातील लढाई त्यांनी मोठ्या यशस्वीपणे लढली. आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या देशाची एक मजबूत प्रतिमा निर्माण केली. त्यांच्या दूरदृष्टीच्या धोरणांमुळे कोविड महामारीची परिस्थिती असतांनाही आपल्या देशाच्या विकासाचा वेग कमी झाला नाही व त्याचा प्रत्यय सध्याच्या तिमाहीमध्ये दिसून आला.
त्यांनी अनेक ध्येय ठरविली व ती पूर्ण होण्यासाठी अठरा तास मेहनत केली. प्रत्येकाला घर व प्रत्येकाच्या घरात पाण्याची जोडणी देणे हे मोदीजींचे स्वप्न आहे. शासकीय योजना आणि कार्यक्रमात त्यांनी अनेक सुधारणा घडवून आणल्या. त्यामुळे शासकीय यंत्रणांमध्ये होणारी दिरंगाई समाप्त झाली. मी स्वतःला अत्यंत भाग्यशाली समजतो, की माझा आदरणीय मोदीजींच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश झाला. त्यांनी अत्यंत विश्वासाने माझ्यावर सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारी सोपविली. त्यांच्या नेर्तृत्वाखाली ही जबाबदारी मी निश्चितच उत्तमपणे पार पाडीन. सबका साथ सबका विकास ही संकल्पना भारत देशाला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी दिली. त्यांच्या दूरदृष्टीच्या नेतृत्त्वात आपण देशाच्या प्रगतीची ध्येय नक्कीच गाठू शकतो. येत्या काळात नवा भारत आपल्याला दिसेल. यदीजींना जन्मदिवसाच्या शुभेच्छा!