मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’

By हणमंत पाटील | Updated: December 23, 2025 07:30 IST2025-12-23T07:28:46+5:302025-12-23T07:30:22+5:30

गेल्या दोन वर्षांत सातारा व सांगली जिल्ह्यातल्या निर्जन शेतात मेफेड्रॉन या अमली पदार्थनिर्मितीचे चार कारखाने सापडले आहेत. हे ‘कनेक्शन’ नेमके काय ?

Mumbai's 'Brain', Pune's 'Market' and 'Bases' in Satara-Sangli DCM Eknath Shinde Brother drug raid | मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’

मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’

-हणमंत पाटील, वृत्तसंपादक, 
लोकमत, सातारा

गेल्या आठवड्यात सातारा जिल्ह्यातील सावरी (ता. जावळी) गावात पत्र्याच्या शेडमधील मेफेड्रॉन (एमडी) ड्रगनिर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला. मुंबई गुन्हे शाखेने ११५ कोटी किमतीचे एमडी ड्रग जप्त केले.  सातारा जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाला या कारवाईचा कोणताही पत्ता लागला नाही. ‘आम्हाला काही माहिती नाही, ही मुंबई पोलिसांची कारवाई आहे’ म्हणून सातारा पोलिसांनी हात झटकले. 

जानेवारी २०२५ मध्ये अशीच कारवाई सांगली जिल्ह्यातील विटा एमआयडीसी परिसरातील एका कारखान्यावर पोलिसांनी केली. त्यावेळी २९ कोटींचे एमडी ड्रग ताब्यात घेतले. त्याआधी फेब्रुवारी २०२४ मध्ये सांगलीतील कुपवाड येथून ३०० कोटींचे आणि मार्च २०२४ मध्ये इरळी (ता. कवठेमहांकाळ) येथून २४५ कोटींचे एमडी ड्रग जप्त करण्यात आले. योगायोगाने ही कारवाईही मुंबई गुन्हे शाखेने केली होती.

ड्रगनिर्मितीच्या चारही ठिकाणांमध्ये आणखी एक साम्य आढळते. ते म्हणजे शेतात किंवा निर्जन ठिकाणी पत्र्याचे शेड भाड्याने घ्यायचे. त्यासाठी स्थानिक गुंडाला हाताशी धरायचे. या पद्धतीमुळे ‘कमी वेळेत जास्त पैसा’ मिळवून देणाऱ्या या जीवघेण्या अवैध धंद्याची पाळेमुळे ग्रामीण भागापर्यंत पसरत आहेत. दोन वर्षांत सातारा व सांगलीतील  एमडी ड्रगनिर्मितीचे चार कारखाने सापडले.  म्हणजे आणखीही काही ठिकाणी हा गैरउद्योग सुरू असू शकतो.  सर्वच घटनांमध्ये एमडी ड्रगच्या कारखान्याचा मास्टरमाईंड हा मुंबईतील आहे. त्याचे सातारा व सांगलीतील स्थानिक गुंडांशी व राजकारण्यांशी काही संबंध आहेत का, हे रॅकेट नेमके कसे चालते, आणखी काही निर्जन ठिकाणी एमडी ड्रगनिर्मितीचे कारखाने सुरू आहेत का, याच्या मुळापर्यंत जाण्याची आवश्यकता आहे. 
मात्र, गेल्या काही दिवसांपासून मिळेल त्या विषयांवरून राजकारण करणे, सर्वच नेत्यांच्या सोयीचे झाले आहे. सध्या मूळ साताऱ्यातील दरे गावच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंधूच्या सहभागाविषयी विरोधी पक्षनेत्या सुषमा अंधारे यांनी टीकेची झोड उठविली आहे. या सर्व राजकारणात पोलिसांच्या तपास यंत्रणेतील त्रुटी बाजूला राहतात.  फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील युवतीच्या आत्महत्येच्या वेळीही हेच झाले होते. आताही मूळ प्रश्न बाजूला ठेवून सावरी एमडी ड्रगच्या प्रकरणावरून राजकारण सुरू झाले आहे. त्यामुळे मुंबईतील एमडी ड्रगचा मास्टरमाईंड व स्थानिक गुंडांचे रॅकेट अलगद सुटण्याची शक्यता वाढते.

अफू, गांजा, चरस, भांग, कोकेन या नैसर्गिक नशेच्या पदार्थांपासून हॅरोईन, मॉर्फिन, कोडिन, मेफेड्रॉन (एमडी) या सिंथेटिक व रासायनिक अमली पदार्थनिर्मितीचा ‘मेक इन महाराष्ट्र’ धंदा जोरात फोफावू लागला आहे. मुंबईपासून सुरू झालेले रासायनिक अमली पदार्थांच्या कारखान्यांचे जाळे आता पार ठाणे, पुणे, सातारा, सांगली, वर्धा, लातूर, धाराशिवपासून पार नंदुरबार असे ग्रामीण महाराष्ट्रापर्यंत पोहोचले आहे.  

ग्राहक म्हणून शाळा-महाविद्यालयांतील युवक-युवतींना टार्गेट केले जाते. युवा पिढीला व्यसनाच्या जाळ्यात अडकवणाऱ्या या विषयाकडे तितक्याच गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. काही काळासाठी राजकारण बाजूला ठेवून पोलिस यंत्रणेला तपासाचे पूर्ण स्वातंत्र्य दिले पाहिजे. मग, त्यामध्ये कोणत्याही राजकीय व्यक्तीचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहभाग असो. त्यांना ‘क्लीन चिट’ अथवा ‘अभय’ देऊ नये. गुन्हेगाराला  जात, धर्म अगर पक्ष नसतो. महाराष्ट्राला विळखा घालणाऱ्या अमली पदार्थांकची पाळेमुळे उघडून टाकण्यासाठी सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी एकत्र यायला हवे. अन्यथा ‘उडता पंजाब’ आपल्या गावात आणि घरात घुसायला जास्त वेळ लागणार नाही.    
    hanmant.patil@lokmat.com

Web Title : मुंबई: दिमाग; पुणे: बाज़ार; सतारा-सांगली: एमडी ड्रग व्यापार के अड्डे

Web Summary : महाराष्ट्र में ड्रग का कारोबार फलफूल रहा है, मुंबई सरगना है। सतारा और सांगली में कारखाने पकड़े गए, जिससे ग्रामीण क्षेत्रों का शोषण करने वाले नेटवर्क का पता चला। राजनीतिक हस्तक्षेप जांच में बाधा डालता है, जिससे मुख्य आरोपियों के भागने और लत फैलने का खतरा है।

Web Title : Mumbai: Brain; Pune: Market; Satara-Sangli: Hubs of the MD Drug Trade

Web Summary : Maharashtra's drug trade thrives, with Mumbai as the mastermind. Factories in Satara and Sangli are busted, revealing a network exploiting rural areas. Political interference hinders investigations, risking the escape of key figures and the spread of addiction.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.