निर्बंध स्वीकारण्याची तयारी हवी!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2020 02:27 AM2020-05-02T02:27:05+5:302020-05-02T02:27:19+5:30

आपल्याला अटकाव करून प्रशासनाला आसुरी आनंद मिळतोय असा काहींचा गैरसमज झालेला असल्यास नवल नव्हे.

Must be prepared to accept restrictions! | निर्बंध स्वीकारण्याची तयारी हवी!

निर्बंध स्वीकारण्याची तयारी हवी!

Next

- पाचू मेनन

प्रदीर्घ काळच्या संचारबंदीनंतर राज्य सरकारने काही प्रमाणात निर्बंध शिथिल करण्याचे ठरवले आणि २० एप्रिल हा गोमंतकियांसाठी अविस्मरणीय दिवस ठरला. गेला महिनाभर काहीही न करता घरी बसून राहिलेला गोवेकर अक्षरक्ष: कंटाळला आहे. रोजंदारीवर काम करणाऱ्यापासून उद्योजकापर्यंत प्रत्येकाला या संचारबंदीची झळ बसली आहे. आपल्याला अटकाव करून प्रशासनाला आसुरी आनंद मिळतोय असा काहींचा गैरसमज झालेला असल्यास नवल नव्हे. सुरुवातीचे काही दिवस अप्रुपाचे आणि धास्तीचे होते. पण जसजसे हे स्थित्यंतर अंगवळणी पडू लागले तसतसे लोकही सरावले. मग चीडचीड सुरू झाली. एका बाजूने बाहेर पडलो तर कुणी तक्रार करील आणि पोलिसांच्या लाठ्या खाव्या लागतील ही भीती तर दुसरीकडे वदंताविरांच्या उपद्व्यापामुळे भयाचे वातावरण. त्यानी तर कोरोनाविषयीच्या अफवा आणि वावड्यांचे पीक मध्यंतरीच्या काळात टिपेला पोहोचले होते. व्यावसायिकही संचारबंदीवर नाराज होते. व्यवहार ठप्प झालेले आणि मालही कुजत पडलेला! जोपर्यंत परिस्थिती पूर्वपदावर येत नाही तोपर्यंत अर्थव्यवस्था कोलमडलेलीच राहील, असेच जो तो आताही सांगतो आहे.


त्यामुळेच असेल कदाचित २० रोजी किंचित शैथिल्य आल्याचे दिसताच संचाराच्या क्लृप्त्या अर्थातच सुपीक डोक्यातून निघाल्या. मुलबाळाना सोसायटीमध्येच खुल्या जागेत खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले गेले तर मोठ्या माणसानी गटागटाने बसून गप्पा छाटायचा छंद पुनरुज्जीवित केला. एरवी ज्यांचे बूड देखील हलत नसे तेही भ्रमणाच्या लाभांचा साक्षात्कार झाल्यासारखे नियमितपणे फेरफटक्यास निघू लागले. आरोग्याविषयीची ही नवी सजगता आश्चर्यकारक नव्हे तर काय?
संचारबंदी शैथिल्याच्या काळात भाजी आणि मासे घेऊन येणाºयाची नित्याराधना झाली नाही तरच नवल. शहरातील सोसायट्यांत तर त्यांची वाट चातकाप्रमाणे पाहिली जायची. हे विक्रेते आले की त्यांच्य मालाच्या सुगंधांत सोशल डिस्टन्सिंगचाही विसर पडायचा. सुपरमार्केट व अन्य मोठ्या आस्थापनानी ग्राहकांकडून अंतर राखले जावे म्हणून व्यवस्था केली खरी, पण माणूस दिसल्यावर त्याला खेटायचे आणि गर्दी करायची ही सवयही आपल्या अंगवळणी पडलेली असल्यामुळे नियमांना तोंडदेखलेपणा आला नाही तरच नवल. एकंदर अविर्भावच असा की संचारबंदी लागू करून प्रशासन आपल्या भ्रमण स्वातंत्र्याचा अक्षम्य संकोच करत आहेत.
आपण कधी सुज्ञपणा दाखवणार आहोत? कोरोनाला अटकाव करण्यासाठी जी संघटनशक्ती अपेक्षित आहे ती अशा प्रकारच्या नकारात्मक पवित्र्यातून आपल्याला दाखवायची का? नागरिक म्हणून आपण आपल्या कर्तव्याला जागलो असे मला तरी वाटत नाही.
‘विनाशकाले विपरित बुद्धी’ या उक्तीची आठवण करून देणारेच अनेकांचे वर्तन होते.

आता, निर्बंध पुरते हटविलेले नसतानाच जर आपण असे स्वैर वागत असू तर मग संचारबंदी पूर्णत: हटवल्यानंतर आपण काय करू याची कल्पना करूनच अंगावर शहारे येतात. पिंजºयातून निसटलेल्या पक्ष्यांप्रमाणे आकाश कवेत घेण्यास जो तो सुसाट निघेल आणि इतके दिवस घेतलेल्या दक्षतेचे तीनतेरा वाजतील, एवढे निश्चित.
जराशी संधी मिळाली आणि मित्रांचा गोतावळा जमला तर माणसे ऊरभेट घेणार नाहीत, पण एकामेकाच्या नको तितकी समीप जात सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाना धाब्यावर हमखास बसवतील. संचारबंदी हटवली तर मग कोरोना नामक दैत्याचे पारिपत्त्य आपण एकट्यानेच केल्याच्या अविर्भावात प्रत्येकाचा वारू सुसाट निघेल. विलगीकरण संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक होते, पण आपण विलग राहिलो म्हणून संसर्गापासून कायमस्वरूपी बचावलो, असे थोडेच आहे. त्यातून फार तर सद्यकालीन संसर्ग शृंखला तुटेल व काहीसा दिलासा मिळेल. पण संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहेच. आणि, लॉक डाऊन हटवले म्हणजे विषाणू संपला, असेही नाही. ही ब्याद कायमची नष्ट करायची असेल तर त्यासाठी अजून प्रदीर्घ संशोधनाची आणि आम जनतेकडून यापेक्षाही कठोर व्रताचरणाची आवश्यकता आहे. चुकार वागलो तर आपणच आपल्या पायावर धोंडा पाडून घेऊ. गेला सप्ताहभर दुचाकी आणि चारचाकी वाहनांवरले निर्बंध अंशत: शिथिल केले गेले. तेवढ्यानेही अनेकाना चेव चढला. गोवा पोलिसानी या काळात नियमभंगाच्या तब्बल ५०० प्रकरणांची नोंद केली व चालकाना दंड फर्मावला, आपल्यातल्या अतीउत्साहाचे हे बोलके उदाहरण.
पुढील काही दिवसात तर औद्योगिक आस्थापने पूर्ववत सुरू होणार आहेत. कर्मचाऱ्यांची वाहतुक करता यावी तसेच त्याना नियमितपणे व वेळेवर हजर राहाता यावे म्हणून निर्बंध अजून शिथिल करावेत, अशी मागणी उद्योग जगतातून होते आहे. सरकारने परवानग दिली तर कामगार शिस्त पाळतील का? परवाच कुठ्ठाळीच्या नव्या पुलाच्या बाजूने असलेल्या शेतात कापमीसाठी मजूर उतरलेले दिसले. ते सोशल डिस्टन्सिंद पाळत होते, पण गटाने!! असेच कामगारांच्या बाबतीत झाले तर?
एक खरे की संचारबंदी फार काळ चालू शकत नाही. अर्थव्यवसथेला पूर्वपदावर यावेच लागेल आणि त्यासाठी आवश्यक ते यत्न आपल्याला करावेच लागतील. आता तर केंद्रीय गृहमंत्रालय दिवसाकाठी काही ना काही घोषणा करत संचारबंदी थोडीथोडी शिथील करते आहे. त्यातून पुन्हा गोंधळ माजतो. शैथिल्य जनतेला हवेय की सरकारला, असा प्रश्नही उठतो.
नव्या पिढ्यानी भौतिक सुखांना इतके गृहित धरले आहे की दुसºया बाजूचा विचार करणेही अनेक युवकाना नकोसे वाटते. जीवनक्रम किंचित जरी बदलला तरी कपाळाला आठ्या पडतात. कोरोनाने मात्र या मनोवृत्तीलाही वेसण घातली. अनिच्छेने का होईना, तरुणाईही निर्बंध स्विकारू लागलीय. कोरोनाने भय ही काय चीज असते तेही सळसळत्या रक्ताला दाखवून दिले.
ही नवी समज तरुणांच्या ठायी किती दिवस राहील, हा प्रश्न मात्र कायम आहे.
(सामाजिक भाष्यकार)

Web Title: Must be prepared to accept restrictions!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.